मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


८२७.
अहो जना तुम्ही भजा निरंजना । चुकती यातना संसारींच्या ॥१॥
संसारीची माया सर्व वोरंगले । देह खंगेल अंतकाळी ॥२॥
अंतकाळी करी कोण सोडवण । सोयरे पिसुण दुरावले ॥३॥
दुरावले सर्व आपुले पारिखे । तेथे कोण राखे जिवलग ॥४॥
जिवलगे जाती फिरोनियाम घरा । मग तुज दारा पुत्र कैंचे ॥५॥
कैंचे पुत्र जन आपुले पारिखे । सर्वही सारिखे कळो आले ॥६॥
कळो आले परी आयुष्य वेंचिले । चुकोनियां गेले सर्व कांही ॥७॥
सर्व कांही होते संचिले वैभव । रात्रंदिस जीव लाउनीयां ॥८॥
लाउनियां जीव जीवे मेळविले । ते घरी राहिले सर्व कांही ॥९॥
सर्व कांही नये तुज समागमे । म्हणोनियां भ्रमे भुलो नको ॥१०॥
भुलो नको भ्रमे संसारी आलया । कैसी आहे माया ओळखावी ॥११॥
ओळखावी माया आणि परब्रह्म । तेणे तुझा भ्रम नासईल ॥१२॥
नासईल भ्रम श्रवण करितां । विचारे पाहतां सारासार ॥१३॥
सारासार जंव नाही विचारणा । तंव तूं कारणा चुकलासी ॥१४॥
चुकलासी देव देखत देखतां । मुक्ती सायुज्यता अंतरली ॥१५॥
अंतरली मुक्ति जाली अधोगति । निरंजन चित्ती न धरितां ॥१६॥
न धरितां दृढ सोय शाश्वताची । शीण वाउगाचि नाना कर्मी ॥१७॥
नाना कर्मी तुज काय प्राप्त जाले । उगवे पेरिले निश्चयेसी ॥१८॥
निश्चयेसी देव धुंडिता पाविजे । येर सर्व कीजे निरर्थक ॥१९॥
निरर्थक देव नेणतां सर्वही । येथे कांही नाही अनुमान ॥२०॥
अनुमाने केले ते ते व्यर्थ गेले । प्रचीतीने जाले समाधान ॥२१॥
समाधान घडे सज्जनसंगती । चुके अधोगती गर्भवास ॥२२॥
गर्भवास चुके सद्गुरु करितां । विवेके धरितां नित्यानित्य ॥२३॥
नित्यानित्य जंव नाही विचारिले । तंव काय केले आलया रे ॥२४॥
आलया रे पुन्हां कासया शिणावे । विवेके पहावे मोक्षपद ॥२५॥
मोक्षपद कैसे हेंचि विचारावे । श्रवण करावे निरंतर ॥२६॥
निरंतर जेथे श्रवण मनन । निजध्यासे जाण साक्षात्कार ॥२७॥
साक्षात्कार जंव सिद्ध पाविजेना । तरी हे यातना चुके केंवि ॥२८॥
केंवि चुके जन्ममृत्यु अनुमाने । केले संदेहाने कासावीस ॥२९॥
कासावीस होते समाधान जाते । ते जोडे मागुते विवरतां ॥३०॥
विवरतां ब्रह्म जीव मायाभ्रम । देवभक्तवर्म ओळखावे ॥३१॥
ओळखावे वर्म हे मीतूंपणाचे । नित्य निर्गुणाचे निरुपण ॥३२॥
निरुपणेविण जे कांही साधन । तेंचि ते बंधन निश्चयेसी ॥३३॥
निश्चयेसी बरा करावा निवाडा । तत्त्वे तत्वझाडा सप्रचीत ॥३४॥
सप्रचीत झाडा होतां माइकांचा । मग कोण कैंचा आपण तो ॥३५॥
आपण तो जाला विवेकाने केला । भ्रमचि उडाला सर्व कांही ॥३६॥
सर्व कांही कळे विवेके निवळे । आपेंआप गळे मीतूंपण ॥३७॥
मीतूंपण कैचे कोठे आपणासी । होते एके दिशी हारपले ॥३८॥
हारपले जैसे आकाशी आभाळ । तैसे ते केवळ सर्व कांही ॥३९॥
सर्व कांही मिथ्या प्रचीतीस येते । निर्गुणाने होते समाधान ॥४०॥
समाधान जाले मीपण बुडाले । प्रबोधे उडाले सर्व कांही ॥४१॥
सर्व कांही नाही विवेके पाहतां । बाणले ते आतां पालटेना ॥४२॥
पालटेना ब्रह्मस्थिति हे आपुली । जरी कांही केली उठाठेवी ॥४३॥
उठाठेवी गेली शरीराच्या माथां । आपण तत्त्वतां वस्तुरुप ॥४४॥
वस्तुरुप तो मी सज्जन सांगती । तिन्ही ही प्रचीति आणुनीयां ॥४५॥
आणुनियां केला वस्तुचा निश्चय । आतां हा संशय कोण धरी ॥४६॥
कोण धरी मिथ्या साच सांडूनीयां । ओझे कां रे वायां मीपणाचे ॥४७॥
मीपणाचे मूळ शोधितां सुटले । विवेके तुटले मायाजाळ ॥४८॥
मायाजाळ जाले पांचाजणी केले । ते मज लाविले कोणेपरी ॥४९॥
कोणेपरी कैसे येते अनुमाना । साधकु दिसेना साध्य जाला ॥५०॥
साध्य जाला बोधे जाहला साधक । तयासी बाधक कोण करी ॥५१॥
कोण करी सर्व ते तरी पहावे । पाहोनी रहावे समाधान ॥५२॥
समाधान कर्ता कोण सर्व धर्ता । कर्तृत्वाची वार्ता कोठे लागे ॥५३॥
कोठे लागे वार्ता कर्ता जगदीश । तया केंवि दोष लागो शके ॥५४॥
लागो शके दोष हे कई घडावे । सर्व केले देवे हे तो खरे ॥५५॥
खरे आले केले देवाचिया माथां । मज काय आतां संमंधु हा ॥५६॥
संमंधु हा जाला पांचा भूतांचा । अष्टधा मायेचा खेळ जाला ॥५७॥
खेळ ऐसा जाला प्रकृतीने केला । लावितां मजला कोणे परी ॥५८॥
कोणेपरी न्याय अन्याय सारिखा । म्हणोनियां देखा गुप्त जालो ॥५९॥
गुप्त जालो आतां पाहतां दिसेना । नये अनुमाना ब्रह्मादिकां ॥६०॥
ब्रह्मादिकां माझा पडिला संदेहो । तुम्ही कां वेडी हो ओळखाना ॥६१॥
ओळखाना कर्ता कोणाला लावितां । शाहणे दिसता ऐसे कैसे ॥६२॥
ऐसे कैसे तुम्ही एकाचे एकासी । लावितां कोणांसी कर्तेपण ॥६३॥
कर्तेपण बरे शोधुनी पहा रे । मग तुम्ही व्हा रे कासावीस ॥६४॥
कासावीस जाले कितीएक गेले । कर्तृत्व बोलिले निर्गुणासी ॥६५॥
निर्गुणासी गुण हे कई घडावे । संदेही पडावे मीपणाचे ॥६६॥
तयावीण सीण कासया करितां । संदेह धरितां निर्गुणाचा ॥६७॥
निर्गुणाचा अंत पाहतां अनंत । तेथे अंतवंत लावूं नका ॥६८॥
नका नका तुम्ही बोलो अनुमाने । तत्त्वे स्थानमाने बरी शोधा ॥६९॥
बरे शोधूं जातां देव माया जीव । या तिघां कर्तृत्व आढळेना ॥७०॥
आढळेना भूती कर्तृत्व पाहतां । कोणीकडे आतां धुंडाळावे ॥७१॥
धुंडाळावे परी कोठेंचि लागेना । कासावीस मना होत आहे ॥७२॥
होत आहे परी ते पिंडी पहावे । देहे प्राणे जीवे किंवा ब्रह्मे ॥७३॥
ब्रह्म निर्विकार त्या नाही आकार । जीव तो साचार अंश त्याचा ॥७४॥
त्याचा अंश देहसंबंधे कल्पिले । ब्रह्माशांने केले हे घडेना ॥७५॥
घडेना की प्राण कर्ता अप्रमाण । श्वासोच्छवास जाण करणे त्याचे ॥७६॥
त्याचे करणे नव्हे स्थूळ अचेतन । अंतःकरण मन जाणितेंचि ॥७७॥
जाणतेंचि परी ते कांही करीना । वायो तो जाणेना कांही केल्या ॥७८॥
कांही केल्या कर्ता ठायींच न पडे । आतां कोणेकडे कर्तेपण ॥७९॥
कर्तेपण नाही एकाचे मस्तकी । हे बरे विवेकी ओळखावे ॥८०॥
ओळखावे करणे आहे समस्तांचे । त्रिगुण भूतांचे विचारावे ॥८१॥
विचारावे जाले बहुतांचे केले । ते मज लाविले कोणेपरी ॥८२॥
कोणेपरी एकाविण एक घडे । कांहीच न घडे सर्वेविण ॥८३॥
सर्वत्रांचे केले सर्वांस लागले । ते तुम्ही लाविले मज कैसे ॥८४॥
कैसे माझे रुप मज सांपडेना । कांहीच घडेना माझ्या ठायी ॥८५॥
माझ्या ठायी मज ठावचि नाडळे । रुप हे नाकळे माझे मज ॥८६॥
माझे मज नाही पाहतां मीपण । तेथे कर्तेपण वाव जाले ॥८७॥
वाव जाले बरे हिशेबी पाहतां । विवेके राहतां समाधान ॥८८॥
समाधान देही असोनी विदेही । कर्तृत्वाचा नाही अभिमान ॥८९॥
साभिमान कैंचा मेळ हा भूतांचा । भूते त्रिगुणाचा सृष्टिभाव ॥९०॥
सृष्टिभाव जाला भूतांचा उद्भव । देव निरवयव जैसा तैसा ॥९१॥
जैसा तैसा देव जाण अनुभवे । दृश्य हे स्वभावे होत आहे ॥९२॥
होत जात जीव सर्व भावाभाव । कळो आली माव मायिकांची ॥९३॥
मायिकांची माव संती निरोपिली । प्रत्ययासी आली जेथे तेथे ॥९४॥
जेथे तेथे राम आत्मा पूर्णकाम । योगियांचे धाम निरंतर ॥९५॥
निरंतर देव अंतरेना कदा । तुटली अपदा मीपणाची ॥९६॥
मीपणाची बुंथी बोधे उगवली । जन्माची जाहली सार्थकता ॥९७॥
सार्थकता जाली रामासी भजतां । दृढ धरुं आतां उपासना ॥९८॥
उपासना भक्त होउनी करीन । ज्ञान उद्धरीन अज्ञानासी ॥९९॥
अज्ञानासी ज्ञान रामाचे करणे । शीघ्र उद्धरणे रामदासी ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP