विविध विषय - सख्य
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
५९७.
देव असतां पाठीराखा । त्रैलोक्याचा कोण लेखा ॥१॥
नाना उद्वेग वाटती । नाना चिंता उद्भवती ॥२॥
स्वस्थ वटेना अंतरी । नाना विवर्धना करी ॥३॥
रामदास म्हणे भावे । भजन देवाचे करावे ॥४॥
५९९.
आम्हां ये प्रपंची कोणी नाही सखा । एका रघुनायकावांचोनिया ॥१॥
विद्या वैभव धन मज कृपणाचे । जीवन जीवचे आत्मारामु ॥२॥
आकाश अवचिते जरि कोसळेल । मज तेथे राखील आत्मारामु ॥३॥
आपंगिले मज श्रीरामसमर्थे । ब्रह्मांड पालथे घालूं शके ॥४॥
वक्रदृष्टि पाहतां भरिल त्याचा घोंट । काळाचेहिं पोट फाडूं शके ॥५॥
रामदास म्हणे मी शरणागत त्याचा । आधार सकळांचा मुक्त केला ॥६॥
६००.
जठरी लागो क्षुधा । होत नाना आपदा । भक्तिप्रेम सदा न सोडी सत्य ॥१॥
शब्द न फुटे जरी । चिंतीन अंतरी । भक्तिप्रेम परी । न० ॥२॥
दाहूं वडवानळ । अथवा दंशूं काळ । भक्तिप्रेम प्रबळ । न० ॥३॥
नानापरी आघात । चिरकाल होवोत । रामीप्रेमामृत । न० ॥४॥
आतांचि हा देहो । राहो अथवा जावो । रामी प्रेमभावो । न० ॥५॥
म्हणे रामीरामदास । वरी पडो आकाश । राघवाची कांस । न सोडी सत्य ॥६॥
६०१.
माझिया देहाचे सांडणे करीन । तुज ओंवाळीन चारी देह ॥१॥
चारी देह त्यांची व्यर्थ स्थानमाने । कुर्वंडी करणे देवराया ॥२॥
देवराया जीवे प्राणे ओंवाळीन । हृदयी धरीन रात्रंदिस ॥३॥
रात्रंदिस मज देवाची संगति । तेचि मज गति सर्वकाळ ॥४॥
सर्वकाळ माझा सार्थक जाहला । देव सांपडला भक्तपणे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 26, 2011
TOP