२७४ .
आतां कोणी शरण जावे । सत्य कोणते मानावे ॥ध्रु०॥
नाना पंथ नाना मते । भूमंडळी असंख्याते ॥१॥
जपी तपी नाना हटी । मंत्रावळी लक्षकोटी ॥२॥
एक मुद्रा लावविती । एक आसन घालिती ॥३॥
एक दाविती देखणी । एक अनुहतध्वनि ॥४॥
एक नासाग्री लक्षिती । एक हृदयी दाविती ॥५॥
पिंडज्ञानी तत्त्वज्ञानी । योगाभ्यासी ब्रह्मज्ञानी ॥६॥
पंचाक्षरी धूम्रपानी । गोरांजनी उपोषणी ॥७॥
दुग्धाहारी फळाहारी । पर्णाहारी निराहारी ॥८॥
एक विभूति लाविती । एका प्रिय द्वारावती ॥९॥
एक औषधीप्रयोग । एक देती धातुयोग ॥१०॥
दंडधारी जटाधारी । एक बाळब्रह्मचारी ॥११॥
मौनी नग्न दिगंबर । पंचाक्षरी योगेश्वर ॥१२॥
एक जोशी आणि वैदिक । एक पंडित पुराणिक ॥१३॥
साधु संत मुनीश्वर । ऋषीश्वर कवीश्वर ॥१४॥
गाती हरिदास बागडे । नृत्य करिती देवापुढे ॥१५॥
एक म्हणती अवघे वाव । एक म्हणती अवघा देव ॥१६॥
एक कळोंचि नेदिती । एक दाटोनी सांगती ॥१७॥
एक कर्मीच तत्पर । एका कर्मी अनादर ॥१८॥
एक मानिती सगुण । एक मानिती पाषाण ॥१९॥
एकी केला सर्व त्याग । एक म्हणती राजयोग ॥२०॥
रामदास सांगे खूण । भक्तीविण सर्व शीण ॥२१॥
२७५ .
शरण जावे संतजनां । सत्य मानावे निर्गुणा ॥१॥
नानामती काय चाड । करणे सत्याचा निवाड ॥२॥
ज्ञाने भक्तीस जाणावे । भक्त तयास म्हणावे ॥३॥
रामीरामदास सांगे । सर्वकाळ संतसंग ॥४॥
२७६ .
संसार करावा सुखे यथासांग । परी संतसंग मनी धरा ॥१॥
मनी धरा संतसंगति विचारा । येणे पैलपार पाविजेतो ॥२॥
पाविजेतो याची प्रचीत पहावी । निरुपणी व्हावी अतिप्रीती ॥३॥
अतिप्रीती तुम्ही निरुपणी धरा । संसारी उद्धरा असोनियां ॥४॥
२७७ .
ज्या जैसी संगति त्या तैसीच गती । समागमे रीति सर्व कांही ॥१॥
सर्व कांही घडे संगतीच्या गुणे । साधूची लक्षणे साधुसंगे ॥२॥
साधुसंगे साधु होइजे आपण । देवदास खूण सांगतसे ॥३॥
२७८ .
कुग्रामीचा वास आयुष्याचा नाश । विद्येचा अभ्यास तेथे कैचा ॥१॥
तेथे कैंचा देव कैंचा तेथे धर्म । कैसे कर्माकर्म कळेचिना ॥२॥
कळेना परीक्षा चातुर्यमर्यादा । लागतसे सदा पोटधंदा ॥३॥
पोटधंदा नीच जनाची संगति । तेथे कैची गति विवेकाची ॥४॥
संतसंगे सुख रामीरामदासी । दास म्हणे स्थिति पालटावी ॥५॥