मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
सूर्य

देवताविषयक पदे - सूर्य

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११५१.
( राग केदार; ताल-दादरा )
जयजय सूर्यराजा । जयजय सूर्यराजा ।
उपासना गुणे सूर्यवंश माझा ॥ध्रु०॥
धगधगीत सूर्य ऐसी उमपा देती ।
उदंड आले गेले तोचि आहे गभस्ती ॥१॥
असंभाव्य तेज प्रगट प्रतापे जातो ।
तयासी देखतां चंद्र भगवा होतो ॥२॥
अतुल तुळणा नसे सूर्यमंडळा ।
उपासनेमध्ये सूर्यवंशी जिव्हाळा ॥३॥
दास म्हणे आतां त्यासी काय तुळावे ।
जैसे आहे तैसे सकळ जनांला ठावे ॥४॥

११५२.
( राग-शंकराभरण; ताल-द्रुत एकताल )
दंडडमरुमंडित । पिनाकपाणी ॥ध्रु०॥
कंठी आहे हळाहळ । माथां आहे गंगाजळ ॥१॥
शिरी रुळे जटाभार । गळां फुंफती विखार ॥२॥
पांच मुखे पंधरा डोळे । गळां साजूक सीसाळे ॥३॥
हिमाचलाचा जामात । हाती शोभे सरळ गात ॥४॥
रामीरामदास स्वामी । चिंतीतसे अंतर्यामी ॥५॥

११५३.
( राग-भूप; ताल-त्रिताल )
देव हरे महादेव हरे हो ॥ध्रु०॥
कंठी गरळ गंगाजळ माथां । भालनयन शूळपाणि हरे हो ॥१॥
दंडी व्याळ विभूतीलेपन । पंचानन शिव शंभु हरे हो ॥२॥
उमाकांत निवांत निरामय । दासहृदय जय देव हरे हो ॥३॥

११५४.
( राग-श्रीराग; ताल-हनुमान ताल )
हरहर हरहर देव अपरांपर । मी एक किंकर मंदमती ॥ध्रु०॥
त्रिशूळ डमरु करी भुजंग नानापरी । धिंग जटाधारी स्मशानवासी ॥१॥
व्याघ्रांबर गजचर्म विभूति उधळण । अखंड स्मरण मुखी रामनाम ॥२॥
भाळनयन ज्वाळा माथां गंगाजळ । गळां रुळे रुंडमाळ थबथबीत ॥३॥
भिक्षा करोनी खाणे मसणीच राहणे । सिद्धि सोडुनी होणे वीतरागी ॥४॥
भाळी चंद्रकळा विषकंठ निळा । देव बहुत भोळा भक्तवत्सलु ॥५॥

११५५.
( राग-देस; ताल-द्रुतएकताल )
हरहर हरहर हरहर देवा महादेवा ।
परतर परतर परतर पावन देई सेवा ।
ध्याती ब्रह्मादिक मुनीवर किन्नर पुण्य ठेवा ।
तेथे मी एक मानव किंकर माझा कोण केवा ॥ध्रु०॥
धीर उदार अपार महिमा कोण जाणे ।
विधि शक बृहस्पति पन्नग फणिवर तोही नेणे ।
योगी उदासीन तापस सज्जन सुख बाणे ।
तूं एक ईश्वर तुजविण सकळिक दैन्यवाणे ॥१॥
जळधर नळधर शशिधर विषधर योगलीळा ।
पंचमुख पंचदशलोचन तेथे तीव्र ज्वाळा ।
रामनाम वदनींच निरंतर हाचि चाळा ।
महिमंडळ रक्षुनि कर्कश तो विषकंठ काळा ॥२॥
रघुनाथकथामृत तत्पर होउनि आदरेंसी ।
शतकोटी चरित्र मथुनी निरंतर ऐकतोसी ।
दीनवत्सल देव विबुधविमोचन सौख्यराशी ।
कुळदैवत पावन फावले अवचट रामदासी ॥३॥

११५६.
( राग-श्रीराग; ताल-धुमाळी )
रंगी नाचतो त्रिपुरारी लिलानाटकधारी । मंदरजावर त्रिपुरसुंदर अर्धनारीनटेश्वर ।
नाचे शंकर सकळ कळाकर । विश्वासी आधार ॥ध्रु०॥
झुळझुळझुळझुळ शिरी गंगाजळ । झळझळ मुकुटी किळ ॥
लळलळलळलळ लळित कुंडले । भाळी इंदुज्वाळ ॥
सळसळसळसळ सळकती रसना । वळवळवळिती व्याळ ॥
हळहळहळहळ कंठी हळाळ । गायनस्वर मंजुळ ॥१॥
थबथबथबथब गळती सद्या । रुंडमाळिका कंठी ॥
चपचपचपचप हस्तक लवती । दस्तक धरी धृर्जटी ॥
खडखडखडखडखड व्याघ्रांबर । गजचर्म परवंटी ॥
भडभडभडभडभड धूसर उधळत । चिताभस्म निजउटी ॥२॥
किणि किणि किणि किणि वाजति किंकिणि ।
घणघणघणघण खणाणी । झणझणझण वांकी चरणी ।
दणदणदण धरणी । खणखणखणखण टाळ उमाळे ।
रुणझुण वेत्रे पाणी । गुणगुणगुणगुण वर्णिती वाणी ।
खुणखुणखुण निर्वाणी ॥३॥
टिमिटिमिटिमि मृदंग गंभीर । डिमिडिमिडिमिडिमि डिमर ॥
धिमिधिमिधिमि दुदुंभी गर्जे । झिमिझिमिझिमि झल्लर ॥
घुमघुमघुमघुम येवजगमकत । दुमदुमदुम अंबर ॥
ततथै ततथै धिकिटधिकिट । म्हणती विद्याधर ॥४॥
थरथरथरथर कंपित गमके । गरगरगरगर भ्रमर ॥
सरसरसरसर कंपित चमके । धुरधुरधुरधुर गंभीर ॥
परपरपर म्हणती सुरवर । हरहरहरहर शंकर ॥
वरवरवरवर दासा दिधला । तरतरतर दुस्तर ॥५॥

११५७.
( चाल-संतपदाची जोड० )
सांब दयेचे देणे, मज हे० ॥ध्रु०॥
धन सुत दारा बहु दुस्तरा, सत्यासत्य ही देणे ॥ मज० ॥१॥
स्वात्मसुखाची प्रभा उजळली, सर्व सुखाचे लेणे ॥मज० ॥२॥
दास म्हणे मज आसचि नाही, शिवनामामृत घेणे ॥मज० ॥३॥

११५८
( राग-गौड मल्हार; ताल-धुमाळी )
पाहा कैसे शंकराभरण । आभरण नोहे इतरां मरण ॥ध्रु०॥
मस्तकी गंगाजळ भाळनयनी ज्वाळ । कंठि धरिले हळाहळ ॥
ज्याचे सर्वांगी खेळती नाना व्याळ । गळां रुळताहे मुंडमाळ ॥१॥
त्रिशूळ डमरु करी एके करी खापरी । भिक्षा मागताहे दारोदारी ॥
सदा सर्वदा स्मशानवास करी । कांतडी लोंबती आंगावरी ॥२॥
कक्षे रक्षेचे पोते ढोर भलतीकडे जाते । तयासी मारीत धांवे गाते ॥
भय वाटते देखतां जोगीयाते । भोंवती मिळाली भूते प्रेते ॥३॥
पुढे सिद्धी तिष्ठति न बोले तयांप्रती । उदासीन भोळे चक्रवर्ती ॥
देणे भक्तांसी जयाचे अप्रमीती । दास म्हणे नाही ऐसी स्थिती ॥४॥

११५९.
( चाल-डफगाणे )
आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला ।
पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥
उमा सुंदर सुकुमार । सुलक्षण मनोहर । तीस पाहिला भर्तार ।
महादेव ॥२॥
माथां मोठा जटाभार । आंगी फुंफाती विखार ।
तिसरे नेत्री वैश्वानर । भडभडीत ॥३॥
गळां साजुक सीसाळे । थबथबां रक्त गळे ।
शंखपाळे धवळे । व्याळ वळवळिती ॥४॥
सदा स्मशानी राहणे । ते राखेचे ऊधळणे ।
भोंवती भूते कोणकोणे । कोण जाणे ॥५॥
बहुता दिवसांचा जुनाट । भूतकेते कडकडाट ।
रुप तयाचे अचाट । वर्णवेना ॥६॥
हाती त्रिशूल डमर । काखे भ्यासुर व्याघ्र्यांबर ।
मोठे पिनाक सरळ । शोभतसे ॥७॥
हाती नराची खापरी । भिक्षा मागे दारोदारी ।
माळरुद्राक्षांच्या हारी । जेथे तेथे ॥८॥
ढोर लाताड चूकले । गाते बाजेचे घेतले ।
दंड कमंडलु शोभले । भस्म पोते ॥९॥
सुंदर लेख ते लल्लाटी । गंगा थबथबां वाहती ।
लाळ सर्वांगी गळती । भुजंगाची ॥१०॥
नवरी सुंदर रुपड । नवरा आणीला तों कोड ।
वोले हात्तीचे कांतड । आंगावरी ॥११॥
बैल बहुता दिवसांचा । मोटा सांटा गोमाशांचा ।
लोक मिळाला नगरींचा । पहावया ॥१२॥
नवरी नेटकी सुंदरा । नवरा पाहिला म्हातारा ।
चुरचुर लागली नगरा । बहुसाल ॥१३॥
लोकीं हासेवया केल्या । बैले गोमाशा लाविल्या ।
तेणे कासावीस जाल्या । नगरनारी ॥१४॥
लोक पळोनियां जाती । मागे गोमाशा धांवती ।
रागे तडतडा तोडिती । सर्वांगासी ॥१५॥
नवरा मंडपासी आला । अंतरपाट तो धरीला ।
नवरा उदंड वाढला । वरुन पाहे ॥१६॥
अक्षत टाकावया वरी । भट्टी उचलिली नवरी ।
एकवीस सर्वांगावरुता दूरी । मस्तक गेला ॥१७॥
जैसे तैसे लग्न जाले । जन उदंड मिळाले ।
पुढे उटणे आरंभिले । कौतुकाने ॥१८॥
नवरी हंसरुप चाले । तीवरि भुजंग फुंपाले ।
लोक म्हणती भुजंग आले । धांवा धांवा ॥१९॥
सर्प आवरिले सकळ । ऊटणे घेउनि बाळ ।
जळे भीजले दुकुळ । गंगा वाहे ॥२०॥
धर्मा हळदी लागली । विभूति अवघी उकरंबिली ।
साडी आवघी नासली । रक्तबिंदी ॥२१॥
व्याघ्रांबर खडबडीले । गजचर्म लवथविले ।
तेणे मन कंटाळले । वर्‍हाड्यांचे ॥२२॥
तेल घालूं गेली सिरी । तेथे देखिली सुंदरी ।
सवती आहे इयेवरी । म्हणती लोक ॥२३॥
पुढे ढवळे गाईले । तेथे नामनाम आले ।
प्रेम नवर्‍यासी चालिले । गळती अश्रुं ॥२४॥
म्हणती बाधा जाली वारा । कोणी धांवा पंचाक्षरा ।
रक्षा करितां संसारा । निघती ज्वाळा ॥२५॥
पळा पळा आगी आली । नगरामध्ये बोंब जाली ।
परि ते लवकरी । विझाली जाली सुखे ॥२६॥
नवरील अलंकार । शंखमण्यांचा श्रृंगार ।
जोगी जोगीणी वोहर । पाहती लोक ॥२७॥
देवे रुप पालटीले । आंगी सौंदर्य बाणले ।
वोहर सरपाडे देखिले । नगरलोकी ॥२८॥
धन्य धन्य ते वोहर । सुंदर उमा महेश्वर ।
नाना रत्नांचे श्रृंगार । झमकताती ॥२९॥
वोहर सुंदर शोभती । बैल दीसे जैसे हत्ती ।
जिकडे तिकडे लखलखिती । दिव्यांबरे ॥३०॥
दास म्हणे दाता थोर । आमुचा देव रामेश्वर ।
देवभक्तांसी अंतर । आडळेना ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP