मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग

विविध विषय - भक्तिपर अभंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


४७१ .

ठकाराचे ठाण करी चापबाण । माझे ब्रह्मज्ञान ऐसे आहे ॥१॥

रामरुपी देहो जाला निःसंदेहो । माझे मनी राहो सर्वकाळ ॥२॥

मुखी रामनाम चित्ती घनश्याम । होतसे विश्राम आठवीतां ॥३॥

रामदास म्हणे रामरुपावरी । भावे मुक्ति चारी ओंवाळीन ॥४॥

४७२ .

कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत । तेथे मी निवांत बैसईन ॥१॥

बैसईन सुखरुप क्षणएक । पाहीन विवेक राघवाचा ॥२॥

राघवाचा पार अनंत अपार । नाही पारावार स्वरुपासी ॥३॥

स्वरुप रामाचे अत्यंत कोमळ । जेथे नाही मळ माईकांचा ॥४॥

माईकांचा मळ जाय तत्क्षणी । रामदरुशणी रामदास ॥५॥

४७३ .

देवभक्तां भेटि जाली । सृष्टी आनंदे कोंदली ॥१॥

आजी आनंद आनंद पाहता राम परमानंद ॥२॥

रामीरामदास म्हणे । अनुभवाचिये खूणे ॥३॥

४७४ .

जेथे जावे तेथे राम समागमी । आतां कासया मी खंती करुं ॥१॥

खंती करुं ज्याची तो समागमेंचि । पाहतां सुखाची घडी होय ॥२॥

होय देव खरा भूमंडळवासी । जातां दिगंतासी सारिखाचि ॥३॥

सारिखाचि जनी वनी वनांतरी । तो गिरिकंदरी सारिखाचि ॥४॥

सारिखाचि कडाकपाटी पाहातां । राम आठवितां दास म्हणे ॥५॥

४७५ .

रामेंविण देश तो जाण विदेश । विदेशाचा देश रान करी ॥१॥

राम भेटे ज्यासी तो नव्हे विदेशी । सर्व देश त्यासी आपुलेंचि ॥२॥
आपुलेचि देश या रामाकरितां । होय सार्थकता जेथे तेथे ॥३॥

जेथे तेथे राम देखतां विश्राम । संसारीचा श्रम आठवेना ॥४॥

आठवेना तेथे आठव विसर । दास निरंतर जैसा तैसा ॥५॥

४७६ .

संतोषोनी देवराव । भक्तां देतसे गौरव ॥१॥

आता कल्याण कल्याण । भक्तां अभयकर पूर्ण ॥२॥

सद्वासना आणि कामना । उपासना भक्तजनां ॥३॥

वंश क्षेम सदा । पूर्ण आयुष्य संपदा ॥४॥

माझा वियोग नाही त्यासी । ऐक्य जाले ते दासासी ॥५॥

४७७ .

देशकाळ वर्तमान । हा तो अवघाचि अनुमान ॥१॥

भक्ति करावी देवाची । घडी जाते सोनियाची ॥२॥

काळ वेळचि पाहतो । सदा सन्निध राहतो ॥३॥

रामीरामदास म्हणे । देह आहे जाइजणे ॥४॥

४७८ .

पुढे होणार कळेना । समाधान आकळेना ॥१॥

मना सावधान व्हावे । भजन देवाचे करावे ॥२॥

ऋणानुबंधाचे कारण । कोठे येईल मरण ॥३॥

रामीरामदास म्हणे । भजने अमरचि होणे ॥४॥

४७९ .

चटक चेटकी दटावा । लाटुनियां वाटा लावा ॥१॥

भरण भक्ति करा वीतरागा । लालुच विषयांची त्यागा ॥२॥

मायिक तो रस विरस होतो । क्षणिक होऊनियां जातो ॥३॥
दास म्हणे जन पावन व्हावे । तेंचि निरुपण गावे ॥४॥

४८० .

लोभाचे बराडी कामी घाली उडी । पायांची वेंगडी वळतसे ॥१॥

सदा भक्तिविण जाले उपोषण । झड घाली अन्न खावयासी ॥२॥

मायाजाळ आगी सुटली अंतरी । परघरी चोरी करीतसे ॥३॥

आंग हे चोरितां आंगची सुजले । नाही झिजवीले रामालागी ॥४॥

रामदास म्हणे प्राणी भक्तिउणे । तयालागी सुणे आतळेना ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP