देवताविषयक पदे - मुरली
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
११३३.
( राग-केदार; ताल-त्रिताल; चाल-हरिविण० )
हरि वेणु वाहे त्रिभंगी । गोपीगोपाळांचे संगी ॥ध्रु०॥
भ्रुकुटी वेंकट वेंकट पाहे । चपळ कर पल्लवताहे ॥१॥
श्रवणे अहंभाव गळाले । सकळ चकित जाले ॥२॥
नादमुळी उद्भव जेथे । दासजन तन्मय तेथे ॥३॥
११३४.
( राग-मारु; चाल-हित गेले रे० )
वेणु वाजे, सुरस वेणु० ॥ध्रु०॥
रुणझुण रुणझुण मंजुळ मंजुळ । अहो रंग माजे ॥१॥
ऐकोनी तो कीळ थक्कित कोकिळ । अहो कंठ लाजे ॥२॥
धीर समीरे यमुनातीरे । अहो तुंव माजे ॥३॥
दासपालक चित्तपालक । अहो गोपिराजे ॥४॥
११३५.
( राग-कानडा; ताल-दादरा; चाल-कष्ट करी ते० )
वेणु मंजुळ गे माय वृंदावनी वो ॥ध्रु०॥
कान्हो सांवळा हरी गोवर्धनोद्धारी । रक्षितसे नानापरी ॥१॥
ऐकोनि मुरलीसी तल्लीन जाहली कैसी । पशुपक्षि जालही पिशी ॥२॥
दासा सुख देतसे तो हा गोपाळवेषे ।
आसनी शयनी कृष्ण भासे ॥३॥
११३६.
( राग-काफी; ताल-दादरा )
वृंदावनी सुंदर ध्वनी । वेणु वाजे रसिक बनी ।
ध्यानी मनी कृष्ण चिंतनी ॥ध्रु०॥
रागोद्धार स्पष्ट उच्चार । सुरवर नर किन्नर ।
चाकाटले पशु खेचर ॥१॥
लोकपाळ गातो निवळ । तुंबे जळ रोधे अनिळ ।
श्रोतेजन होति व्याकुळ ॥२॥
दास म्हणे कुशल जाणे । गायनकला अंतरि बाणे ।
गुणी जन होति शाहणे ॥३॥
११३७.
( राग-खमाज; ताल-दादरा )
सुरस मधुर वेणु । वाजवितो रुणझुणु ।
विकळ होता हे प्राणु । भेटिकारणे ॥१॥
रुप मनी आठवे । आवडी घेतली जीवे ।
यदुवीरा पहावे । सर्व सांडोनी ॥२॥
अखंड लागले ध्यान । स्वरुपी गुंतले मन ।
सकळ पाहतां जन । आठवे हरी ॥३॥
सकळ सांडोनी आस । तयालागी उदास ।
फिरे रामीरामदास । वेधु लागला हरिचा ॥४॥
११३८.
( चाल-उद्धवा शांतवन० )
वृंदावनकुंजामाजी घननीळ पितांबरधारी ।
मायानटवेषे नटला स्वरुप पाहतां अविकारी ।
अनन्य भावे रंगलिया भोंवत्या वेष्टित व्रजनारी ।
मुरलीनादे हरिवेधे विसरुनि गेल्या तनु चारी ॥ध्रु०॥
सहजी निजसदनी वनिता एकी दधिमंथन करिती ।
मंजुळ ध्वनि जो आइकला भरला मनमोहन चित्ती ।
विगलित वसने धांवति त्या कैंची गृहसुतपतिभ्रांति ।
सन्मुख श्रीहरि देखुनियां ते तटस्थ होउनियां राहती ॥१॥
सुर मुनि किन्नर येती नारद तुंबर गीत गाती ।
नादे अंबर दुमदुमले दृढतर समरस रसवृत्ती ।
शिवसनकादिक महायोगे सुमनवर्षाव करिती ।
रासविलास निजलीलेसहित श्रीहरि न्याहाळिती ॥२॥
सुरंग मुरली हरिअधरी अधरामृतरस पान करी ।
मंजुळ ध्वनि अति गति गमके अलाप उमटति सप्तस्वरी ।
उपांग वेणु ब्रह्मविणे तालमृदांग घनगजरी ।
थरिकुकु थरिकुकु थरिकुकु था शाम मनोहर नृत्य करी ॥३॥
स्वरुप सुंदर कृष्णाचे सार आगमनिगमाचे ।
स्तवितां वाचा पारुषल्या निवांत श्रुति नेती वाचे ।
मांडुनि ठाण त्रिभंगीचे मुनिमोहित जे नवलाचे ।
दर्शनमात्रे भय वारी अनन्य रामदासाचे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2011
TOP