मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


६५१.
येथे काय रे वाजते । कोठे काय गजबजिते ॥१॥
उगाच करिती कोल्हाळ । माझे उठले कपाळ ॥२॥
हांका मारोनी वरडती । टाळ अवघे चि कुटती ॥३॥
कोठे कैचे आले लुट । वाया जाले टाळकुटे ॥४॥
वेडी संसार सांडिला । व्यर्थ गलबला मांडिला ॥५॥
दास म्हणे त्या मूर्खाला । हरिकथेचा वीट आला ॥६॥

६५२.
हरिकथेचा आला राग । थेर होतां घाली त्याग ॥१॥
ऐसे प्रकारीचे जन । नाही देवाचे भजन ॥२॥
कळावंताचे के गाणे । ऐकताती जीवप्राणे ॥३॥
करिती लग्नाचा उत्साव । नाही देवमहोत्साव ॥४॥
भूतदया नाही पोटी । खाती लोभाची चोरटी ॥५॥
रामीरामदास म्हणे । देवधर्म कोण जाणे ॥६॥

६५३.
यथातथ्य आठवेना । कांही स्वहित घडेना ॥१॥
कातड्याचे बंदीखानी । नव महिने पतन ॥२॥
बारा वर्षे बाळपण । आंगी होते मूर्खपण ॥३॥
पुढे तारुण्याच्या भरे । आले कामाचे काविरे ॥४॥
पुढे आले वृद्धपण । सवेंचि पातले मरण ॥५॥
दास म्हणे रात्रंदिस । नाही मराया अवकाश ॥६॥

६५४.
मुंगुसाचे कानी बाळी । मुंगुस हिंडे आळोआळी ॥१॥
तरि ते पाळिले जाणावे । पराधीन चि स्वभावे ॥२॥
वेडे आलसे पाहुणे । तरि ते जगाचे मेहुणे ॥३॥
कार्यकर्ता कीर्तिवंत । त्यास जाणती समस्त ॥४॥
कार्यकर्ता तो झांकेना । वेध लावी विश्वजनां ॥५॥
दास म्हणे फुटबळाचा । तोचि पुरुष दैवाचा ॥६॥

६५५.
नाही ज्ञानाचा विचार । केला अज्ञाने संचार ॥१॥
मना आले ते बोलती । चालो नये ते चालती ॥२॥
अवघा स्वधर्म बुडाला । देह प्रपंची गोंविला ॥३॥
रामीरामदास म्हणे । अविद्येची ही लक्षणे ॥४॥

६५६.
आले संसाराचे ज्ञान । तेणे जाले समाधान ॥१॥
सकळ साराचेहिं सार । ऐसा माझा हा संसार ॥२॥
कैंचा देव कैंचा धर्म । तीर्थयात्रा कैंचा भ्रम ॥३॥
कैंचे ध्यान कैंचे ज्ञान । अन्न हेंचि समाधान ॥४॥
व्यर्थ गाणे हे लौकिकी । येणे पोट भरेना की ॥५॥
रामदास म्हणे भले । आम्हां सत्य हे सकळ ॥६॥

६५७.
कल्पनेची भरोवरी । मन सर्वकाळ करी ॥१॥
स्वप्न सत्यचि वाटले ॥ दृढ जीवेंसी धरिले ॥धृ०॥
अवघा मायिक विचार । तोचि मानिला साचार ॥२॥
नाना मंदिरे सुंदरे । दिव्यांबरे मनोहरे ॥३॥
जीव सुखे सुखावला । थोर आनंद भासला ॥४॥
रामदास म्हणे मद । लिंगदेहाचा आनंद ॥५॥

६५८.
सुडके होतसे झाडाचे । पटकर होतसे हाडाचे ॥१॥
यांत सोवळे ते कोण । पाहा पाहा विचक्षण ॥ध्रु०॥
पाहो जातां घरोघर । कथीकेची येक धार ॥२॥
चुडे दांतावले हाडे । पाहा सोंवळे निवाडे ॥३॥
न्यायेनीती विवंचना । हिंगावांचुनी चालेना ॥४॥
दास म्हणे रे संतत । कांही पाहो नये अंत ॥५॥

६५९.
दुःखे दुःख वाढत आहे । सुखे सुख वाढत आहे ॥ध्रु०॥
बर्‍याने बरे चि होते । वाईटे वाईट येते ॥१॥
हटाने हट बळावे । मिळतां मिळणी फावे ॥२॥
सुशब्दे माणुस जोडे । कुशब्दे अंतर मोडे ॥३॥
प्रीतीने प्रीतिच लागे । विकल्पे अंतर भंगे ॥४॥
सेवके दास्य करावे । राघवे प्रसन्न व्हावे ॥५॥

६६०.
पुण्य पहावया कारणे । देव धाडी बोलावणे ॥१॥
वाट लागेल धरावी । पुण्यसामग्री करावी ॥२॥
वाटवेच नाही जया । पुढे सुख कैंचे तया ॥३॥
रामीरामदास म्हणे । बुद्धिवंत ते शाहाणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP