देवताविषयक पदे - पाळणा
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
१०७८.
( राग-कल्याण; ताल-धुमाळी )
सुंदर रामाबाई । सभराभरीत सर्वां ठायी वो ॥
निगमां पार नाही । ते म्यां वर्णावी ते काईं वो ॥ध्रु०॥
शरयूतीरवासिनी । वेधव मुनिमानसमोहिनी वो ॥
सुरवरसंजीवनी । कैसी शोभत पद्मासनी वो ॥
उदार एकवचनी । दुर्मिळ तपसंतपसाधनी वो ॥
दशरथ नृपनंदनी । प्रगटे ऋषिवचनालागुनी वो ॥१॥
निजमस्तकी वीरगुंठी । त्रिपुटे रेखिला लल्लाटी वो ॥
सुरेख सदटा भ्रुकुटी । तेणे सतेज नासापुटी वो ॥२॥
कटी तटी सोनसळा । माजी सुदामिनीचा मेळा वो ॥
सुवास नाभीकमळा । तेणे पडे मधुकर पाळा वो ॥
वामेधरणीबाळा । वनितामंडित ते वेल्हाळा पडे मधुकर पाळा वो ॥
चरणी स्पर्शे शिळा । अहिल्या उद्धरली अवलीळा वो ॥३॥
विशाळ वक्षस्थळी । विराजित उटी पातळी वो ॥
कंठी एकावळी ॥ माजी कौस्तुभमणि झळफळी वो ॥
अधरी प्रवाळपाळी । मध्ये शोभे दंतावळी वो ॥
रसनारस कल्लोळी । वाचा बोलतसे मंजुळी वो ॥४॥
अजानुबाहु सरळ । सुनीळ गगनाहुनि मोकळ वो ।
सुपानीरजस्थळ । देखुनि रवितेजे सोज्वळ वो ॥
मुद्रा फांकती किळा । तेणे सतेज ग्रहमंडळ वो ॥
शरकार्मुकसहमेळे । शोधित असुरा तरुची मुळे वो ॥५॥
चिद्गगनाचा गाभा । तैसी सुनील अंगप्रभा वो ॥
देखुनि चिद्घन शोभा । जैसी कांती चढली नभा वो ॥
रतिनायकवल्लभा । देखुनि सांडी नागरदंभा वो ॥
प्रथमारंभ स्तंभा । भरणभूषित शामल शोभा वो ॥६॥
भरत बिभीषण पृष्ठी । सवितागुण मानस उत्कटी वो ॥
जोडुनि करसंपुटी । ध्यानी मारुतिमानस वेष्टी वो ॥
देखुनि सुखपृष्टी । जाली प्रेमरसाची वृष्टी वो ॥
सुख संतुष्ट परमेष्टी । हरुषे कोंदे सकळा सृष्टी वो ॥७॥
नवपंकज लोचनी । विस्मित करुणामृत सिंचिनी वो ॥
शिवसंकट मोचनी । दुर्धर रजनीचरभंजनी वो ॥
भवभयसंकोचनी । भक्तां निर्भय पद सूचनी वो ॥
रघुकुळउल्हासनी । भोजे विलसत चंद्राननी वो ॥८॥
सुकाळ स्वानंदाचा । यावा अंतरला दुःखाचा वो ॥
जगदुद्धार मातेचा । उत्तीर्ण नव्हे की हे वाचा वो ।
रामदासभेदाचा । तरंग तुटोनि गेला साचा वो ॥९॥
१०७९.
( राग-बिलावल; ताल-त्रिताल )
ऐसे ध्यान समान न दिसे राम निरुपम लीळा ।
सांवळे सुंदर रुप मनोहर शोभति सुमनमाळा ॥ध्रु०॥
मुकुटकिरीटीकुंडलमंडित गंडस्थळावरि शोभा ।
केयुर दंड उदंड विभूषण लावण्याचा गाभा ॥१॥
सरळ कुरळवळ नयनकमळदळ शामला कोमल साजे ।
झळके इंद्रनीळ तळपे रत्नकीळ मुनिजन ध्यानि विराजे ॥२॥
भाळ विशाळ रसाळ विलेपन परिमळ अनिळ विलासी ।
मृगमद केशर धूशर आंगी । हसितवदन सुखराशी ॥३॥
कटतट वेंकट कांसे पीतपट मिरवत उटी सुगंधे ।
रुळत कल्लोळ सुढाळ मालिका डोलति तेणे छंदे ॥४॥
जडित पदक वीर कंकण कंकिणी अंदू नेपुर वाजे ।
सकळ रिपुकुळ निर्मूळ ऐसे वांकी तोडर ब्रीद गाजे ॥५॥
करशरचाप विलाप दानवां काळरुप मनिं मासे ।
दास म्हणे रणकर्कश राम अंतक तोहि त्रासे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2011
TOP