मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
संतसंग

विविध विषय - संतसंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


३०६ .

संतसंगे जन्म चुकती यातना । आणि जनार्दना भेटि होय ॥१॥

भेटि होय संतसंगे राघवाची । आणिक भवाची शांति होय ॥२॥

शांति होय काळ शांति होय वेळ । मन हे निर्मळ जरि होय ॥३॥

जरि राहे भाव राघवी सर्वदा । संसार आपदा तया नाही ॥४॥

तया नाही दुःख तया नाही शोक । दास म्हणे एक राम ध्यातां ॥५॥

३०७ .

विदेह्यासी कैसे देहाचे बंधन । बोलिजे अज्ञान निरसाया ॥१॥

निरसोनी माया वांझेची कुमरी । मृगजळपुरी उतरावे ॥२॥

उतरावे विष स्वप्नींच्या सर्पाचे । आणि निःसंगाचे ॥३॥

संगदुःख तुटे अजन्म्याचा जन्म । नाथिलाचि भ्रम बाधितसे ॥४॥

बाधितसे भ्रम संतसंगेविण । रामदासी खूण साधुसंगे ॥५॥

३०८ .

महापापी लोक हे पूर्वी असती । तेचि पालटती जयाचेनि ॥१॥

जयाचेनि योगे होतसे उपाय । तुटती अपाय नानाविध ॥२॥

नानाविध जन सुबुद्ध चि होती । साधूचे संगती दास म्हणे ॥३॥

३०९ .

देव दैत्य बंधु लागला विरोधु । तैसाची संबंधु गोत्रजांसी ॥१॥

ऐसा हा मत्सर लागलासे पाठी । देवा तुझी भेटी केंवि घडे ॥२॥

ब्राह्मणा यवना लागलासे कलह । अस्त्रियां विग्रह लागलासे ॥३॥

लागलासे कलह सर्वत्र जीवांसी । नाही सज्जनांसी दास म्हणे ॥४॥

३१० .

धन्य त्याचे कुळ धन्य त्याचा वंश । जे कुळी हरिदास अवतरला ॥१॥

धन्य ते जननी धन्य तिची कुशी । जे हरिप्रियासी प्रसवली ॥२॥

धन्य ते संबंधी संतांचे सोइरे । संसर्गे उद्धरे कुळ त्यांचे ॥३॥

धन्य तें पै ग्राम धन्य तो पै देश । जेथे रहिवास वैष्णवांचा ॥४॥

धन्य त्यांचे सखे वैष्णवी सर्वदा । ते सर्व गोविंदा जिवलग ॥५॥

धन्य ते भाविक वंदिती हरिदास । तयां ऋषीकेशी वंदितसे ॥६॥

धन्य ते निंदक निंदिती सज्जन । येणे भावे घडे ध्यान त्यांचे ॥७॥

धन्य दास दासी सज्जनसेवेसी । ते सुरवरांसी वंद्य होती ॥८॥

धन्य पशु श्वान वैष्णवगृहीचे । कळिकाळ त्यांचे पाय वंदी ॥९॥

रामदास म्हणे तरीच धन्य होणे । जरी संग लाधणे सज्जनाचा ॥१०॥

३११ .

देव आम्हांसी जोडला । संतसंगे सांपडला ॥१॥

कडाकपाटी शिखरी । धुंडिताती नानापरी ॥२॥

नाना शास्त्रे धांडोळती जयाकारणे कष्टती ॥३॥

रामदास म्हणे भावे । वेगी संता शरण जावे ॥४॥

३१२ .

ब्रह्मादिकांसी दुर्लभ । देव भक्तांसी सुलभ ॥१॥

थोरपणे आढळेना । जाणपणासी कळेना ॥२॥

नाही योगाची आटणी नाही तप तीर्थाटणी ॥३॥

दास म्हणे साधूविण । नाना साधनांचा शीण ॥४॥

३१३ .

लोखंडाचे सोने परिसाच्या योगे । साधूचेनि संगे बद्ध सिद्ध ॥१॥

बद्ध सिद्ध होती देखत देखतां । होय सार्थकता तत्काळचि ॥२॥

तत्काळचि वाल्हा जाला तो वाल्मिक । दास पुण्यश्लोक रामनामे ॥३॥

३१४ .

देव अभक्तां चोरला । आम्हां भक्तां सांपडला ॥१॥

भेटी जाली सावकाश । भक्तां न लागती सायास ॥२॥

पुढे विवेक वेत्रपाणी । वारी दृश्याची दाटणी ॥३॥

रामदासाचे अंतर । देवापाशी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP