मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
दिवटा

भारूड - दिवटा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९५४.
हुश्शार भाई हुशार । अवघ्यांनी असावे खबरदार ।
काळोखे पडते फार । एकासी एक दिसेना ॥१॥
चोराचे कळप फिरती । अवचिता दगा करिती ।
निजो नका जागवितो राती । मी दिवट्या साहेबाचा ॥२॥
हिलालखोर साहेबाचा । नफर आहे इतबाराचा ।
मज राती जागावयाचा हुद्दा दिला जी ॥३॥
मी सारी राती जागतो । अठरा महलांची खबर घेतो ।
साही नजरेत राखितो । मनी धरितो चहूंचे गुज ॥४॥
मी सकळिकांचे करितो बरे । परि मज न मानिती अहंकारे ।
घोरो लागती झोंपेच्या घोरे । ते समूळ नागविती जी ॥५॥
जे मजला मानिती । माझ्या विचारे वर्तती ।
तरि हरगिज झोला न पावती । न नाडती जी ॥६॥
जे जे झोंपेन पीडीले । ते ते अवघेचि नाडले ।
यमयातनेसी जुडले । पाहुणेर घ्यावया ॥७॥
तेथे मदभरे जुडले । ते जन्ममरणराहाटी जोडिले ।
सुटिका नव्हेचि पडिले । बांधोनियां जी ॥८॥
अरे जागा स्वरुपी जागा । मुक्तीचा सोहोळा भोगा ।
कर्माकर्म आपले अंगा । लागोंचि नेदावे ॥९॥
अरे हुशार हुश्शार हुशार । झोंपेने नाडले थोर थोर ।
म्यां जे जे केले खबरदार । ते ते कडेशी पडिले जी ॥१०॥
महादेव निजेने भ्रमला । विष घेऊनि तळमळो लागला ।
मग म्यां खबरदार केला । तो वांचला दो अक्षरी ॥११॥
स्वामी कार्तिक निजेने भ्रमला । बळेंचि परस्त्रिया भोगूं लागला ।
मात्रागमन घडावे त्याला । तो म्यां केला खबर्दार ॥१२॥
महाविष्णु निजेने भ्रमला । परस्त्रीचे मोहे जोगी झाला ।
तो म्यां खबरदार केला । मोह दवडीला शक्तीचा ॥१३॥
ब्रह्मा निजेने भ्रमला । चोरांनी समूळ नागविला ।
सकळ धर्म बुडाला । दुकाळु पडला मोठा जी ॥१४॥
तो म्यां खबरदार केला । मग बापाते स्मरला ।
तेणे येऊनि चोर मारिला । लेंकाचे वित्त दिधले जी ॥१५॥
नारद अभिमाने निनला । बायको होउनी साठी लेक व्याला ।
तो म्यां खबरदार केला  ।  तो पावला पहिला वेष ॥१६॥
इंद्रे मानिले नाहीं मजला । सहस्त्र भोके पडली त्याला ।
शुक्रे डोळा फोडोनी घेतला । न मानी मजला म्हणवुनी ॥१७॥
चंद्रे नाही मानिले मजला । अभिमानेची निजला ।
तो क्षयरोगी जाहला । नाडला आपले करणीने ॥१८॥
दक्ष निजेने भ्रमला । मानिले नाही मजला ।
पूर्व शिरासी मुकला । जाहला पै तो बोकडमुखी ॥१९॥
गुरुने नाही मानिले मजला । बाईल गमवुनी बैसला ।
यम निजेने व्यापिला । जाला केवळ दासीपुत्र ॥२०॥
रावण निजेने भ्रमला । कुलक्षयो करुनि शोकी पडला ।
मग म्यां खबरदार केला । तो जाहला रामरुप ॥२१॥
ऐसे ऐकोनि दृष्टांत । सावध होवोनी कराल स्वहित ।
तरि आपुले फल भोगाल समस्त । मी हुश्शार करितो जी ॥२२॥
मी सांगोन उतराई । कोणासी कांही मागत नाही ।
परोपकारास्तव पाही । मी सांगतो जी ॥२३॥
ऐसे दिवटा जाय बोलोनी । घडि घडि हांक देवुनी ।
दास म्हणे दिवट्यास मानी । तोचि तरेल मोहराती ॥२४॥
ऐसा हा दिवटा । समर्थाचा जाणावा सुभटा ।
जे अनुभविती संसारचोहटा । न येतां समर्था ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP