मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
वोसाण

भारूड - वोसाण

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९७६.
वोसाण रे वोसाण रे । वोसाण रे राम वोसाण रे ॥१॥
आढळेना आढळेना । आढळेना संत आढळेना ॥२॥
उमजेना उमजेना । उमजेना पंथ उमजेना ॥३॥
कोण जाणे कोण जाणे । कोण जाणे पंथ रामदास जाणे ॥४॥

९७७.
चालवेना चालवेना । चालवेना पंथ बोलवेना ॥१॥
दुःख वाटे दुःख वाटे । दुःख वाटे देहबुद्धि लोटे ॥२॥
सुख नाही सुख नाही । सुख नाही भवी सुख नाही ॥३॥
जड जाते जड जाते । जड जाते अत्यंत जड जाते ॥४॥
धरवेना धरवेना । धरवेना रामदासपण करवेना ॥५॥

९७८.
संतापले संतापले । संतापले मन संतापले ॥१॥
झीज लागे झीज लागे । झीज लागे देह झीज लागे ॥२॥
सोसवेना सोसवेना । सोसवेना शीण सोसवेना ॥३॥
धीर नाही धीर नाही । दास म्हणे अंतर पाही ॥४॥

९७९.
त्यागवेना त्यागवेना । त्यागवेना भाग्य त्यागवेना ॥१॥
बुध्दि नाही बुद्धि नाही । बुद्धि नाही एक बुद्धि नाही ॥२॥
धरवेना धरवेना । तोडवेना मन तोडवेना ॥३॥
दास म्हणे दास म्हणे । पोटींचा निश्चय कोण जाणे ॥४॥

९८०.
मोकळे रे मोकळे रे । मोकळे रे मन मोकळे रे ॥१॥
योग नाही याग नाही । देव नाही वीतराग नाही ॥२॥
भक्ति नाही भाव नाही । देव नाही सानुकूळ नाही ॥३॥
जप नाहे तप नाही । गुण नाही निर्गुण नाही ॥४॥
ज्ञान नाही ध्यान नाही । लय नाही साधन नाही ॥५॥
शम नाही दम नाही । बाह्य अंतरी ते मन नाही ॥६॥
इष्ट नाही मित्र नाही । धारिष्ट नाही वारिष्ट नाही ॥७॥
दान नाही पुण्य नाही । कर्म नाही स्वधर्म नाही ॥८॥
तीर्थ नाही व्रत नाही । शांति नाहे विश्रांति नाही ॥९॥
न्याय नाही नीति नाही । दास म्हणे कांहीच नाही ॥१०॥

९८१.
साधिले रे साधिले रे । साधिले रे मावे साधिले रे ॥१॥
काम आहे क्रोध आहे । मद आहे मत्सर आहे ॥२॥
लोभ आहे दंभ आहे । क्षोभ आहे अक्षोभ आहे ॥३॥
भेद आहे खेद आहे । वाद आहे उच्छेद आहे ॥४॥
पाप आहे दोष आहे । अंतरी पाहतां द्वेष आहे ॥५॥
अर्थ आहे स्वार्थ आहे । मान्यतेकारणे अनर्थ आहे ॥६॥
भ्रम आहे गर्व आहे । सांगणे नलगे सर्व आहे ॥७॥
जाणवेना जाणवेना । दास म्हणे खूण बाणवेना ॥८॥

९८२.
एक घाय दोनी खंडे । ऐसे बोलणे रोकडे  ॥१॥
जेणे उठती संशय । ते बोलणे कामा नये ॥२॥
बहुविध जाले ठावे । सत्य कैसेनि मानावे ॥३॥
रामीरामदास म्हणे । एक निश्चय बोलणे ॥४॥

९८३.
प्राणी जेणे पंथे गेला । तोचि बहुविध जाला ॥१॥
आतां कोणे वाटे जावे । तेथे संशयी पडावे ॥२॥
मार्ग दो ठायी जाहला । प्राणी मध्ये उभा ठेला ॥३॥
रामदास म्हणे । एक निश्चय बोलणे ॥४॥

९८४.
अवघे अंधार दाटले । डोळे असतांचि गेले ॥१॥
कोठे पाऊल ठेवावे । पुढे दिसेना स्वभावे ॥२॥
खांच खळगा कोटकडा । ऐसे कळेना निवाडा ॥३॥
रामीरामदास म्हणे । काय करिती शाहाणे ॥४॥

९८५.
विकल्प डोंगर वोसाण । झाडखंड ब्रह्मारण्य ॥१॥
आतां कोणीकडे जावे । अवघे अरण्य स्वभावे ॥२॥
रानजळी कर्करिती । पक्षी वनचर बोभाती ॥३॥
रामदास म्हणे भला । तेथे दिवस मावळला ॥४॥

९८६.
सात पांच गांवे वाटा । अवघा एकचि चोहटा ॥१॥
तेथे कोणीकडे जावे । अवघी वाटचि स्वभावे ॥२॥
कोणी दिसेना वेळेसी । वाट पुसावी कोणासी ॥३॥
रामीरामदास म्हणे । तैसे संशयी बोलणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP