मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
करुणा प्रार्थना

विविध विषय - करुणा प्रार्थना

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


३५१ .

कां हो रामराये दुरी धरियेले । कठिण कैसे केले चित्त तूझे ॥१॥

देऊनि आलिंगन प्रीतिपडीभरे । कैं मुख पीतांबर पुसशील ॥२॥

घेऊनी कडिये धरुनी हनुवटी । कैं गुजगोष्टी सांगशील ॥३॥

रामदास म्हणे केव्हां संबोखिसी । प्रेमपान्हा देसी जननीये ॥४॥

३५२ .

’ संभवामि युगे युगे ’ हे वचन । येणे समाधान होत नाही ॥१॥

होत नाही देवा श्लाघ्य येणे जिणे । कर्म हे भोगणे दीनाऐसे ॥२॥

दीनाऐसे कदाकाळी हे न व्हावे । समर्थचि व्हावे मुख्य पद ॥३॥

मुख्य पद दृढ धरोनियां देवे । निश्चळचि व्हावे दास म्हणे ॥४॥

३५३ .

आम्हां पतितांचा सांडि केली जरी । आमुचा कैवारी कोण आहे ॥१॥

आम्ही भरंवसा कोणाचा धरावा । सांगावे केशवा दयानिधे ॥२॥

तुजविण आम्हां नाही त्रिभुवनी । धांवे चक्रपाणी दीनबंधो ॥३॥

पतितपावन ब्रीद हे बांधिले । तारावे वहिले दासालागी ॥४॥

३५४ .

जीवनावेगळी गृध्र तो मासोळी । चंचूहूनि गाळी जळत वन्ही ॥१॥

नसतां लौकिकी नामाऐसी क्रिया । मग हांसावया काय उणे ॥२॥

मेहुणा मंगळ हांसईल तुज । म्हणोनियां लाज मज वाटे ॥३॥

रामदास म्हणे नाम जड जाले । ऐसे काय केले देवराया ॥४॥

३५६ .

ब्रीद आपुले राखावे । आम्हां भक्तां सांभाळावे ॥ध्रु०॥

बहुत नाही वाडाचार । आतां एकचि निर्धार ॥१॥

येथे कांही नाही व्यस्त । आतां बोलणे नेमस्त ॥२॥

रामदास म्हणे एक । आतां न धरा हो नेमक ॥३॥

३५७ .

नेणो भक्त नेणो भाव । आम्ही नेणो दुजा देव ॥ध्रु०॥

राघवाचे शरणांगत । जालो रामनामांकित ॥१॥

मुखी रामनामावळी । काळ घालूं पायांतळी ॥२॥

रामदासी रामनाम । बाधूं नेणे काळ काम ॥३॥

३५८ .

समर्थाचे उणे सेवका मरण । तेणे गुणे शीण होत असे ॥१॥

संसारीचे दुःख सांडुनियां आता । मज तुझी चिंता वाटतसे ॥२॥

पतितपावन नाम कैसे राहे । कासावीस होये जीव माझा ॥३॥

रामदास म्हणे भलते करावे । आधी उद्धरावे सेवकासी ॥४॥

३५९ .

माझे सर्व जावो नाम तुझे राहो । हाचि माझा भावो अंतरीचा ॥१॥

पतीतपावन नाम हे जाईल । मग कोण राहील तुजपाशी ॥२॥

यालागी राघवे भक्तां उद्धरावे । आपुले राखावे ब्रीद देवा ॥३॥

रामदास म्हणे देवा तुझी आण । ब्रीदासाठी प्राण देईजेतो ॥४॥

३६० .

ऐसा कोण आहे मुकियाचा जाण । कळे वोळखण न सांगतां ॥१॥

न सांगतां जाणे अंतरीचा हेत । पुरवी आरत सर्व कांही ॥२॥

सर्व कांही जाणे चतुरांचा राणा । धन्य नारायणा लीला तुझी ॥३॥

तुझी लीला जाणे ऐसा कोण आहे । विरंचि तो राहे चाकाटला ॥४॥

चाकाटला मनु देवासी पहातां । दास म्हणे आतां हद्द जाली ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP