३९० .
आतां सांभाळा आपुला । पाहो जातां काळ गेला ॥१॥
आतां हित कोणे वेळे । पुढे होणार नाकळे ॥२॥
देहालागी नानापरी । कष्ट जाले जन्मवरी ॥३॥
केले देहाचे भजन । परि देह जाले क्षीण ॥४॥
देहलागिं जीवेभावे । वय वेंचिले आघवे ॥५॥
म्हणे रामदास भले । लोक म्हणती पिसाळले ॥६॥
३९१ .
जाले होऊनियां गेले । आतां कैसे होय भले ॥१॥
यासी सांगतो साधन । जेणे होय समाधान ॥२॥
दिवसेंदिवस व्यथा हरे । अंगी आरोग्यता भरे ॥३॥
अनुतापे दुरी गेले । कांही किंचित उरले ॥४॥
व्यथा हरली विशेष । अल्पमात्र उरले शेष ॥५॥
दास म्हणे जन्मवरी । पुढे विकार नानापरी ॥६॥
३९२ .
अभक्तासी निंदी जन । गुरुद्रोहिया सज्जन ॥१॥
याकारणे वाटे जावे । लागे अवघेचि करावे ॥२॥
सगुण भजतां ज्ञान मोडे । ज्ञाने सगुण अवघे उडे ॥३॥
कर्मे होतसे उपाय । कर्मठपण कामा नये ॥४॥
शब्दे होय समाधान । कामा नये शब्दज्ञान ॥५॥
३९३ .
मर्यादेचे वाटे जावे । अनित्य अव्हाट त्यजावे ॥१॥
एक राम आहे खरा । तिकडे गुरुपरंपरा ॥२॥
एकीकडे आहे जन । एकीकडे ते सज्जन ॥३॥
पुढे विवेक वर्तावे । मागे मूळ सांभाळावे ॥४॥
उदंड जाला समुदाय । तरि आदि सांडू नये ॥५॥
रामीरामदास म्हणे । जनी मान्य हे बोलणे ॥६॥
३९४ .
अंती ऐकलेचिं जावे । म्हणोनि राघवी भजावे ॥१॥
मातापिता बंधुजन । कन्यापुत्र ही सांडून ॥२॥
जन्मवरी केला भार । सेखी सांडोनि जोजार ॥३॥
म्हणे रामीरामदास । सर्व सांडूनियां आस ॥४॥
३९५ .
धरितां देवासी अभाव । तोंडघशी पाडी देव ॥१॥
याकारणे वाटे जावे । लागे अवघेचि रक्षावे ॥२॥
आहे देवासि उपाय । गुरुक्षोभ कामा नये ॥३॥
होतां क्रिया अनर्गळ । त्यास निंदिती सकळ ॥४॥
एक वैराग्य त्यागितां । आंगी लागे लोलंगता ॥५॥
रामीरामदास म्हणे । सर्व नीतीने करणे ॥६॥
३९६ .
वेल चालिला कोमळ । त्यासी माया आले फळ ॥१॥
आदिअंती एक बीज । जाले सहजी सहज ॥२॥
तयामध्ये बीज सार । येर तृणाचा विचार ॥३॥
मूळ तुटले बीज जळाले । होते जयाचे ते गेले ॥४॥
सर्वसंग परित्यागी । दास म्हणे महायोगी ॥५॥
३९७ .
काम क्रोध खवळले । मद मत्सर सांडिले ॥१॥
त्यां आधीन लागे होणे । ऐसे केले नारायणे ॥२॥
लोभ दंभ अनावर । जाला गर्व अहंकार ॥३॥
दास म्हणे सांगो किती । पडिली ऐशांची संगति ॥४॥