मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
गवळणी

देवताविषयक पदे - गवळणी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११३९.
( चाल-साधुसंतां मागणे )
गोपी म्हणती तूं कैसा रे कृपाळु । करितो म्हणसी भक्तांचा प्रतिपाळु ।
तुजकारणे जीव जाला रे विकळु । युगासारिखा कठिण जातो वेळू ॥ध्रु०॥
आम्ही अवस्था भुललो तुझ्या योगे । दुःखी जालो रे तुझिया वियोगे ।
आम्हां सांडोनी जातोसी रागे रागे । सुख पाहतां नाढळे तुझ्या संगे ॥१॥
कृपा भाकितां भाकितां जाला शीण । अंतर गुंतले न कंठे तुजविण ।
कृपाकोमळ म्हणती विश्वजन । परि तूं पाहतां अंतरीचा कठिण ॥२॥
गोपी वचने बोलताती उदास । पोटी लागली भेटीची थोर आस ।
वाट पाहती चिंतनी रात्रंदिवस । देव पावला सरिसे निज दास ॥३॥

११४०.
( राग-छायालगत्व खमाज; ताल-धुमाळी )
राधे तूझा कृष्ण हरी । गोकुळांत फंद करी ॥
जाउनि गौळणीला धरी । दही दूध चोरी करी ॥ध्रु०॥
मथुरेची गौळण थाट । शिरी गोरसाचा माठ ॥
अडवितो आमुची वाट । करितो मस्करी ॥१॥
संगे घेउनी गोपाळ । हिंडतसे रानोमाळ ॥
करितो आमुचे बहु हाल । सोसावे कुठवरी ॥२॥
गुण याचे सांगूं किती । सांगतां मज वाटे भ्रांती ॥
वाईट आहे याची रीति । ऐसा हा ब्रह्मचारी ॥३॥
गौळण होऊनियां लीन । जाती हरीला शरण ॥
क्षमा करीजे मनमोहन । दास चरण धरी ॥४॥

११४१.
( राग-मारु; ताल-धुमाळी )
नावडे नावडे आतां संसार । येणे गोपाळे वेधिले अंतर वो बाइये ।
चपळ नयन बाणी भेदिले वो । मनमोहन आठवे निरंतर वो बाइये ॥ध्रु०॥
वसंतसमयी निशा निवळ वो । हरि वेणु वाजवितो मंजुळ वो बाइये ।
रहा हो रहा हो स्थिर तुम्ही । तेणे गुणे माझे मन चंचळ वो बाइये ॥१॥
अविद्याविषय नको सासुर वो । चाड नाही मज मायामाहियेरे वो बाइये ।
मधुर श्रवणे वृत्ति मोहरिली । रामदासाच्या दातारे वो बाइये ॥२॥

११४२.
( राग-जयजयवंती; ताल-दादरा )
डोलत डोलत चाले । श्रवणी कुंडल हाले ।
भेदिक वचन बोले । चित्तचोरटा ॥१॥
सकळ कळांचा हरी । भेटवा हो झडकरी ।
तयाविण देहा उरी । नाही साजणी ॥२॥
चपळनयनबाणी । भेदीले वो साजणी ।
पाहतां न पुरे धणी । डोळियांची ॥३॥
ऐसा हरि लाघवी । मुनिजनां वेधु लावी ।
रामीरामदास कवी । साबडा म्हणे ॥४॥

११४३.
( राग केदार; ताल-त्रिताल; चाल-राजीवनयन राम० )
हरिवीण घडी गमेना । हरीविण शोक शमेना ॥ध्रु०॥
रुप मनोहर ज्याचे । लागले ध्यान तयाचे ॥१॥
युगासम दिवस जातो । रामदास वाट पाहतो ॥२॥

११४४.
( राग-बागेश्री; ताल-धुमाळी )
धरी आपुला हा छंद । मुरलि वाजवितो मंद ।
गीत गातो गोविंद । पाहुं चला गे बाई ॥ध्रु०॥
पांवा वाजवी गोपळ । गळां शोभे वनमाळ ।
कोटि तरणी तेजाळ । कृष्ण देवकीचा बाळ ।
वेगी दावा हो ॥१॥
करीन स्वामीचे काज । न धरी लौकिक लाज ।
देह विटंबीन आज । पाहुं चला यदुराज ॥२॥
सांडुनि शरिराचा रंग । चित्ता जाला असे भंग ।
धरा कृष्णजीचा संग । पाहुं चला श्रीरंग ॥३॥
रामदासाची आस । जीव जाला उदास ।
धरुं मी कवणाची कांस । सहजी सहज प्रकाश ।
प्रकाशला हो बाई ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP