२५६ .
भाविला नवजाये तेथे भाव ठेवी । कैसे हो गोसावी सांगतसा ॥१॥
सांगतसां परी नये अनुमाना । हे कांही कळेना आम्हांलागी ॥२॥
आम्हांलागी कळे हे कांही सांगा हो । गोसांवी आहा हो भले तुम्ही ॥३॥
भले तुम्ही आहां मज उमजावे । उकलुनि द्यावे सर्व कांही ॥४॥
सर्व कांही कळे सद्गुरु करितां । दास म्हणे आतां गुरु करी ॥५॥
२५७ .
गुरु म्हणे कांही देवो । शिष्य म्हणे मंत्र येवो ॥१॥
करावया विषयार्चन । पोषण जाले ब्रह्मज्ञान ॥२॥
गुरु दाटुन दे उपदेश । अनाचार करी शिष्य ॥३॥
रामीरामदास म्हणे । धिग धिग जळो त्याचे जिणे ॥४॥
२५८ .
गुरु मरता शिष्य रडता । विपरीत दोघांची वार्ता ॥१॥
ऐसे शिष्य ज्ञाते मूढ । तयांसि बोध नाही दृढ ॥२॥
गुरुस गुरुपणाचा ताठा । शिष्यास रितेपणाचा फांटा ॥३॥
रामीरामदास म्हणे । व्यर्थ गेले त्याचे जिणे ॥४॥
२५९ .
गुरु शब्दज्ञानकाबाडी । शिष्य विषयांचा बराडी ॥१॥
हा तो मांडिला विनोद । क्रियेविण शब्दबोध ॥२॥
गुरु आस धरुनि बोले । शिष्य वरपंगाने डोले ॥३॥
कांही देतां आनंदावे । रिते येतां कुसमुसावे ॥४॥
गुरु रागे फिरवी डोळे । शिष्य त्यावरी चवताळे ॥५॥
शिष्य विषयी बापुडे । गुरु आस करी वेडे ॥६॥
आशा सुटेना दोघांची । तारांबळी परमार्थाची ॥७॥
रामीरामदास म्हणे । इतुके लोभाचे करणे ॥८॥
२६० .
ऐसा कैसा रे परमार्थ । जळो जळो जिणे व्यर्थ ॥१॥
युक्ताहार करवेना । निद्रा आली धरवेना ॥२॥
रसाळ गाणे नाचणे । तेथे सावधान होणे ॥३॥
सर्वकाळ करणे रळी । हास्य विनोद टवाळी ॥४॥
श्रवणी आवरेना क्रोध । सिद्ध होतां आतां बोध ॥५॥
देहपांग पडिला गळां । म्हणे मी चौदेहांवेगळा ॥६॥
मन चंचळ आवरेना । नीच उत्तर साहवेना ॥७॥
रामदास म्हणे भावे । स्थूल क्रियेस नव जावे ॥८॥