मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नरदेह

विविध विषय - नरदेह

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


१३६

पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ॥१॥

याचें सार्थक करावें । आपणासी उद्धरावें ॥ध्रु॥

बहुत जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटि ॥२॥

रामदास म्हणे आतां । पुढतीं न लाभे मागुता ॥३॥

१३७

पक्षी श्वापद किडा मुंगी । पराधीन जिणें जगीं ॥१॥

तैसा नव्हे नरदेहो । करी भक्तीचा लवलाहो ॥२॥

नीच योनी चारी खाणी । अवघे पराधीन प्राणी ॥३॥

रामीरामदास म्हणे । ज्ञान ध्यान पशु नेणे ॥४॥

१३८

क्षुधा लागतांचि अन्न । तृषा लागतां जीवन ॥१॥

अवघा धंदाचि लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥२॥

निद्रा लागतां शयन । आळस येतां चुके मन ॥३॥

मळमूत्र संपादणें । शौच्य आच्मन करणें ॥४॥

खाणें लागे नानापरी । सर्वकाळ भरोवरी ॥५॥

रामीरामदास म्हणे । देह सुरवाडा करणें ॥६॥

१३९

देह विटाळाचा गोळा । कैसा होतसे सोंवळा ॥१॥

तुज कळेना विचारु । ऐसीयासी काय करुं ॥२॥

दृढ केला अभिमान । तेणें साधनें बंधन ॥३॥

रामदासस्वामीविण । केला तितुकाही शीण ॥४॥

१४०

विटाळाचा देह विटाळें जाणतां । शुद्ध करुं जातां कोणे परी ॥१॥

कोणे परी आतां शुद्ध हा होईल । विटाळ जाईल कैसा याचा ॥२॥

याचा अर्थ घेतां या न ये शुद्धता । शुद्ध करुं जातां पुन्हां पापी ॥३॥

पुन्हां पापी जाले पुन्हां शुद्ध केले । आयुष्य वेंचलें ऐशापरी ॥४॥

ऐशापरी देहो सर्वदा मुंडिला । दास म्हणे जाला कासावीस ॥५॥

१४१

विटाळाचा देह विटाळें वाढला । तुवां शुद्ध केला कोणेपरी ॥१॥

पातकाचा देह पातकें जाहला । विचारितां आला प्रत्ययासी ॥२॥

अस्थींचा पंजर चर्मीं गुंडाळिला । विष्ठेनें भरला मळमूत्रें ॥३॥

जंत किडे ओक आंतडीं कातडीं । बाह्यात्कार वेडीं भादरती ॥४॥

भादरिले केश मागुती निघती । पुन्हां भादरिती लागवेगें ॥५॥

भादरिली डोई पळाला विटाळ । मागुता चांडाळ भादरीतो ॥६॥

भादरीतो डोई घेतलें प्रायश्चित । अपानीं घासीत मृत्तिकेनें ॥७॥

बरा शुद्ध केला पुन्हां पापी जाला । पुन्हां भादरिला सावकाश ॥८॥

सावकाश कांहीं विचार पहावा । जेणेंकरीं देवा पाविजेतें ॥९॥

पावजेतें देवा भक्तिनिवेदनें । शुद्ध आत्मज्ञानें रामदासीं ॥१०॥

१४२

अस्थीचा विटाळ होतां स्नान केलें । चुडे दांतवले कासयासी ॥१॥

आचमन करावें शूद्राच्या विटाळें । हाटाचें चौढाळें कोण जाणे ॥२॥

नदीचे प्रवाहीं आंत पाहूं नये । स्नानसंध्या होय अग्रोदकें ॥३॥

ओलें चर्मी शुद्ध होत आहे हिंग । स्वयंपाकीं सांग सेविताती ॥४॥

रामदास म्हणे हें कोणी न पाहे । देहे मुळीं आहे विटाळाचें ॥५॥

१४३

डोळे चिरींव चांगले । वृद्धपणीं सरक्या जाले ॥१॥

ओले मातीचा भरवंसा । काय धरिसी माणसा ॥२॥

मुख रसाळ चांगलें । पुढें अवघें सुरकुतलें ॥३॥

रम्य नासिक सरळें । सर्वकाळ पाणी गळे ॥४॥

कर्ण भूषणीं सुंदर । पुढें जाहले बधिर ॥५॥

बरवी दंतांची पंगती । परि ते उन्मळोनि जाति ॥६॥

बरवे कर आणि चरण । परि ते जाले निष्कारण ॥७॥

अंगकांति होती बरी । जाली चिरगुटाचे परी ॥८॥

केंस होताती पांढरे । लाळ गळतां न धरे ॥९॥

बहुसाल होतें बळ । पुढें जाहलें निर्बळ ॥१०॥

देह होतें जें निर्मळ । तेंचि जाहलें ओंगळ ॥११॥

गर्व तारुण्याचा गेला । प्राणी दीनरुप जाला ॥१२॥

रामीरामदास म्हणे । आतां सावधान होणें ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP