मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


७६०.
आरंभी वंदीन विघ्नविनायक । मुख्य देव एक कळावया ॥१॥
कळावया कांही आपुले स्वहित । सत्क्रियविहित वेदाधारे ॥२॥
वेदाधारे क्रिया ज्ञान प्रचीतीचे । तरीच मनाने समाधान ॥३॥
समाधान होते श्रवणमनने । सगुणभजने अनुतापे ॥४॥
अनुतापे त्याग तोचि एक योग । देवाचा संयोग दास म्हणे ॥५॥

७६१.
नमूं वेदमाता जे का सर्व सत्ता । ब्रह्मज्ञान आतां बोलो कांही ॥१॥
बोलो कांही ब्रह्म जेणे तुटो भ्रम । आणि मुख्य वर्म ठायी पडे ॥२॥
ठायी पडे देव आणि भावाभाव । प्रकृतिस्वभाव सर्व कांही ॥३॥
सर्व कांही कळे संदेह मावळे । अंतरी निवळे साधकांचे ॥४॥
साधकांचे हित होय निरुपणे । श्रवणमनने दास म्हणे ॥५॥

७६२.
नमूं रामकृष्णा आदिनारायणा । तुम्ही त्या निर्गुणा दाखवावे ॥१॥
दाखवावे निजस्वरुप आपुले । दिसेनासे जाले काय करुं ॥२॥
काय करुं आतां देवा नरहरि । पंढरिमाझारी पांडूरंगा ॥३॥
पांडुरंगा देवा अगा महादेवा । तुम्ही मज द्यावा ठाव ब्रह्मी ॥४॥
ब्रह्मी ब्रह्मरुप ते मज करावे । रामदास भावे प्रार्थितसे ॥५॥

७६३.
सूर्यनारायणा देवा नमस्कार । तुवां निरकार दाखवावे ॥१॥
दाखवुनी द्यावे मज निववावे । चंद्रा तुज भावे प्रार्थितसे ॥२॥
प्रार्थितसे मही आणि अंतरिक्षा । तुम्ही त्या अलक्षा दाखवावे ॥३॥
दाखवावे मन आपोनारायण । ब्रह्मप्राप्ति जेणे ते करावे ॥४॥
करावे सनाथ अग्निप्रभंजने । नक्षत्रे वरुणे दास म्हणावे ॥५॥

७६४.
तुम्ही सर्व देव मिळोनि पावावे । मज वेगी न्यावे परब्रह्मी ॥१॥
परब्रह्मी न्यावे संतमहानुभावे । मज या वैभवे चाड नाही ॥२॥
चाड नाही एका निर्गुणावांचोनी । माझे ध्यानी मनी निरंजन ॥३॥
निरंजन माझा मज भेटवावा । तेणे होय जीवा समाधान ॥४॥
समाधान माझे करा गा सर्वहो । तुम्हासी देव हो विसरेना ॥५॥
विसरेना देह चालतो तोंवरी । बाह्य अभ्यंतरी दास म्हणे ॥६॥

७६५.
पृथ्वी आप तेज वायु ते आकाश । ऐसे सर्व दृश्य कोणे केले ॥१॥
केले हे देवाने सर्व चराचर । आपण ईश्वर वेगळाचि ॥२॥
वेगळाचि आहे त्याचे रुप कैसे । हे आम्हां कळेसे निरुपावे ॥३॥
निरुपावे काय बोलिले न जाये । अनुमाना नये पूर्णब्रह्म ॥४॥
पूर्णब्रह्म जरी तुम्ही निरोपाना । तरी काय जनां पुसावे हे ॥५॥
पुसावे हे सर्व आपुल्या गुरुसी । व्यर्थ कासाविसी जेथे तेथे ॥६॥
जेथे तेथे नाही संतांसी पुसावे । पुसतां सांगावे संतजनी ॥७॥
संतजनी काय कोणासी सांगावे । लोक कुडभावे पुसताती ॥८॥
पुसताती लोक कळेना म्हणोनी । तया संतजनी निरोपावे ॥९॥
निरोपावे जैसे ते तयां मानेना । विवाद सरेना जन्मवरी ॥१०॥
जन्मवरी आम्हां कोणीच सांगेना । नये अनुमाना सर्व कांही ॥११॥
सर्व कांही बापा उमजेना तुला । तरी गुरु केला कासयासी ॥१२॥
कासयासी केला ऐसे न म्हणावे । पुसतां सांगावे साधुजन ॥१३॥
साधुजनी काय म्हणोनि सांगावे । प्रत्ययाच्या नांवे शून्याकार ॥१४॥
शून्याकार सर्व साधूने मोडावे । विवेके जोडावे परब्रह्म ॥१५॥
परब्रह्म कैसे निरोपिले तुज । सांग गुह्य गूज अंतरीचे ॥१६॥
अंतरीचे गुज शाश्वत जाणावे । संतांसी भजावे गुरुरुपे ॥१७॥
गुरुचिया रुपे गुज कोणासी भजावे । संदेही पडावे जन्मवरी ॥१८॥
जन्मवरी संतसाधूंसी भजतां । मग संदेहता कोठे राहे ॥१९॥
कोठे राहे भाव भिन्न समाधाने । साधूची वचने वेगळाली ॥२०॥
वेगळाली परी अनुभवी एक । पूर्वपक्ष लोक पाहताती ॥२१॥
पाहताती लोक बहुधा निश्चये । तेणे गुणे होय कासावीस ॥२२॥
कासावीस कैंचे संताचे संगती । संतसंगे गती शीघ्रकाळे ॥२३॥
शीघ्रकाळे गति हे कैसी प्रचीती । समाधान चित्ती कोण कैसे ॥२४॥
कैसे समाधान ज्याचे तोचि जाणे । गुज ते सांगणे कोणेपरी ॥२५॥
कोणेपरी कळे खरे किंवा खोटे । खोटे तेंचि मोठे वाटतसे ॥२६॥
वाटतसे मनी संतांसी पुसावे । सर्वही त्यजावे वाग्जाळ ॥२७॥
वाग्जाळ जनी त्यागणेचि तुज । तरी गुह्य गूज अंतरले ॥२८॥
अंतरले गुज हातासी चढेल । जरी ते घडेल संतसेवा ॥२९॥
संतसेवा करी विवेक अंतरी । पाहतां संसारी तरिजेल ॥३०॥
तरिजेल सर्व कांही न करितां । संतांसी भजतां सर्वकाळ ॥३१॥
सर्वकाळ तुवां भजनचि केले । परी नाही जाले समाधान ॥३२॥
समाधान माझे सज्जनाच्या पायी । माझे मनी नाही दुजा भाव ॥३३॥
दुजा भाव नाही संतांचे चरणी । तरि कां वचनी अविश्वास ॥३४॥
अविश्वासे कदा भजन घडेना । प्रत्ययचि येना कदाकाळी ॥३५॥
कदाकाळी प्राणी जरी विवरेना । तरी ते घडेना समाधान ॥३६॥
समाधान धरे हे तुम्ही करावे । मन विवरावे ज्ञानमार्गी ॥३७॥
ज्ञानमार्गी तुझे मनचि रिघेना । तेथे विवंचना पाहिजे ते ॥३८॥
पाहिजे ते परी मज निरोपावी । चिंताचि असावी अनाथांची ॥३९॥
अनाथाचि चिंता श्रीराम करील । विचार देईल सेवकासी ॥४०॥
सेवक मी सेवा अल्प करुं जाणे । सर्व कांही नेणे ज्ञानमार्ग ॥४१॥
ज्ञानमार्गेविण सर्वकाळ शीण । संसार कठिण चुकेना की ॥४२॥
चुकेना संसार हे लज्जा तुम्हांसी । मज पतितासी कोण पुसे ॥४३॥
कोण पुसे तुज माझी लज्जा मज । म्हणोनियां गुज सांगतसे ॥४४॥
सांगतसे माझा सर्व अभिप्राव । आतां अंतर्भाव ओळखावा ॥४५॥
ओळखावा ऐसा जरी म्हणतोसी । तरी तूं मानसी सावधान ॥४६॥
सावधानपणे म्यां काय करावे । हे मज सांगावे निश्चयेसी ॥४७॥
निश्चयेसी देव आधी ओळखावा । निश्चयी राखावा मनामध्ये ॥४८॥
मनामध्ये कोण करावा निश्चय । आणि मनोजय कैसा घडे ॥४९॥
घडे मनोजय मनासी जाणतां । निश्चयो तत्त्वतां परब्रह्म ॥५०॥
परब्रह्म कोणेपरी ओळखावे । मनांत राखावे कोणे रीती ॥५१॥
रीती या ब्रह्माची निरुपणी कळे । सर्वहि निवळे समाधान ॥५२॥
समाधान जनी कैसे ओळखावे । जीवेंसी धरावे काय आतां ॥५३॥
काय आहे ऐसे हे मज कळेना । नये अनुमाना माझे मज ॥५४॥
माझे मज कळे हे कांही पहावे । स्वरुपी रहावे निरंतर ॥५५॥
निरंतर कैसे स्वरुपी रहावे । निर्गुणी पहावे काय आतां ॥५६॥
आतां एक करी तत्त्वविचारणा । तेणे निजखूणा पावशील ॥५७॥
पावशील खूण ऐसे ही म्हणतां । तत्त्वे पाहो जातां वेगळाली ॥५८॥
वेगळाली तत्त्वे परी तो तूं कोण । पाहे ओळखण निश्चयासी ॥५९॥
निश्चयाची गोष्टी तत्त्वरुप सृष्टि । जनालागी वेष्टी तत्त्वे तत्त्व ॥६०॥
तत्त्वझाडा होतां उरते ते काय । वेगी धरी सोय मीपणाची ॥६१॥
मीपणाची सोय पाहतां दिसेना । तत्त्वी आढळेना कांहे केल्या ॥६२॥
कांही केल्या तुज दिसेना मीपण । तरी कर्ता कोण सांग आतां ॥६३॥
आतां काय सांगो मीपण नाडळे । विचारितां कळे तत्त्वे तत्त्व ॥६४॥
तत्त्वे तत्व झाडा करुनि पहावे । मीपणाच्या नांवे शून्याकार ॥६५॥
शून्याकार जाले हे माझे मीपण । आतां मी तो कोण निरोपावे ॥६६॥
निरोपावे तरी तूं वस्तु आहेसी । वेगी आपणासी विभांडावे ॥६७॥
विभांडावे कोण तेंचि ते मीपण । तरी आतां खूण कैसी पावो ॥६८॥
कैसी पावो ऐसे जरी म्हणतोसी । तरी त्या हेतूसी ओळखावे ॥६९॥
ओळखतां हेतु अंतःकरण आहे । विचारितां राहे तत्त्वांमध्ये ॥७०॥
तत्त्वांमध्ये राहे पाहे सर्व कांही । तरि तुज नाही मीतूंपण ॥७१॥
मीतूंपण नाही विचारे पाहतां । मज वाटे आतां समाधान ॥७२॥
समाधान आहे संगत्याग होतां । हेतूने दुश्चिता होऊं नको ॥७३॥
नको देवा आतां हेतूचि संगति । व्यर्थ अधोगति हेतूसंगे ॥७४॥
हेतुसंगे सदा लागला हेतुसी । तो तूं निश्चयेसी वस्तुरुप ॥७५॥
वस्तुरुप होतां कृतकृत्य जालो । प्रत्यये पावलो समाधान ॥७६॥
समाधान पाहे आहे तैसे आहे । निश्चय न राहे सर्वकाळ ॥७७॥
सर्वकाळ मज साधूची संगति । विचाराने गती पावईन ॥७८॥
पावईन गती हा तुझा उधार । गतीच निर्धार होउनि पाहे ॥७९॥
होउनियां गेला प्रचीतीस येते । संशय धरीते पुन्हां मन ॥८०॥
मनाचा संशय मनाचा निश्चय । मने मनोजयो कामा नये ॥८१॥
कामा नये तरी मनेविण कैसे । मनेचि विश्वासे पाविजेते ॥८२॥
पाविजेते परी वृत्ति शून्य होतां । हेतु आठवीतां असमाधान ॥८३॥
असमाधान घडे ऐसे न करावे । देवे उद्धरावे भक्तजनां ॥८४॥
भक्तजन मुळी विभक्त नाहीत । असमाधान तेथे आडळेना ॥८५॥
आडळेना कांही स्वरुपी पाहतां । संसारी राहतां दिसो लागे ॥८६॥
दिसो लागे कोण तूं तरी निर्गुण । निर्गुणासी गुण लावूं नये ॥८७॥
लावूं नको गुण हे तुम्ही म्हणतां । देहसंगे व्यथा बाधीतसे ॥८८॥
बाधीतसे व्यथा देहाच्या संबंधे । विचार प्रबोधे समाधान ॥८९॥
समाधान माझे मीपण सांडितां । हे तो मज आतां कळो आले ॥९०॥
कळो आले तुज तत्त्वविवरण । महावाक्यखूण पावशील ॥९१॥
पावशील मज देवा दीनानाथा । संसाराची व्यथा दुरी केली ॥९२॥
दुरी केली व्यथा ब्रह्मनिरुपणे । आतां विवरण सर्वकाळ ॥९३॥
सर्वकाळ आतां सार्थक जाहला । भला कळो आला नरदेह ॥९४॥
नरदेही ज्ञान पाहतां सुटिजे । येर सर्व कीजे निरर्थक ॥९५॥
निरर्थक काया कारणी लागली । विवेके भंगली देहबुद्धि ॥९६॥
देहबुद्धि गेली आत्मबुद्धि होतां । कर्त्यासी धुंडिता कार्य नाही ॥९७॥
कार्य नाही खरे कारणी पाहतां । तद्रूप हे आतां समाधान ॥९८॥
समाधान रामीरामदासी जाले । विचाराने केले संगातीत ॥९९॥


N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP