३३१ .
आतां पावन करावे । शरणागतां उद्धरावे ॥ध्रु०॥
आम्ही कांही नेणो हित । म्हणुनि जाहलो पतित ॥१॥
पुण्य नाही माझे गांठी । केली दोषाची राहटी ॥२॥
दास म्हणे माझे जिणे । देवी सर्वस्वेसी उणे ॥३॥
३३२ .
आम्ही अपराधी अपराधी । आम्हां नाही दृढ बुद्धी ॥१॥
माझे अन्याय अगणित । कोण करील गणित ॥ध्रु०॥
मज सर्वस्व पाळिले । प्रचितीने सांभाळिले ॥२॥
माझी वाईट करणी । रामदास लोटांगणी ॥३॥
३३३ .
दास आपुले मानावे । माझे गुण पालटावे ॥१॥
काम क्रोध मद मत्सर । माझे ठायी तिरस्कार ॥२॥
राग द्वेष लोभ दंभ । नांदे अंतरी स्वयंभ ॥३॥
रामदास म्हणे आतां । देवा तुझे गुण गाता ॥४॥
३३४ .
पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावे ॥१॥
भक्तीची आवडी नाही निरंतर । कोरडे अंतर भावेंविण ॥२॥
माझे मीतूंपण गेले नाही देवा । काय करुं ठेवा संचिताचा ॥३॥
रामदास म्हणे पतिताचे उणे । पतीतपावने सांभाळावे ॥४॥
३३५ .
पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावे ॥१॥
वैराग्याचा लेश नाही माझे अंगी । बोलतसे जगी शब्दज्ञान ॥२॥
देह हे कारणी लावावे नावडे । आळस आवडे सर्वकाळ ॥३॥
रामदास म्हणे कथा निरुपणे । मनाची लक्षणे जैसी तैसी ॥४॥
३३६ .
पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावे ॥१॥
मन हे चंचळ न राहे निश्चळ । निरुपणी पळ स्थिरावेना ॥२॥
सांडुनियां ध्यान विषयचिंतन । करितसे मन आवरेना ॥३॥
रामदास म्हणे कथा निरुपणे । मनाची लक्षणे जैसी तैसी ॥४॥
३३७ .
पतीतपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावे ॥१॥
मुखे बोले ज्ञान पोटी अभिमान । पाहे परन्यून सर्वकाळ ॥२॥
दृढ देहबुद्धि तेणे नाही शुद्धि । जाहलो मी क्रोधी अनावर ॥३॥
रामदास म्हणे ऐसा मी अज्ञान । सर्वब्रह्मज्ञान बोलोनियां ॥४॥
३३८ .
पतीतपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावे ॥१॥
मिथ्या शब्दज्ञाने तुज अंतरलो । संदेही पडलो मीपणाचे ॥२॥
सदा खळखळ निर्गुणाची घडे । सगुण नावडे ज्ञानगर्वे ॥३॥
रामदास म्हणे ऐसा मी पतित । मीपणे अनंत पाहो जातां ॥४॥
३३९ .
दीनांचा दयाळु कीर्ति ऐकियेली । म्हणोनी पाहिली वाट तुझी ॥१॥
अनाथाचा नाथ होशील कैवारी । म्हणोनियां हरी बोभाईले ॥२॥
तुजविण कोण जाणे हे अंतर । कोणासी जोजार घालुं माझा ॥३॥
दास म्हणे आम्ही दीनाहुनी दीन । करावे पाळण दुर्बळाचे ॥४॥
३४० .
मी खरा पतित तूं खरा पावन । आतां अनुमान करुं नको ॥१॥
आतां मज कांही चिंता नसे । तुझे नाम कैसे वांचईल ॥२॥
समर्थे घेतला नावालागी भार । मज उपकार कासयाचा ॥३॥
रामदास म्हणे तुझे तुज उणे । सोयरी पीसुणे हांसतील ॥४॥