विविध विषय - उपदेशपर
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
६७१.
रावणासारिखी कोणाची संपत्ति । तोहि गेला अंती एकलाचि ॥१॥
एकलाचि गेला तो वाली वानर । कपी थोर थोर तेहि गेले ॥२॥
गेले चक्रवर्ती थोर वैभवाचे । फारा आयुष्याचे ऋषेश्वर ॥३॥
ऋषेश्वर गेले मार्कंडीसारिखे । बहुतांचे लेखे कोण करी ॥४॥
कोण करी सर्व शाश्वत आपुले । सर्व राज्य गेले कौरवांचे ॥५॥
कौरव निमाले पांडव गळाले । यादवहि गेले एकसरे ॥६॥
एकसरां गेले राजे थोर थोर । आणिक श्रीधर भाग्यवंत ॥७॥
भाग्यवंत गेले एका मागे एक । हरिश्चंद्रादिक पुण्यशीळ ॥८॥
पुण्यशीळ गेले कीर्ती ठेवूनीयां । पापी गेले वायां अधोगति ॥९॥
अधोगति गेले देवा न भजतां । संसारी असतां माझे माझे ॥१०॥
माझे माझे म्हणे साचाचीयेपरी । सेखी दुराचारी एकलाचि ॥११॥
एकलाचि येतां एकलाचि जातां । मध्येंचि दुश्चिता मायाजाळ ॥१२॥
मायाजाळी पापेजन गुंडाळले । पुण्यशीळ गेले सुटोनियां ॥१३॥
सुटोनीयां गेले सायुज्यपदासी । रामीरामदासी चिरंजीव ॥१४॥
६७२.
सर्व देव जेणे घातले बांदोडी । त्याची मुरकुंडी रणांगणी ॥१॥
ऐसा काळ आहे सर्वां गिळिताहे । विचारुनि पाहे आलया रे ॥२॥
इंद्रजित नाम इंद्रासी जिंकिले । त्याचे शीर नेले गोळांगुळी ॥३॥
देवां दैत्यां वाळी बळी भूमंडळी । तया एके काळी मृत्यु आला ॥४॥
देवासी पीटिले तया जाळंधरे । तोडिले शंकरे शिर त्याचे ॥५॥
करे भस्म करी नाम भस्मासुर । तयाचा संहार विष्णु करी ॥६॥
प्रल्हादाचा पिता चिरंजीव होता । नरसिंह मारिता त्यासी होय ॥७॥
विरोचना घरी विष्णु जाला नारी । तया यमपुरी दाखविली ॥८॥
गजासुर गेला दुंदुभी निमाला । प्रताप राहिला वैभवाचा ॥९॥
ऐसे थोर थोर प्रतापी अपार । गेले कलेवर सांडूनीयां ॥१०॥
शरीर संपत्ति सर्व गेली अंती । सोसिल्या विपत्ती एकाएकी ॥११॥
म्हणोनी वैभवा कदा भुलो नये । क्षणा होय काय ते कळेना ॥१२॥
रामदास म्हणे स्वहित करणे । निर्धारे मरणे मागे पुढे ॥१३॥
६७३.
सूर्याकार भिंती लिहिला सूर्य चांग । प्रकाश तो चांग नये नये ॥१॥
धीट पाठ कवित्व करवेल अव्यंग । प्रसादिक रंग नये नये ॥२॥
संताची आकृति आणवेल युक्ती । परि कामक्रोधा शांति नये नये ॥३॥
भागवतीचा भाव आणवेल आव । करणीचा स्वभाव नये नये ॥४॥
रामदास म्हणे रामकृपेवांचोनी । बोलाऐसी करणी नये नये ॥५॥
६७४.
देखतां दिनमणी नेत्रां होय पारणी । उलुकास पळणी नव्हेल काय ॥१॥
सेवितां अमृत अमर होइजे सत्य । राहूसी ते मृत्य नव्हेल काय ॥२॥
पक्वान्ने षडरसे रुचि वाटे सर्वांसी । विष रोगियांसी नव्हेल काय ॥३॥
देखतां दर्पण सकळां समाधान । निर्नासिका अपमान नव्हेल काय ॥४॥
वर्षतां मुक्तासी आनंद हंसासी । प्रळय वायसासी नव्हेल काय ॥५॥
रामदासी करितां रामाचे दास्य । हतभाग्यासी विष नव्हेल काय ॥६॥
६७५.
मृत्तिकेचा शौच करी नानापरी । मागुता टरारी नर्क तेथे ॥१॥
नर्क तेथे आहे तो कैसा काढावा । व्यर्थ वाढवावा ॥२॥
लोकाचार केला लौकिका देखतां । अंतरी शुद्धता आढळेना ॥३॥
आढळेना ज्ञान पूर्ण समाधान । सर्वदा बंधन संदेहाचे ॥४॥
संदेहाचे पाप जाले वज्रलेप । विचारे निष्पाप रामदासी ॥५॥
६७६.
शिंक जांभई खोकला । तितुका काळ व्यर्थ गेला ॥१॥
आतां ऐसे न करावे । नाम जीवी ते धरावे ॥२॥
श्वास उश्वास निघतो । तितुका काळ व्यर्थ जातो ॥३॥
पात्यांपाते नलगत । तितुके वय व्यर्थ जात ॥४॥
लागे अवचित उचकी । तितुके वय काळ लेखी ॥५॥
म्हणे रामीरामदास । होतो आयुष्याचा र्हास ॥६॥
६७७.
पूर्व भूमिका सांडिली । जीव झाला दिशाभुली ॥१॥
ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणा आपण ॥२॥
द्रव्य आपण ठेविले । ज्याचे तयासि चुकले ॥३॥
रामदास म्हणे घरी । दार चुकले अंधारी ॥४॥
६७८.
कर्ता एक देव तेणे केले सर्व । तयापाशी गर्व कामा नये ॥१॥
देह हे देवाचे वित्त कुबेराचे । तेथे या जीवाचे काय आहे ॥२॥
देता देववीता नेता नेववीता । कर्ता करवीता जीव नव्हे ॥३॥
निमित्ताचा धणी केला असे प्राणी । पहातां निर्वाणी जीव कैंचा ॥४॥
लक्षुमी देवाची सर्व सत्ता त्याची । त्याविण जीवाची उरी नाही ॥५॥
दास म्हणे मना सावध असावे । दुश्चित नसावे सर्वकाळ ॥६॥
६७९.
स्वप्न हा संसार मायिक व्यवहार । म्हणोनि साचार मानूं नये ॥१॥
मानूं नये सर्व जायाचे आपुले । ज्याचे त्याने नेले दुःख काय ॥२॥
दुःख काय आतां स्वप्नसुख जातां । साच ते तत्त्वतां दृढ धरी ॥३॥
दृढ धरी मना जानकीजीवना । तेणे समाधाना पावशील ॥४॥
पावशील निज स्वरुप आपुले । जरी ते घडले रामदास्य ॥५॥
रामदास्य घडे बहुतां सुकृते । कांही पुण्य होते पूर्वजांचे ॥६॥
६८०.
पायी लावूनियां दोरी । भोंगा बांधिला लेंकुरी ॥१॥
तैसा पावसी बंधन । मग तुज सोडी कोण ॥२॥
हाती धरोनी वानर । हिंडविती दारोदार ॥३॥
रामदास म्हणे पाहे । रीस धांपा देत आहे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 26, 2011
TOP