विविध विषय - पंचीकरण
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
७३१.
माणुसाचे ब्रह्म होते कोणेपरी । ऐसे तूं विचारी आलया रे ॥१॥
आलया माणुस हे कोणा म्हणावे । बरे हे जाणावे शोधुनीयां ॥२॥
शोधुनीयां पाहतां स्थूळाचा चाळक । सूक्षमाचा एक मनप्राण ॥३॥
मनप्राणेविण हे कांही घडेना । हेंचि आणा मना विवेकी हो ॥४॥
विवेकी हो तुम्ही विवेक पहावा । संसाराचा गोंवा कोण करी ॥५॥
कोण करीतसे सर्वही करणी । दास निरुपणी सावधान ॥६॥
७३२.
माणुसाचे ब्रह्म शोधितां होईल । प्रचीती येईल रोकडीच ॥१॥
रोकडी प्रचीती होते गुरुमुखे । फुका सर्व सुखे हातां येती ॥२॥
हातां येती बीजे सज्जनाची गुजे । प्रचीतीच्या भोजे आनंदला ॥३॥
आनंदला प्राणी सज्जन सेवितां । क्षुधायी जेवितां तृप्त होती ॥४॥
तृप्त जाली बुद्धि निर्गुणाची शुद्धि । लागतां समाधी रामदासी ॥५॥
७३३.
चारी देह पिंडी चत्वार ब्रह्मांडी । अष्ट देह प्रौढी बोलिजेल ॥१॥
बोलिजेल श्रोती अवधान द्यावे । दुश्चित नसावे निरुपणी ॥२॥
निरुपणी अष्ट देह ते कवण । स्थूळ लिंग जाण कारण तो ॥३॥
चौथा देह जाण तो महाकारण । पांचवे लक्षण विराटाचे ॥४॥
हिरण्यगर्भ हेत आणि अव्याकृत । आठवा निश्चित मूळमाया ॥५॥
जन्म अष्टदेही साक्षी तो विदेही । रामदासी नाही जन्ममृत्यु ॥६॥
७३४.
भूतपंचकाचे पंचवीस गुण । याचे स्थूळ जाण उभारले ॥१॥
उभारले स्थूळ पांचा पंचकांचे । तेंचि तूं हे साचे केंवि घडे ॥२॥
केंवि घडे दृष्टा दृश्य एकरुप । दृष्ट्याचे स्वरुप वेगळेंचि ॥३॥
वेगळेंचि जाण अस्थि मांस त्वचा । विस्तार भूतांचा जाणताहे ॥४॥
जाणताहे द्रष्टा स्थूळाचा जाणता । विदेही तत्त्वता दास म्हणे ॥५॥
७३५.
काम क्रोध शोक मोह आणि भय । पंचधा अन्वय आकाशाचा ॥१॥
धांवण चळण आणि आकोंचन । वायो प्रसरण निरोधन ॥२॥
क्षुधा तृषा निद्रा मैथुन आलस्य । तेजाचे हे अंश पंचविधा ॥३॥
लाळ मूत्र शुक्र रक्त आणि मज्जा । आप जाण बोजा पंचविधा ॥४॥
अस्थि मांस त्वचा नाडी रोम अंश । दास म्हणे वास देहातीत ॥५॥
७३६.
पृथ्वी आप तेज वायु ते आकाश । पांचाचे हे अंश पंचवीस ॥१॥
अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम । आपाचेंही वर्म सांगईन ॥२॥
शुक्लीत शोणित लाळ आणि मूत्र । स्वेद हे निश्चित पांच तत्त्वे ॥३॥
क्षुधा तृषा जाण आलस्य शयन । पांचवे मैथुन तेज साचे ॥४॥
चळण वळण आणि प्रसारण । वायो निरोधन आकोंचन ॥५॥
काम क्रोध शोक मोह आणि भय । स्थूळ देहान्वय पंचवीस ॥६॥
पंचवीस तत्त्वी स्थूळ देह वर्तत । ऐके सावचीत लिंगदेह ॥७॥
अंतःकरण मनबुद्धि आणि चित्त । पांचवा निश्चित अहंकार ॥८॥
प्राण आणि अपान व्यान आणि उदान । समान हे जाण पंच वायो ॥९॥
चक्षु श्रोत्र घ्राण आणि त्वचा । अंश हा तेजाचा ज्ञानेंद्रिये ॥१०॥
वाचा पाणी पाद शिस्न आणि गुद । आपचि प्रसिद्ध कर्मेंद्रिये ॥११॥
शब्द स्पर्श रुप रस आणि गंध । पांचही प्रसिद्ध विषय हे ॥१२॥
ऐसे पंचवीस लिंगदेही अंश । हेंचि पांचही तत्त्वे जाली ॥१३॥
७३७.
अंतःकरण मन बुद्धि आणि चित्त । दृढ सावचित्त अहंकार ॥१॥
व्यानु तो समानु उदानु तो प्राणु । पांचवा अपानु वायु जाण ॥२॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण । तेज अंश जाण पंचविधा ॥३॥
वाचा पाणि पाद शिस्न आणि गुद । आपाचे प्रसिद्ध पंचगुण ॥४॥
शब्द स्पर्श रुप रस आणि गंध । पृथ्वी हे विशद दास म्हणे ॥५॥
७३८.
जडत्व कठिण ते ते पृथ्वी जाण । मृदु ओलेंपण जळ आप ॥१॥
आप नाना रस धातु बहुवस । उष्णता तेजस तेंचि तेज ॥२॥
वायु स्तब्ध चळ आकाश निश्चळ । मायिक सकळ दास म्हणे ॥३॥
७३९.
होते आठवण तेंचि अंतःकरण । आतां सावधान मन ऐका ॥१॥
संकल्प विकल्प होय नव्हे वाटे । तेंचि मन खोटे काल्पनिक ॥२॥
होय नव्हे ऐसा अनुमान जाला । निश्चयोचि केला तेचि बुद्धि ॥३॥
निश्चयचि केला याचेंचि चिंतन । तेंचि चित्त जाण निश्चयेंसी ॥४॥
अहंकारासवे देह चालताहे । दास म्हणे पाहे अनुभवे ॥५॥
७४०.
श्रोत्री अंतःकरण त्वचेमध्ये मन । चक्षूंमध्ये जाण बुद्धि आहे ॥१॥
जिव्हेमध्ये चित्त नाना स्वाद पाहे । घ्राणामध्ये आहे अहंकार ॥२॥
सूक्ष्माचे मूळ शोधुनी पहावे । वर्म पडे ठावे दास म्हणे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 26, 2011
TOP