मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नामस्मरण

विविध विषय - नामस्मरण

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


५६१.
श्रीराम जयराम नाम दो अक्षरी । सहस्त्र नामांवरि ब्रीद गाजे ॥१॥
उफराट्या अक्षरी वाल्मिकवैखरी । वंदिजे सुरवरी ब्रह्मादिकी ॥२॥
शुक पढवितां मंदिरी नाम दो अक्षरी । वैकुंठामाझारी ख्याति जाली ॥३॥
रामदास म्हणे रामनामघोषे । त्रैलोक्याचे दोष निर्दाळिले ॥४॥

५६२.
रात्रंदिस मन राघवी असावे । चिंतन नसावे कांचनाचे ॥१॥
कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन । जन्मासी कारण हेचि दोन्ही ॥२॥
दोन्ही नको धरुं नको निंदा करुं । तेणे हा संसारु तरशील ॥३॥
तरशील भवसागरी बुडतां । सत्य या अनंताचेनि नामे ॥४॥
नामरुपातीत जाणावा अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥५॥

५६३.
सप्रचीत आणि प्रसिद्ध । सर्वकाळ स्वतःसिद्ध ॥१॥
राम अक्षरे ही दोनी । सेवा भावाच्या अनुपानी ॥२॥
अक्षरे सार रे सेविली । विषप्रचीतीस आली ॥३॥
रामीरामदास म्हणे । मज प्रचीत आली जेणे ॥४॥

५६४.
विश्वासला जेथे कैलासीचा राव । तेथे एक भाव दृढ धरा ॥१॥
दृढ धरा भाव वाल्मिकाचे परी । सर्व ऋषेश्वरी जाणिजे तो ॥२॥
जाणिजे वाल्मीकऋषिरामायण । तारिले पाषाण रामनामे ॥३॥
रामनामे उद्धरली ते गणिका । नेली दिव्य लोका याच देही ॥४॥
याच देही गति पावली कुंटणी । रामनाम वाणी उच्चारिता ॥५॥

५६५.
राम ऐसे उच्चारणे । शिवपथ्याकार होणे ॥१॥
राम सर्वकाळ ध्यावा । यासी आळस न करावा ॥२॥
वाल्हाकोळी होता निंद्य । नामे केला जगद्वंद्य ॥३॥
रामदास म्हणे सार । दोन्ही अक्षरे उच्चार ॥४॥

५६६.
नामाचा महिमा जाणे शूळपाणी । रामनाम वाणी उच्चारितां ॥१॥
उच्चारितां शिव सर्वांगे निवाला । मग विसावला रामनामी ॥२॥
रामनामी रती जाली पशुपति । आवडी पार्वती जपतसे ॥३॥
जपतसे विश्व विश्वनाथसंग । रामनाम योग काशीपुरी ॥४॥
काशीपुरी विश्वजनांसी पावन । जीवांसि जीवन रामनाम ॥५॥
रामनामे गती होत असे अंती । म्हणोनि बोलती वेदशास्त्र ॥६॥
वेदशास्त्रश्रुति स्मरति पुराणे । सर्वांसी कारण रामनाम ॥७॥
रामनामी भाव न धरी जो नर । जाणावा तो खर पापरुपी ॥८॥

५६७.
विषे शंकरा जाळिले । रामनामे शीतळ केले ॥१॥
रामनामाची औषधि । जेणे तुटे भवव्याधि ॥ध्रु०॥
शिवे केली काशीपुरी । विश्व नामे मुक्त करी ॥२॥
रामनामे पुरे कोड । न मानी त्यास घाली होड ॥३॥
रामदासी दृढभाव । संदेहासि केला वाव ॥४॥

५६८.
काशीविश्वेश्वर सर्वांसी उद्धरी । त्यासि मनी धरी सर्वकाळ ॥१॥
ज्योतिर्लिंगे बारा अंतरी धरावी । मग विवरावी निजरुपे ॥२॥
व्यंकटेश ध्यातां संपन्न करितो । जना उद्धरितो नाममात्रे ॥३॥
ध्यायी रामेश्वर रामचि ईश्वर । प्रचीत रोकडी विचाराची ॥४॥
विचाराचे मूळ शोधावे समूळ । होइजे निर्मळ निःसंदेह ॥५॥

५६९.
नाना रंग सेखी होताती वोरंग । सर्वदा सुरंग रामरंग ॥१॥
रामरंग कदा काळी वोरंगेना । तेथे राहे मना रंगोनियां ॥२॥
रंगोनीयां राहे तद्रूप होऊनी । मग जनी वनी समाधान ॥३॥
समाधान घडे राघवी मिळतां । मग दुर्मिळता कदा नाही ॥४॥
कदा नाही खेद सर्वहि आनंद । सुखाचा संवाद तेथे कैचा ॥५॥
संतसंगे जन्म सार्थक जहाला । राम सांपडला जवळीच ॥६॥
जवळीच राम असोनि चुकलो । थोर भांबावलो माईकांसी ॥७॥
माईकांसी प्राणी सत्यचि मानिती । सत्य ते नेणती जाणपणे ॥८॥
जाणपणे मनी अज्ञान थारले । तेंचि विस्तारले ज्ञानरुपे ॥९॥
ज्ञानरुपे भ्रांति सामावली चित्ती । संशय निवृत्ती नव्हे जेणे ॥१०॥
नव्हे तेणे रुप ठाउके रामाचे । जे का विश्रामाचे माहियेर ॥११॥
माहियेर घडे संशयनिवृत्ति । राम सीतापतीचेनी नामे ॥१२॥
रामनामरुप सर्वही निरसे । जो कोण्ही विश्वासे रामनामी ॥१३॥
रामनामी चित्त ठेवुनी असावे । दुश्चित नसावे सर्वकाळ ॥१४॥
सर्वकाळ गेला सार्थकी जयाचा । धन्य तो दैवाचा दास म्हणे ॥१५॥

५७०.
क्षण एक राम आठवितां चिती । तेणे उद्धरती कोटिकुळे ॥१॥
कोटिकुळे वाट पाहती तयाची । आवडी जयाची रामनामी ॥२॥
रामनामे तुटे कुळाचे बंधन । पुत्र तो निधान हरिभक्त ॥३॥
हरिभक्त एक जाहला प्रल्हाद । जयाचा गोविंद कैवारी ॥४॥
कैवारी हरि राखे नानापरी । ऐसा भाव धरी आलया रे ॥५॥
आलया रे हित विचारी आपुले । सर्वहि नाथिले मायाजाळ ॥६॥
मायाजाळ दिसे दृष्टीचे बंधन । जाणती सज्ञान अनुभवी ॥७॥
अनुभवी संतसज्जन देखसी । तेथे राघवासी ठायी पाडी ॥८॥
ठायी पाडी राम जीवांचा विश्राम । तेणे सर्व काम पूर्ण होती ॥९॥
पूर्ण होती सर्व तुझे मनोरथ । राघवाचा स्वार्थ मनी धरी ॥१०॥
मनी धरी सर्व देवांचा कैवारी । ध्यातसे अंतरी महादेव ॥११॥
महादेव सर्व जना उपदेसी । रामीरामदासी दृढ भाव ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP