विविध विषय - अध्यात्म
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
८५३.
पूर्वपक्ष भेद सिद्धांत अभेद । संवाद विवाद समागमे ॥१॥
समागमे आहे सर्व अनुमान । कल्पनेचे रान जेथे तेथे ॥२॥
जेथे तेथे पूर्ण ब्रह्म कोंदाटले । दृश्यहि दाटले कल्पनेचे ॥३॥
कल्पनेचे दृश्य करी कासावीस । नाही सहवास सज्जनांचा ॥४॥
सज्जनांचा वास संदेहाचा नास । विचारे विळास जेथे तेथे ॥५॥
जेथे तेथे आहे देव निरंजन । तनमनधन त्यासी पावो ॥६॥
तनमनधन तो जगजीवन । आत्मनिवेदन रामदासी ॥७॥
८५४.
बहुकाळ गेले देवासी धुंडितां । देव पाहो जातां जवळीच ॥१॥
जवळीच असे पाहतां न दिसे । सन्निधचि वसे रात्रंदिस ॥२॥
रात्रंदिस देव बाह्य अभ्यंतरी । जीवा क्षणभरी विसंभेना ॥३॥
विसंभेना परी जीव हे नेणती । जाती अधोगति म्हणोनियां ॥४॥
म्हणोनियां सदा सावध असावे । विमुख नसावे राघवेसी ॥५॥
राम पूर्वपुण्ये जालिया सन्मुख । मग तो विमुख होऊं नेणे ॥६॥
होऊं नेणे राम सर्वांगे सुंदर । नित्य निरंतर मागे पुढे ॥७॥
मागे पुढे सन्मुखची चहूंकडे । भेटी हे निवाडे राघवाची ॥८॥
राघवाचे भेटी जाल्या नाही तुटी । मग कल्पकोटी चिरंजीव ॥९॥
चिरंजीव होय राघवी मिळतां । तेथे पाहो जातां मृत्यु नाही ॥१०॥
नाही जन्म मृत्यु नाही येणे जाणे । स्वरुपी राहाणे सर्वकाळ ॥११॥
सर्वकाळ मन तदाकार होये । जरी राहे सोय श्रवणाची ॥१२॥
श्रवणाची सोय संतांचेनि संगे । विचारे विभागे अहंभाव ॥१३॥
अहंभावे राम भेटला न जाये । जवळीच होय दुरी कैसा ॥१४॥
दुरी कैसा होय अहंभावे करी । जवळीच चोरी आपणासी ॥१५॥
आपणासी चोरी सबाह्य अंतरी । आणि सृष्टिभरी नांदतसे ॥१६॥
नांदतसे अंत नाही तो अनंत । जाणतील संत अनुभवी ॥१७॥
अनुभवी जाणे येथीचिये खुणे । येरां वीटवाणे वाटईल ॥१८॥
वाटईल सुख संतसज्जनांसी । रामीरामदासी भेटी जाली ॥१९॥
८५५.
गेला स्वरुपाच्या ठाया । तिकडे ब्रह्म इकडे माया ॥१॥
दोहींमध्ये सांपडले । मींच ब्रह्मसे कल्पिले ॥२॥
ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपळ ॥३॥
तिकडे वस्तु निराकार । इकडे मायेचा विस्तार ॥४॥
पुढे ब्रह्म मागे माया । मध्ये संदेहाची काया ॥५॥
रामीरामदास म्हणे । इतुके मनाचे कारणे ॥६॥
८५६.
बरे चांगले आणि गोड । ऐकतांचि पुरे कोड ॥१॥
अभिमाना पैलीकडे । मन बुद्धसि नावडे ॥२॥
रामदास म्हणे साचे । मूळस्थान या जन्माचे ॥३॥
८५७.
स्वरुपाचा डोहो भरला निघोट । ऐलपैल तट आडळेना ॥१॥
आर्द्र ना खळाळ उथळ ना खोल । हालेना निश्चळ भरला असे ॥२॥
तयामाजी चाले मजमाजी भरले । अंगासी लागले आडळेना ॥३॥
रामदास म्हणे मिनले स्वरुपडोही । स्वरुप जाले पाही मन कैचे ॥४॥
८५८.
जेथे तेथे देव नाही रिता ठाव । ऐसा माझा भाव अंतरीचा ॥१॥
अंतरीचा देव अंतरी जोडला । विकल्प मोडला एकसरां ॥२॥
एकसरां जाला लाभ अकस्मात । ब्रह्म सदोदित सर्वां ठायी ॥३॥
सर्वां ठायी ब्रह्म पंचभूत भ्रम । साधुसंगे वर्म कळो आले ॥४॥
कळो आले वर्म आत्मनिवेदने । ज्ञाने समाधान रामदासी ॥५॥
८५९.
बहु रुप मांडिले यासी नाही जोडा । पहाणार थोडा भूमंडळी ॥१॥
त्याग करवेना धारणा धरवेना । वृत्ति हे पुरवेना पहावया ॥२॥
अखंड तमासा पहाना आमासा । वाउगी वयसा वेंचितसे ॥३॥
रामदास म्हणे सर्वांचे अंतरी । नित्य निरंतरी वर्ततसे ॥४॥
८६०.
सर्वांहुनी थोर देव निराकार । मग हा विस्तार विस्तारला ॥१॥
विस्तारला जन हा नानापरींचा । निर्गुण पूर्वींचा देव आहे ॥२॥
देव आहे सत्य येर हे असत्य । जाण नित्यानित्य विचारणा ॥३॥
विचारणा करी धुंडी नानापरी । दास म्हणे तरी तरशील ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 29, 2011
TOP