४९८ .
राघवाची भक्ति ज्ञानाचे मंडण । भक्तीचे भूषण राम एक ॥१॥
नलगे पिंडज्ञान नलगे तत्त्वज्ञान । राघवाचे ध्यान आठवीतां ॥२॥
शब्दज्ञान पोथी वाचितां प्रबळे । मागुती मावळे क्षण एका ॥३॥
रामीरामदासी राघवाची भक्ति । तेथे चारी मुक्ति ओळंगती ॥४॥
४९९ .
रामभक्तिविण अणु नाही सार । साराचेंहि सार रामनाम ॥१॥
कल्पनाविस्तारु होतसे संहारु । आम्हां कल्पतरु चाड नाही ॥२॥
कामनेलागुनी विटलासे मनु । तेथे कामधेनु कोण काज ॥३॥
चिंता नाही मनी राम गातां गुणी । तेथे चिंतामणी कोण पुसे ॥४॥
कदा नाही नाश स्वरुप सुंदरे । तेथे काय हिरे नाशिवंत ॥५॥
रामदास म्हणे रामभक्तिविणे । जाणावे हे उणे सर्व कांही ॥६॥
५०० .
देवा त्वां घेतला मत्स्य अवतार । कासव डुक्कर कासयासी ॥१॥
कासयासि देवे कपट करावे । खुजटचि व्हावे बळीचेथे ॥२॥
बळीचेथे नाना कपट करावे । मातेसी मारावे कासयासी ॥३॥
कासयासि वाली उगाचि मारिला । मिथ्या शोक केला वनांतरी ॥४॥
वनांतरी शोक चोरी घरोघरी । देव परद्वारी म्हणताती ॥५॥
म्हणताती बौद्ध जाला निःसंगळ । कलंकी दुरुळ दास म्हणे ॥६॥
५०१ .
सप्रचीत वल्ली मिथ्या कोण करी । धन्य तो विवरी विवेकाने ॥१॥
विवेकाचे जन भेटतां संकट । ज्याची खटपट सुखरुप ॥२॥
सुखरुप संत सत्य साभिमानी । तयासीच मानी येरां नाही ॥३॥
येरां नाही गति सत्यावांचुनीयां । असत्याच्या पाया कोण पडे ॥४॥
कोण पडे आतां संदेहाचे डोही । कोणावीण नाही चाड आम्हां ॥५॥
आम्हां नाही चाड ते कोणीएकाची । दृढ राघवाची कांस धरुं ॥६॥
कांस धरुं जेणे पावनचि केले । तेथे माझे जाले समाधान ॥७॥
समाधान जाले प्रत्ययासी आले । धन्य ती पाउले राघवाची ॥८॥
राघवाची पदे मानसी धरीन । विश्व उद्धरीन हेळामात्रे ॥९॥
हेळामात्रे मुक्त करीन या जनां । तरीच पावना राघवाचा ॥१०॥
राघवाचा दास मी जालो पावन । पतित तो कोण उरो शके ॥११॥
उरो शके ऐसे कल्पांती घडेना । जो कोण्ही पुसेना त्यासी उणे ॥१२॥
उणे नसे गता माझ्या सर्यवंशा । कोणाची दुराशा नाही आम्हां ॥१३॥
आम्हां नाही उणे राघवाच्या गुणे । ब्रीदचे राखणे पावनाचे ॥१४॥
पावनाचे ब्रीद आम्हां प्राप्त जाले । प्रचीतीस आले कितीएक ॥१५॥
कितीएक जन ज्ञाने उद्धरीले । कृतकृत्य जाले तात्काळचि ॥१६॥
तत्काळचि मोक्ष हे ब्रीद रामाचे । होत आहे साचे येणे काळे ॥१७॥
येणे काळे मोक्ष जरी मी देईना । दास म्हणवीना राघवाचा ॥१८॥
राघवाचा वर पावलो सत्वर । जनाचा उद्धारा करावया ॥१९॥
कराया समर्थ राम सूर्यवंशी । मज कासयासी रागेजतां ॥२०॥
रागेजतां राग येईल समर्था । हे तो कांही सत्ता माझी नव्हे ॥२१॥
माझी सर्व चिंता जानकीजीवना । आतां मी लेखीना ब्रह्मादिकां ॥२२॥
ब्रह्मादिक माये जानकीपासूनी । तयासी व्यापुनी राम आहे ॥२३॥
राम आहे जनी राम आहे वनी । राम निरंजनी सारिखाचि ॥२४॥
सारिखाचि राम सृष्टी पाहो जातां । तोचि पाहे आतां निरंतर ॥२५॥
निरंतर राम कांहो अंतरीतां । सोडूनियां जातां एकीकडे ॥२६॥
एकीकडे जातां तेथेहि तो राम । सांडुनियां भ्रम बरे पहा ॥२७॥
बरे पहा तुम्ही आतांचि पावाल । पावनचि व्हाल रामरुप ॥२८॥
रामरुपे सर्व रुपे निवारली । असताचि जाली नाही ऐसी ॥२९॥
नाही ऐसी रुपे भिंती चित्राकार । तैसा हा आकार स्वप्न जैसे ॥३०॥
स्वप्नींचा आकार कल्पनेसी भासे । रामरुप असे निर्विकल्प ॥३१॥
निर्विकल्प राम कल्पितां होईजे । मिळोनि जाइजे रामरुपी ॥३२॥
रामरुपी सर्व समाधान जाले । पावनचि केल पावनाने ॥३३॥
पावन हा राम जो कोणी पावेल । रामचि होईल निजध्यासे ॥३४॥
निजध्यास निजवस्तुचा धरावा । श्रवणे करावा साक्षात्कार ॥३५॥
साक्षात्कार होतां सत्य निर्गुणाचा । मग या गुणाचा पांग नाही ॥३६॥
पांग नाही ऐसे नेमस्त जाणिजे । शीघ्रचि सुटिजे संसारी ॥३७॥
संसारी सुटिजे संसार करितां । सर्वहि भोगितां भोगातीत ॥३८॥
भोगातीत जैसा श्रीकृष्ण दुर्वास । आत्मज्ञानी तैसा सर्वकाळ ॥३९॥
सर्वकाळ देही असतां विदेही । रामदासी नाही जन्ममृत्यु ॥४०॥