मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
संतसंग

विविध विषय - संतसंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२७९ .

दुर्जनाचा संग होय मना भंग । सज्जनाचा योग सुखकारी ॥१॥

सुखकारी संग संतसज्जनांचा । संताप मनाचा दुरी ठाके ॥२॥

दुरी ठाके दुःख सर्व होय सुख । पाहो जाता शोक आढळेना ॥३॥

आढळेना लोभ तेथे क्षोभ । अलभ्याचा लाभ संतसंगे ॥४॥

संतसंगे सुख रामीरामदासी । देहसंबंधासी उरी नाही ॥५॥

२८० .

दुर्जनसंगति कदां धरुं नये । घडते अपाय बहुविधा ॥१॥

बहुविधा जाले अपाय बहुतां । तेचि सांगो आतां सावकाश ॥२॥

कुसंग हे माया धरितां संगती । गेले अधोगती नेणो किती ॥३॥

चांडाळसंगती होइजे चांडाळ । होय पुण्यशीळ साधुसंगे ॥४॥

बहुविध रत्न फुटोनिया गेले । संगतीने केले रुधिराचे ॥५॥

कुरुंदसंगती झिजला चंदन । कुसंगे जीवन नासतसे ॥६॥

खाराचे संगती नासे मुक्ताफळ । होतसे तत्काळ कळाहीन ॥७॥

लाखेचे संगती सोने होय उणे । दूध हे लवणे नासतसे ॥८॥

दुर्जनसंगती सज्जन ढांसळे । क्रोध हा प्रबळे अकस्मात ॥९॥

दास म्हणे संग त्यागा दुर्जनाचा । धरा सज्जनाचा आदरेसी ॥१०॥

२८१ .

दुर्जना दुर्जना होय समाधान । एकमेकां माने भेटताती ॥१॥

दुदगा चालीला इंद्रावना भेटी । काळकूट पोटी भरोनियां ॥२॥

आगीयाचे भेटी मिरगोड चालीले । एकमेकां आले प्रेम दुणे ॥३॥

आरांटी बोरांटी रिंगणी सराटी । काचकुहिरीभेटी भेटो आल्या ॥४॥

सेंबी सागरगोटी निवडंगी वाघांटी । कांटी आली भेटी दास म्हणे ॥५॥

२८२ .

चांफे नागचांफे त्रिविध मोगरे । कांचन आगरे पार्यातक ॥१॥

पार्यातक कुबा दवणा मांदार । अर्गूद कर्वीर हेमपुष्पे ॥२॥

पुष्पे बहुविधे सांगता विविधे । दास म्हणे साधे दूर्वादळ ॥३॥

२८३ .

जाई जुई शेवंती अंबई मालती । कुसुंबी पुष्पयाती केतुके ते ॥१॥

चाफे पुष्पे नाना बकुळी नवाळी । पाडळी कर्दळी कापुराची ॥२॥

कापुरजननी आणि कुमुदिनी । ब्रह्मकमळिणी शतपत्री ॥३॥

शतपत्री कुसरी जाश्वनी काळोत्री । रुई बेलपत्री गंगावती ॥४॥

गंगावती भावे आवडे देवासी । त्याहुनि तुळसी दास म्हणे ॥५॥

२८४ .

कवठ कलिंगडी अंबे निंबे शेंबे । बोरे साखरनिंबे नारिंगे ते ॥१॥

नारिंगे ते रायआवळे आंवळे । वाटोळे वाटोळे फळभार ॥२॥

फळभार तया अणु नाही शिखा । तैसा नको लेखा दास म्हणे ॥३॥

२८५ .

साधुसंगे साधु भोंदुसंगे भोंदू । वादासंगे वादू होत असे ॥१॥

होत असे भला भल्यांचे संगती । जाय अधोगति दुष्टसंगे ॥२॥

दुष्टसंगे दुष्ट जाला महापापी । होतसे निष्पापी संतसंगे ॥३॥

संग जया जैसा लाभ तया तैसा । होतसे आपैसा अनायासे ॥४॥

अनायासे गती चुके अधोगति । धरितां संगति सज्जनाची ॥५॥

सज्जनाचे कृपा जयालागी होय । तया लागे सोय परत्रीची ॥६॥

परत्रीची सोय भक्तीचा उपाय । चुकती अपाय दास म्हणे ॥७॥

२८६ .

उगवतां तरणी आनंदे नलिनी । घेटुळी पाहुणी न घडे तेथे ॥१॥

देखतां निशापती चकोर तृप्त होती । वायसांचा पंक्ती न घदे तेथे ॥२॥

स्वानंदयुक्त द्रव्ये सोमकांत । गुंडासी सांगत न घडे तेथे ॥३॥

कोकिळेचे गाणे सकळां समाधान । श्रोतृमंदा मान न घडे ॥४॥

रत्नांचे परिक्षणे डोळसांच लाहणे । जात्यंधा पाहणे न घडे तेथे ॥५॥

रामदासी ब्रह्म एक संतासी देख । पाषांडासी तर्क न घडे तेथे ॥६॥

२८७ .

चंदनसंगती चंदनचि होती । होय काळी माती कस्तुरीका ॥१॥

कस्तुरीका होय कस्तुरीच्या योगे । साधूचेनि संगे साधुजन ॥२॥

साधुजन होती संगती धरीतां । मिळणी मिळता गंगा जेंवि ॥३॥

जेवितां अमृत अमर होइजे । अचळ पाविजे साधुसंगे ॥४॥

साधुसंगे देव आपणचि होणे । अद्वैत लक्षणे बाणलीयां ॥५॥

बाणलिया तयां निःसंगाचा संग । होइजे निःसंग आपणचि ॥६॥

आपणचि ध्यानी बैसला आसनी । जनी आणि वनी देव भासे ॥७॥

देव भासे तेणे आपण भुलला । तेणे गुणे जाला देव आंगे ॥८॥

देवाचे संगता देवचि होइजे । चतुर्भुज राजे वैकुंठीचे ॥९॥

वैकुंठीचे राजे ध्याती अहर्निशी । वंदिती साधूसी दास म्हणे ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP