मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
दृष्ट

देवताविषयक पदे - दृष्ट

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११०१.
( राग-काफी; ताल-दादरा )
रंग रामी मना रंग रामी । रामरंग तोचि अभंग व्यर्थ कामी ॥ध्रु०॥
रामपायी गुंतुनि राही । कां पडसी अपायी ॥१॥
राम आमुचा जीव जीवाचा । ठाव विश्रामाचा ॥२॥
कीर्ति जयाची वर्णितांची । मुक्ति रे फुकाची ॥३॥
कोळी कबीर दास अपार । तारिले साचार रे ॥४॥
नाम जपावे अनन्य भावे । रामदास व्हावे ॥५॥

११०२.
( राग-मारु; ताल-धुमाळी )
देखिला हो राघव देखिला हो ॥ध्रु०॥
रुप रामाचे लावण्य साचे । ध्यान विश्रामाचे ॥१॥
चंचळ मानस जाले पाहे वास । रामीरामदास ॥२॥

११०३.
( राग-सारंग; ताल-धुमाळी )
देखिला राघव नयनी । मृदुसुमनशयनी ॥ध्रु०॥
नासतसे तम भासत उत्तम । धन्य विरोत्तम राम रघोत्तम ॥१॥
सर्व गुणागुण निर्मळ ते गुण । विमळ विभूषण भक्तविभूषण ॥२॥
भक्त गुणीजन मुक्त मुनीजन । देव बहुजन वंदिति सज्जन ॥३॥

११०४.
( ताल-दीपचंदी; चाल-निर्गुण रुप० )
राममय मानस जाले । चिंतनी चित्त निवाले ॥ध्रु०॥
हर अपरांपर त्याचे हि अंतर । ज्याचेनि नामे निवाले ॥१॥
निरंजनी मन पाहतं शोधुन । अद्वैती द्वैत बुडाले ॥२॥
रामदासी ध्यान हे चि हे साधन । मीपण रामी बुडाले ॥३॥

११०५.
( चाल-साधुसंतां मागणे० )
राजीवनयन राम देखिला हो । त्याचे रंगी मानस रंगले हो ।
त्याचे संगी माझे दुःख भंगले । वो साजणी ॥ध्रु०॥
देवा मंडण देव अयोध्येचा । बंद सोडवीला तेतिस कोटी देवांचा ।
जाणती हा दीनाचा कैवारी वो सा० ॥१॥
ज्याचे नामी विश्वासला गौरीहर । त्याचे ध्यान लागले निरंतर ।
दास म्हणे आम्हां दीनांसी आधार वो सा० ॥२॥

११०६.
( राग-कामोद; ताल-द्रुत एकताल; चाल-जाले सार्थक० )
करी धनुष्यबाण अंतरी बिंबले ठाण ।
वेगळे करील कोण आतां रे ॥ध्रु०॥
रामी बोधली बुद्धि सांडूनियां उपाधि ।
आणीक देवाची शुद्धि नाही रे ॥१॥
राम आठवे जनी राम आठवे मनी ।
राम ध्यानी मनी आठवतो रे ॥२॥
रामदास म्हणे आतां सांडोनि रामाची कथा ।
आणिक सर्वथा चाड नाही रे ॥३॥

११०७.
( राग-धनाश्री; ताल-दादरा; चाल-जप रे मना० )
मानस वेधले रामी । सच्चिदानंदन घनश्यामी ।
हो मानस वेधले रामी ॥ध्रु०॥
रामी रंगले कामी विन्मुख जाले । विश्रामले निजधामी ॥१॥
मन हे आपण सोडुनी मीपण । लोधले आरामी ॥२॥
रामीरामदास सर्वस्वे उदास । निष्कामता सर्वकामी ॥३॥

११०८.
( चाल-नाही रे भय० )
रामी रंगले मन माझे रे । नावडे आणिक कांही दुरे रे ॥ध्रु०॥
धीर गंभीर रामरावो रे । सुरवरां जाला उपाव रे ॥१॥
ऐसा दुसरा कोण आहे रे । माझ्या राघवासि उपमा न साहे रे ॥२॥
दास म्हणे मज आतां रे । मुक्ति नलगे गुण गातां रे ॥३॥

११०९.
( राग-मारु अथवा भैरवी; ताल-धुमाळी )
राघवी मन तल्लीन जाले । आपेंआप निवाले ॥ध्रु०॥
नीलतमाल तनु रुप साजे । देखत सुख सुखासि मिळाले ॥१॥
राघवदास विलासत भासे । सुखी दुःख मिळाले ॥२॥

१११०.
( राग-बिहाग; ताल-धुमाळी )
कैसेनि बोलावे वाचे । स्वरुप हे श्रीरामाचे ।
शेषही शिणला साच । वर्णायालागी राम ॥१॥
वेद तोही मौनावला । नेतिशब्द परतला ।
तन्मय होवोनी ठेला । जेथींचा तेथे ॥२॥
ज्ञानाज्ञाना वृत्तिशून्य । पूर्णरुप पुरातन ।
रामदास तनुमन । अर्पिजे पदी राम ॥३॥

११११.
( राग-सारंग; ताल-धुमाळी )
बोलिला नवजाय । तो राघव । तो या शब्दा नये ॥ तो० ॥ध्रु०॥
ध्यान नसतां ना कळे । तो० । तर्कासी न कळे ॥१॥
श्रुति गौप्य जेथे । तो० । रामदास तेथे ॥२॥

१११२.
( राग-बागेश्री; ताल-धुमाळी )
तेथे माझे तन मन धन ॥ध्रु०॥
परम सुंदर रुप मनोहर । करी धरुनि धनुर्बाण ॥१॥
राम लक्ष्मण जनकतनया । वामभागी शोभताहे ॥२॥
पीत पीतांबर कांसिला । शोभतसे दिव्य ठाण ॥३॥
भीम भयानक सन्मुख मारुती । कर जोडुनि वाट पाहे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP