मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
देवी

देवताविषयक पदे - देवी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११६०.
( राग-मालकंस; ताल-त्रिताल )
रामवरदायिनी जननी । रुप कळे कळे मननी ॥ध्रु०॥
गगनमंडळी गुप्त खेचर । योगीमुनिजनध्यानी ॥१॥
रम्य योगिनी नाटक लीला । सकळ भूती भुवनी ॥२॥
अंतरवासी दास विलासी । ऊर्ध्व भरे गगनी ॥३॥

११६१.
( चाल-धर्म जागो सदैवाचा० )
सोडविल्या देव फौजा । आला वैकुंठीचा राजा ।
संहारिले रजनीचर । देवभक्तांचिया काजा ॥ध्रु०॥
दास मी समर्थाचा । मजला कोणी जाणेना ।
मुळींची कुळदेव्या हे । तिणे रक्षिले मना ॥१॥
अजिंक्य ते संहारिले । भूमिभार फेडिला ।
ऐसिया समर्थाला । जिणे वरु दिधला ॥२॥
ते सोय धरुनियां । गेले तुळजेच्या ठायां ।
तिने मज आश्वासिले । भेटविले रामराया ॥३॥

११६२.
( चाल-वरील प्रमाणे )
रंकांचे राजे होती । ऐसे पूर्ण बिंबले ।
रंक हे रक्षूनियां । परिपूर्ण चि केले ॥ध्रु०॥
ब्रीद हे साच केले । दास रक्षिला कैसा ।
वैभव देऊनियां । पुरविल्या भडसा ॥१॥
अंतर्निष्ठ भक्त होतां । होतो मोठा तमासा ।
भक्तांसी विसंबेना । क्षणभरी आमासा ॥२॥
रामदास म्हणे माझे । प्रचीतीचे बोलणे ।
हे वाक्य मिथ्या होतां ॥३॥

११६३.
( चाल-वरीलप्रमाणे )
वोळली जगन्माता । काय उणे रे आतां ॥
वैभव जात जातां । भक्त हाणती लाता ॥ध्रु०॥
वोळले भूमंडळ । परिपूर्ण पाहतां ॥
राम आणि वरदायिनी । दोन्ही एकचि पाहतां ॥१॥
मनामाजी कळो आले । तेणे तुटली चिंता ॥
रामरुप त्रिभुवनी । चाले सर्व हि सत्ता ॥२॥
रामदास म्हणे माझे । जिणे सार्थक जाले ॥
देवो देवी ओळखितां । रुप प्रत्यया आले ॥३॥

११६४.
( चाल-धन्य राजाराम धन्य० )
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ॥
आनंदे नाचती काय वर्णू महिमा तिचा हो ॥
अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो ॥
प्रतिपादेपासुनी घटस्थापना करुनी हो ॥
मूळ मंत्रे करुनि दैत्य मारिले निर्वाणी हो ॥
ब्रह्माविष्णुमहेश आईचे लागले पूजनी हो ॥१॥
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ॥
सकळांमाजी श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥
कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरुनि हो ॥
उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो ॥२॥
तृतीयेचे दिवशी बाइने श्रृंगार मांडिला हो ॥
सेलीव पातळ चोळी वरती हार मुक्ताफळा हो ॥
कंठीचे पदक कांसे पितांबर पिवळा हो ॥
अष्ट भुजा मिरविती आईची सुंदर दिसती कळा हो ॥३॥
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक भवानी हो ॥
नवरात्र करिती निराहार निर्वाणी हो ॥
त्यासी तूं माउली सुरवर येती लोटांगणी हो ॥४॥
पंचमीचे दिवशी व्रत उपांगललिता हो ॥
भक्त संतोषती आईचे पूजन करितां हो ॥
रात्रीचे समयी कीर्तन जागरण हरिकथा हो ॥
आनंदे नाचती प्रेम आलेसे निजभक्तां हो ॥५॥
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो ॥
करी घेउनी दिवट्या हर्षे गोंधळ घातला हो ॥
कवडिया दर्शने हार मिरवे मुक्ताफळा हो ॥
जोगवा मागतां प्रसन्न जाली निज भक्तां हो ॥६॥
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो ॥
तेथे तूं राहसी भोवती पुष्पे नानापरी हो ॥
जाई जुई शेवंती पूजा देखिली बरवी हो ॥
पडणी पडतां झेलुनी घेसी वरिचे वरी हो ॥७॥
अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो ॥
श्रीरामवरदायनी सह्याद्री पर्वती हो ॥
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो ॥
स्तनपान घेऊनि सुखे निवालो अंतःकरणी हो ॥८॥
नवमीचे दिवशी नवा दिसांचे पारणे हो ॥
सप्तशतीचा जप होम हवनादि करुनी हो ॥
पक्वान्ने नैवेद्ये केले कुमारीपूजन हो ॥
आचार्य ब्राह्मण तृप्त केले जगदंबेने हो ॥९॥
दशमीचे दिवशी अंबा सिलंगणा निघाली हो ॥
सिंहारुढ होउनी करी शस्त्रे झळकती हो ॥
मारिले दानव शुंभ निशुंभ ऐसे किती हो ॥
रामीरामदासां बाईने धरले आपले हाती हो ॥१०॥

११६५
( चाल-नामांमध्ये उत्तम० )
आदि शक्ती परमेश्वरी नारायणी रे । सर्व इचीच करणी रे ॥
कळो आली तत्त्वविवरणी रे । त्रिगुणी हे अवतार मांडणी रे ॥ध्रु०॥
शक्तिविणे कोणाची काया चाले रे । शक्तिविणे शरीर कैसे हाले रे ॥
शक्तिविणे वचन कोण बोले रे । शक्तिगुणे सकळ थोर ॥१॥
परा पश्यंति मध्यमा वैखरी रे । जयेचेनि उठती चारी रे ॥
शक्तिविणे बापुडा देहधारी रे । शक्तिविणे तो काही न करी रे ॥२॥
मुळारंभी तयेचा उदो जाला रे । पांचा भूतांचा गोंधळ मांडला रे ॥
रात्रंदिवस लो मायेचा लागला रे । सदानंदी आनंद मोठा जाला रे ॥३॥
संत साधु विचारी प्रवर्तली रे । मूळाकडे पाहता गुप्त जाली रे ॥४॥
दास म्हणे हे तिचेंचि करणे रे । कांही येक चालेना तिजविणे रे ॥
प्रचीतीने पाहावे निरुपणे रे । लोक व्यर्थ बुडताती मीपणे रे ॥५॥

११६६.
( चाल-हे दयाळुवा० )
माय वोळली माय वोळली । माय वोळली दया कल्लोळली ॥ध्रु०॥
चळचळी जनी चळवळी मनी । आनंदवन भूवनी वरद जाली ॥१॥
भडस पुरविते भाग्य भरविते । कीर्ति उरविते वोळलेपणे ॥२॥
मूळ मूळिंचे डाळ मूळिंचे । फळ मूळिंचे प्राप्त जाले ॥३॥
रामवरदा दासवरदा । रक्षिते सदा सत्य प्रत्यये ॥४॥

११६७.
( राग-केदार; ताल-द्रुत एकताल )
जय जय खंडेराया ॥ जय० । म्हाळसा बाणाई दोघी सुंदर जाया ॥ध्रु०॥
हटाचा हंबीर देव मलो म्हैपति । दे० । अखंड नवरा त्यासी भंडारे प्रीती ॥१॥
रोकडी प्रचीति जनामध्ये दाखवी । ज० । तयास भजतां भक्त होताती खवी ॥२॥
भक्त कुतरे वाघे अंदु तोडिती । व० । दुर्जनाची तत्काळ होतसे शांति ॥३॥

११६८.
( चाल-साधुसंतां मागणे. )
रामनाम जपतो महादेव । त्याचा अवतारी हा खंडेराव ॥ध्रु०॥
हळदीची भंडारे उधळिती । तेणे सोन्यारुप्याची भांडारे भरती ॥१॥
मणिमल्लमर्दन देव । एका भावे भजतां मार्तंडभैरव ॥२॥
म्हाळसा बाणाई सुंदरी । मध्ये शोभे भूषणमंडित मल्लारी ॥३॥
अखंड रणनवरा । यश पावा त्याचे भजन करा ॥४॥
एकचि स्वर उठतो । समरंगणि लक्षानुलक्ष मोडितो ॥५॥
रोकडे नवस पुरती । कोणितरी आधी पहावी प्रचिती ॥६॥
अखंड प्रचिती जनी । दास म्हणे ओळखा मनींचे मनी ॥७॥

११६९.
( राग-कल्याण; ताल-धुमाळी )
महिपति कळेना गति । पाहो जातां सामर्थ्य किती ।
करामति दावी आजि मती ॥ध्रु०॥
तुरुक मातले फोडाया गेले । भोगे उठिले तेही पिटिले ।
कोणे नेणो मार्गी कुटिले ॥१॥
श्वानासारिखी एक भुंकती । तोंडे वांकडी कंप सूटती ।
पिसाळले विष्ठा भक्षिती ॥२॥
हत्ती घोडे बहु मारिले । थोर लोक भूमी काढिले ।
तांति वाहणा बाजीद जाले ॥३॥
ऐसी हे लीळा कळेना कळा । कळा विकळा थाक सकळां ।
थोर थोर म्हणती पळा ॥४॥
मल्लुखान देव मल्लारी । रात्रिभागी चाबुक मारी ।
तोंडे सुजती पैजारांवरी ॥५॥
गर्व जातां ते बराबरी । संतोषतां न्याहाल करी ।
दास म्हणे करा चाकरी ॥६॥

११७०.
( राग व ताल-वरीलप्रमाणे )
मल्लुखान देतो तुफान । दुर्जनांला करि हैराण ।
भक्तजन होति तल्लीन ॥ध्रु०॥
सात कोटी दैत्य मारिले । येळकोटि भक्ति बोलिले ।
भूमंडळी तळी उचले ॥१॥
घोडेस्वार तो सदा वर । उधळते मृदभंडार ।
समरंगणी मोठा झुंजार ॥२॥
जातिजातिचे वानसुत रे । व्याघ्राऐसे मोठे कुतरे ।
भुंको लागतां गगन भरे ॥३॥
वाघे मुरळ्या साक्षि चालती । अंदु हत्तीचे तुटोनि जाती ।
दास म्हणे मोठी प्रचीति ॥४॥

११७१.
( राग व ताल-वरील )
देशोदेशिंचा जन उदंड येतो । नाना प्रकारे नवस फेडितो ।
देव त्याचे लळे पाळितो ॥ध्रु०॥
मार्गी लागतां बेड्या तुटती । कुलुपे तोंडीची तुटोनि जाती ।
नाना खोडे खिळी निघती ॥१॥
जिव्हा कापितां मागुता बोले । शिरे उठोनि चाले ।
उदंड ठायी प्रसंग जाले ॥२॥
वांझे लेंकूरे निधन्या धन । भक्तां पाळितो मनापासुन ।
दास म्हणे आनंदघन ॥३॥

११७२.
जेजुरीच्या यात्रेचे वर्णन
( राग व ताल-वरील )
खंडेराव देखिला देव । जनयात्रा मिळाले सर्व ।
काय सांगूं नाना वैभव ॥ध्रु०॥
लोकांची दाटी स्वारांची दाटी । यात्रेची दाटी दिवट्यांची दाटी ।
दिंड्यांची दाटी वाद्यांचे दाटी ॥१॥
ढोल दमामे टाळ माघळ । बुरुग वाके नाना कल्लोळ ।
कर्णे काहाळ मिळविती मेळ ॥२॥
हत्ती किंकाटती उंट भडकती । घोडे हिंसती बैल डुरती ।
नाम घोषे गर्जताती ॥३॥
कोण कोठे कांही कळेना । यात्रेमध्ये ते आकळेना ।
गर्द जाला आश्चर्य मना ॥४॥
पुढे दाटी माघुन दाटी । दोहींकडे दुकानकाटी ।
अंतसळी छत्र्यांची दाटी ॥५॥
नंदकोले नाना निशाणे । तळपताती माहिनिशाणे ।
छत्रचामरे ती सूर्यापाने ॥६॥
देव पाहिला तो घमघमाट । वैभवाचा लखलखाट ।
देवभूमि त्या मृद चोखट ॥७॥
नाना पुष्पे पुष्पांच्या माळा । नाना रत्ने रत्नांच्या माळा ।
तिघेजण लावण्यकळा ॥८॥
कराळ विक्राळ वेताळ खंकाळ । दोहींकडे ते द्वारपाळ ।
दोनी तेजी उभे निवळ ॥९॥
विद्यावैभव पातरा आल्या । लखलखाट कोणे मोजिल्या ।
नाना मंडपी नाचो लागल्या ॥१०॥
नाना ब्रीदांचे ते डफगाणे । नाना भेदाचे दांड भेजणे ।
दाटी होतां होती भांडणे ॥११॥
बाजारी जावे चकित व्हावे । काय घ्यावे काय न घ्यावे ।
सीमा नाही धन्य वैभव ॥१२॥
येकेकडे निवांत माळी । तेथे जावे ते बाळीभोळी ।
देवा जाणे निवांतकाळी ॥१३॥
रात्रभागी निवांत वेळा । ठाईं ठाईं गायनकळा ।
वाटे नेणो गाती कोकिळा ॥१४॥
दास म्हणे विवेकबळे । सकळांमध्ये परी निराळे ।
तेंचि सुख सर्वांआगळे ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP