मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
संतसंग

विविध विषय - संतसंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२८८ .

अनुमाने रान घेतसे वाजट । तयासी चावट कोण बोले ॥१॥

बोलतां बोलतां शीणचि होतसे । संतोष जातसे अंतरीचा ॥२॥

अंतरीचा देहे अंतरी पहावा । मीपण हे देवा समर्पावे ॥३॥

समर्पावे भावे तनमनधन । आत्मनिवेदन कैसे आहे ॥४॥

कैसे आहे सोहं कैसे आहे हंसा । वाक्यार्थ आमासा ओळखावा ॥५॥

ओळखतां तेथे तत्त्वेचि सरती । नाही अहंकृति कांही एक ॥६॥

कांही तरी एक वृत्ति कामा नये । घडतो उपाय बहुविध ॥७॥

बहुविध आग्र करावा एकाग्र । सूक्ष्म समग्र विवंचावे ॥८॥

विवंचावे चळ चंचळ सर्वदा । तुटती आपदा संसारीच्या ॥९॥

संसारिक लोक त्या नाही विवेक । मुख्य देव एक विसरली ॥१०॥

विसरली तेणे पुनरागमन । श्रवण मनन केले नाही ॥११॥

केले नाही हित आणुले स्वहित । सर्व अंतवंत लौकिक हा ॥१२॥

लौकिकाकरितां कांहीच घडेना । अंतरी जडेना समाधान ॥१३॥

समाधान होय साधूचे संगती । पाविजे ते गति दास म्हणे ॥१४॥

२८९ .

प्रवृत्ति सासुर निवृत्ती माहेर । तेथे निरंतर मन माझे ॥१॥

माझे मनी सदा माहेर तुटेना । सासुर सुटेना काय करुं ॥२॥

काय करुं मज लागला लौकिक । तेणे हा विवेक दुरी जाय ॥३॥

दुरी जाय हित मज चि देखतां । प्रेत्न करुं जाता होत नाही ॥४॥

होत नाही प्रेत्न संतसंगेवीण । रामदास खूण सांगतसे ॥५॥

२९० .

इंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनी । माझे राज्य कोणी घेईना की ॥१॥

घेईना की कोणी बळिया दानव । घालिना की देव कारागृही ॥२॥

कारागृह देवादिकांचे चुकेना । तेथे काय जनां चुकईल ॥३॥

चुकईल भोग हे कईं घडावे । लागेल भोगावे केले कर्म ॥४॥

केले कर्म तुटे जरी भ्रांति फिटे । दास म्हणे भेटे संतजन ॥५॥

२९१ .

भाव धरितां संतांपायी । तेणे देव पडे ठायी ॥१॥

नाना देवांचे भजन । तेणे नव्हे समाधान ॥२॥

सकळ देवांमध्ये सार । आहे अनंत पार ॥३॥

रामीरामदास म्हणे । अवघे देव केले जेणे ॥४॥

२९२ .

संत कैसेनि जाणावे । साधु कैसे ओळखावे ॥१॥

बहुत गोसावी असती । भले अवघेचि दिसती ॥ध्रु०॥

एक संसारी गुंतले । एकी वेष पालटिले ॥२॥

रामीरामदास म्हणे । कैंसे संतांची लक्षणे ॥३॥

२९३ .

तेचि जाणावे सज्जन । जया शुद्ध ब्रह्मज्ञान ॥१॥

जंववरि देहाची संगती । तंववरि सगुणी भजती ॥ध्रु०॥

जाणोनियां सारासार । सदा श्रवणी तत्पर ॥२॥

बाह्यत्याग संपादणे । अंतर्त्याग निरुपणे ॥३॥

कर्म करिती आवडी । फळाशेची नाही गोडी ॥४॥

शांति क्षमा आणि दया । सर्व सख्य माने जया ॥५॥

हरिकथा निरुपण । सदा श्रवण मनन ॥६॥

२९४ .

जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । निःसंदेह मनी सर्व काळ ॥१॥

मिथ्या देहभान प्रारब्धाआधीन । राखे समाधान पूर्णपणे ॥२॥

आवडीने करी कर्मउपासना । सर्वकाळ ध्यानारुढ मन ॥३॥

जाणे ब्रह्मज्ञान स्वये उदासीन । मानीतो वमन द्रव्यदारा ॥४॥

पदार्थाची हानी होतां नये काणी । जयाची करणी बोलाऐसी ॥५॥

दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य । जयाचा अनन्य समुदाव ॥६॥

२९५ .

पांचां लक्षणी पुरता । धन्य धन्य तोचि ज्ञाता ॥१॥

राखे गुरुपरंपरा । देव सगुण दुसरा ॥२॥

विवेक वैराग्य सोडीना । कर्म उपासना सोडीना ॥३॥

बाह्य बोले शब्दज्ञान अंतर्यामी समाधान ॥४॥

रामीरामदास कवी । न्यायनीतीने शिकवी ॥५॥

२९६ .

अंतर्यामी ब्रह्मज्ञान । बाह्य सगुणभजन ॥१॥

धन्य धन्य तेचि ज्ञान । अंतर्यामी समाधान ॥२॥

निरुपणे अंतर्त्याग । बाह्य संपादी वैराग्य ॥३॥

रामीरामदास म्हणे । ज्ञाने स्वधर्म रक्षणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP