मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
संतसंग

विविध विषय - संतसंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२९७ .

जाणावा तो साधु । जया पूर्ण बोधु । भूतांचा विरोधु जेथ नाही ॥१॥

कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो । सदा निःसंदेह देहातीत ॥२॥

जया नाही क्रोध जया नाही खेद । जया नाही बोध कांचनाचा ॥३॥

रामदास म्हणे साधूची लक्षणे । अति सुलक्षणे अभ्यासावी ॥४॥

२९८ .

बोलण्यासारिखे चाले जो सज्जन । तेथे माझे मन विगुंतले ॥१॥

नाही अभिमान शुद्ध ब्रह्मज्ञान । तेथे माझे० ॥२॥

वृत्ति उदासीन स्वधर्मरक्षण । तेथे माझे० ॥३॥

पूर्ण समाधान सगुणभजन तेथे ॥४॥

दास म्हणे जन भावार्थसंपन्न तेथे माझे०॥५॥

२९९ .

जाणावा तो योगी उदास वीतरागी । अहंभाव त्यागी अंतरीचा ॥१॥

स्वजन स्वदेश सांडूनी उदास । जेणे आशपाश तोडियेला ॥२॥

रमा सरस्वति वैभव व्युत्पत्ति । ज्ञानबळे चित्ती चाड नाही ॥३॥

पूर्ण पूर्णकाम तेणे जो निष्काम । विषयापभ्रम तुच्छ केला ॥४॥

विवेकाचे बळ जाहले प्रबळ । बाह्य मायाजाळ त्यागियेले ॥५॥

धन्य तो पै दास संसारी उदास । तया रामदास मानीतसे ॥६॥

३०० .

पूर्ण समाधान इंद्रियेदमन । श्रवण मनन निरंतर ॥१॥

निरंतर ज्याचे हृदयी विवेक । उपासना एक तोचि धन्य ॥२॥

धन्य तोचि एक संसारी पाहतां । विवेके अनंता ठायी पाडी ॥३॥

ठायी पाडी निज स्वरुप आपुले । असोनि चोरले जन्मोजन्मी ॥४॥

जन्मोजन्मी केले पुण्य बहुसाल । तरीच घडेल संतसंग ॥५॥

संतसंग जया मानवा आवडे । तेणे गुणे घडे समाधान ॥६॥

समाधान घडे सज्जनाच्या संगे । स्वरुपाच्या योगे रामदासी ॥७॥

३०१ .

साधु आणि भक्त व्युत्पन्न विरक्त । तपोनिधि शांत अपूर्वता ॥१॥

अपूर्वता जनी शुध्द समाधानी । जनाचे मिळणी मिळो जाणे ॥२॥

मिळो जाणे जना निर्मळ वासना । अंतरी असेना निंदा द्वेष ॥३॥

निंदाद्वेष नसे जनी लक्ष असे । जेथे कृपा वसे सर्वकाळ ॥४॥

सर्वकाळ जेणे सार्थकी लाविला । वंश उद्धरिला नामघोषे ॥५॥

नामघोष वाचे उच्चारी सर्वदा । संताच्या संवादा वांटेकरी ॥६॥

वांटेकरी जाला सायुज्यमुक्तीचा । धन्य तो दैवाचा दास म्हणे ॥७॥

३०२ .

जाणावा तो नर देवचि साचार । वाचे निरंतर रामनाम ॥१॥

सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व । तयालागिं सर्व सारिखेची ॥२॥

निंदकां वंदकां संकटी सांभाळी । मन सर्वकाळी पालटेना ॥३॥

पालटेना मन परस्त्रीकांचनी । निववी वचनी पुढिलांसी ॥४॥

पुढिलांसी नाना सुखे देत आहे । उपकारी देह लावितसे ॥५॥

लावितसे देह रामभजनासी । रामीरामदास रामभक्त ॥६॥

३०३ .

तूंचि ब्रह ऐसे वेदाचे वचन । तेंचि संतजन दृढ करी ॥१॥

दृढ करी साधु तूंचि ब्रह्म ऐसे । तरि कां विश्वासे धरिजेना ॥२॥

धरिजेना मनी साधूचे वचन । वेदहि अमान्य कां करावा ॥३॥

करावा निश्चयो स्वये शाश्वताचा । तिही प्रचीतीचा ऐक्यभाव ॥४॥

ऐक्यभावे जरी संतांचे वचन । तरी समाधान पाविजेल ॥५॥

पाविजेल निजस्वरुप आपुले । जरी विश्वासले मन तेथे ॥६॥

मनाचा विश्राम तोचि आत्माराम । रामदासी वर्म सांगतसे ॥७॥

३०४ .

जे पंचभूतिक ते सर्व मायिक । बोलती विवेक संतजन ॥१॥

संतजनी सर्व मायिक बोलावे । तरी कां फिरावे तीर्थाटण ॥२॥

तीर्थाटण देव मायिकाचे पोटी । तरी आटाआटी कां धरावी ॥३॥

कां करावी पूजा सांडूनी परमात्मा । मूर्खस्य प्रतिमा हे वचन ॥४॥

हे वचन मिथ्या कैसे हो करावे । काय हो धरावे आतां आम्ही ॥५॥

आतां आम्ही वाक्य मिथ्या म्हणो नये । देव धर्म काय मोकलावे ॥६॥

मोकलावा देव ऐसे म्हणो नये । तरी वाक्य काय मिथ्या आहे ॥७॥

मिथ्या नव्हे वाक्य मिथ्या नव्हे देह । पडिला संदेह काय कीजे ॥८॥

कीजे दृढभाव सगुण देवासी । जंव कल्पनेसी उरी आहे ॥९॥

कल्पनेचे रुप विवेक विराले । मग सर्व जाले गंगाजळ ॥१०॥

गंगाजळ जाले निर्विकल्पे केले । सगुण राहिले सहजचि ॥११॥

सहज तेंचि कीजे उपाधि न कीजे । एकांती बोलिजे गुरुगम्य ॥१२॥

गुरुगम्य आहे कल्पनेवेगळे । कल्पनेच्या मुळे वाद उठे ॥१३॥

वाद उठे जनी ऐसे न करावे । त्रिकांड जाणावे वेदवाक्य ॥१४॥

वेदवाक्य बोले कर्म उपासना । अंती शुद्धज्ञाना बोलियेला ॥१५॥

बोलियेला पूर्वपक्ष तो सिद्धांत । केला निश्चितार्थ संतजनी ॥१६॥

संतजनी दृढ विश्वास धरावा । मग विसरावा संदेह तो ॥१७॥

संदेह धरी ती कल्पना आपुली । निर्विकल्प केली संतजनी ॥१८॥

संतजनी केला निश्चयो धरावा । तेथे अहंभावा उरी नाही ॥१९॥

उरी नाही संतसंगे संदेहासी । रामीरामदासी निःसंदेह ॥२०॥

३०५ .

आमुचे सज्जन संत साधुजन । होय समाधान तयांचेनि ॥१॥

तयांचेनि संगे पाविजे विश्रांती । साधु आदि अंती सारिखेची ॥२॥

सारिखेची सदा संत समाधानी । म्हणोनिया मनी आवडती ॥३॥

आवडती सदा संत जिवलग । सुखरुप संग सज्जनांचा ॥४॥

सज्जनांचा संग पापाते संहारी । म्हणोनियां धरी रामदास ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP