मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पाळणा

देवताविषयक पदे - पाळणा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


१०६६.
( चाल-अंजनीगीताची )
आतां येथे तुजविण । कैसा राहिला माझा प्राण ।
नाही राम ना रावण । राहूं मी कोठे ॥ध्रु०॥
त्रिजटा बोले जानकीसी । वत्से जासी अयोध्येसी ।
आतां माझी गती कैसी । होईल गे सीते ॥१॥
जन्मांतरी पाप केले । म्हणुनी राक्षसकुळा आले ।
राम परब्रह्म सांवळे । अतरले मज ॥२॥
मी तंव राक्षस कुळहीन । नाही केले जप तप ध्यान ।
राम माझा अभिमान । धरिल गे कैसा ॥३॥
सीता बोले त्रिजटेबाई । माझी सर्वस्वे तूं आई ।
तुजला ठाव रामापायी । देईन मी आतां ॥४॥
ऐसी बोले मंजुळ वाणी । त्रिजटा बैसेचि ये ठाईनी ।
रामदासाचा अभिमानी । आणी मी येथे ॥५॥

१०६७.
( अंजनगीत )
लंकेहूनी अयोध्ये येतां । राम लक्ष्मण सीता ।
हनुमंते अंजनी माता । दाखविली रामा ॥१॥
चौघें केला नमस्कार । काय बोले रघुवीर ।
माते तुझिया कुमरे थोर । उपकार केला ॥२॥
सीताशुद्धी येणे केली । लक्षुमणाची शक्ति हरिली ।
लंका जाळुन निर्दाळिली । राक्षससेना ॥३॥
अहिरावण महिरावण जाणा । घात करिती आमुचे प्राणा ।
भवानी रुपे दोघां जणा । रक्षियेले येणे ॥४॥
माते तुझिया उदरी जाण । हनुमंत जन्मले रत्न ।
आवघे माझे रामायण । याचेनी योगे ॥५॥
आठरा पद्म वानरभार । रामे युद्ध केले थोर ।
सिळा सेतू सिंधू फार । सायासे केला ॥६॥
ऐकुनी पुत्राची ही ख्याती । अंजनी तुच्छ मानी चित्ती ।
म्हणे कां बा रघूपती । वहासी ओझे ॥७॥
हाकां माझ्या उदरी आला । गर्भीहुनी कां नाहे गळाला ।
आपण असतां कष्टवीला । स्वामी कां राम ॥८॥
माझी ये दुग्धाची ही प्रौढी । कळिकाळाची नरडी मुरडी ।
रावणादिक बापुडी । घुंगुर्डी काय ॥९॥
क्षणामध्ये रावण वधुनी । जरि कां आणितां राघवपत्नी ।
तरी पुत्राचा माझेमनी उल्हास होता ॥१०॥
असत्य वाटेल रामा बोली । दुग्धधारा ते सोडिली ।
शिळा उदरी खोचुन गेली । त्रिखंडे तेव्हां ॥११॥
सीता बोले अंजनीसी । बाळावरि कां कोपित होसी ॥
आज्ञा नाही हनुमंतासी ॥ श्रीरामे केली ॥१२॥
पाहुनी तिच्या पराक्रमा । आश्चर्य वाटले रामा ।
रामदासा दिधला प्रेमा । श्रीरामापायी ॥१३॥

१०६८. ( एकताल पंचक )
वेध लागला रामाचा । सुरवरविश्रामाचा ॥ध्रु०॥
तेथे सुरवरनरकिन्नरविद्याधरगंधर्वाचा मेळा ॥
तेथे गायनकळा रंग आगळा । वाहे अमृतवेळा ॥
तो सुखसोहळा देखुन डोळा । लाचावे मनमेळा ॥१॥
एकताल मृदांगे श्रुति उपांगे । गाती नवरसरंगे ॥
एकरंग सुरंगे दाविती संगे । सप्तस्वरांची आंगे ॥
एक अनेक रागे आलापयोगे । बिकट ताल सुधांगे ॥
एक झकिट किटकिट थरिक थरिक । वाजती चपळांगे ॥२॥
तेथे खणखणखणखण टाळ वाजती । झणझणझणझण यंत्रे ॥
तेथे दणदणदणदण मृदंग मंजुळ । तालबद्ध परतंत्रे ॥
तेथे चणचणचणचण शब्द बोलती । वाणी चपळ सत्पात्रे ॥
तेथे घणघणघणघण घंटा वाजती । अनुहाते शूळमंत्रे ॥३॥
तेथे झगझगझगझग झळकति रत्ने । खचित बैसे शोभा ॥
तेथे धगधगधगधग तेज आगळे । लावण्याचा गाभा ॥
तेथे घमघमघमघम सुगंध परिमळ । षट्पद येती लोभा ॥
पवनतनुज दासाचे मंडण । निकट राहिला उभा ॥४॥

१०६९.
( राग-मारु; ताल-त्रिताल )
नये नये नये राघव आजि कां नये ॥ध्रु०॥
जीव जीवाचा जप शिवाचा । कृपाळु दीनाचा राघव० ॥१॥
प्राण सुरांचा मुनिजनांचा । भरवंसा तयाची ॥२॥
विसर जाला काय तयाला । दासांनी गोंविला ॥३॥

१०७०.
( राग-पावक; ताल-धुमाळी )
अव्हेरिले वाटे रामे वैभव काय आतां ।
करुन देहाचे दहन पावेन रघुनाथा ॥ध्रु०॥
दिवस पुरले रामाचे भरत वाट पाहे ।
अश्रु पूर्ण निरज डोळा कंठ दाटताहे हो ॥१॥
जनकजननी जिवलग बंधु स्वामि माझा ।
कैसा देव दयाळु आत्माराम राजा ॥२॥
करुनि निश्चयो दहनाचा पुरिमाजिं आला ।
चिन्ह देखोनि भरताचे लोक हडबडिला ॥३॥
जनस्वजन रुदती रामदास स्थिती ।
तंव आनंदाची गुढी घेऊन रुद्र येती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP