मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
कर्मकांड

विविध विषय - कर्मकांड

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२१७ .

तुजसाठी व्हावे बा उदास । रात्र आणि दिवस हा विचार ॥१॥

परि मना विघ्ने चतुर्दशा मोठी । केव्हा घडे भेटी देवाची ते ॥२॥

मध्येचि गवसती विघ्नांच्या अडचणी । चुकताती दोन्ही कर्म धर्म ॥३॥

म्हणुनि सुचवितो विचारी तूं चित्ती । न जाल्या फजिती दुणी होय ॥४॥

रामदास म्हणे सावध तूं चित्ता । विघ्ने तुज आतां निरुपतो ॥५॥

२१८ .

कीर्तन करितां कुटाळी करिती । न धरावा चित्ती त्यांचा राग ॥१॥

आत्मरुपी नाही निंदा आणि स्तुति । देहासी निंदिती ते तो निंद्य ॥२॥

दुसरिया अर्थे चित्त ने उदासी । तेणे ऋषीकेशी मुखी येतो ॥३॥

निंदेचे ते ऐसे सहन करावे । शांतत्व धरावे चित्ती दृढ ॥४॥

रामदास ह्मणे मना तूं विचारी । कोणता संसारी बरा लोक ॥५॥

२१९ .

आचारितां कां न पाहिला विचार । आतां कां अंतर खोंचवले ॥१॥

करितां हरुष मानिलासी चित्ती । होता ते फजिती कां कोपसी ॥२॥

यमाचे आघात येथेचि चुकती । जोडेल श्रीपति येणे नेमे ॥३॥
जनाची वैखरी शोधी रे तूं बरी । नाही नाही खरी कां ऐकसी ॥४॥

मानसी विचार सार तेथे आहे । रामदासी राहे हाचि नेम ॥५॥

२२० .

बोले बहु त्याला म्हणती वाचाळ । बोलेना तो खळ मैंद म्हणती ॥१॥

बळकट धश्चोट ते काय व्यसनी । कर्मठ जो प्राणी तो पोंचट ॥२॥

होईना संसार म्हणोनि संन्यासी । हांसती तयासी ऐशा रीति ॥३॥

थोडे भक्षी म्हणती नाही दैवी अन्न । निस्पृहिया हीन मति वदती ॥४॥

निस्पृहिया हीन मति वदती । रामदास म्हणे बरवे पाहणे । जनाचे बोलणे कोठवरी ॥५॥

२२१ .

तारुण्यवयांत जरि लागे साधनी । करावा तो कोणी संसार हा ॥१॥

संसारात सर्व म्हणती घडते । सर्वस्व बुडते हे न कळे ॥२॥

ताटीस संचाया चाले वर्षभर । नाही हे उत्तर याचकासी ॥३॥

ईहीयांत घडे कुटुंबाचा नाश । पाप न दिल्यास गांठी पडे ॥४॥

रामदास म्हणे सूक्ष्मदृष्टी पाहे । संसारी जो राहे तो पाषांडी ॥५॥

२२२ .

टाकोनि जनासी अरण्यी जे जाती । पूर्ण ते होती कल्पांतरी ॥१॥

अरण्या गेल्याने जनोक्ति सहन । न जाल्या अभिमान केवि जाय ॥२॥

ज्या स्थळी प्रतिष्ठा त्या स्थळीचे जन । निंदिल्या वचन न साहती ॥३॥

तयासी सोसावे थोर हे साधन । होईल तो पूर्ण तेणेकरुनी ॥४॥

रामदास म्हणे ऐसे जे निश्चयी । माथा त्यांचे पायी ठेविलासे ॥५॥

२२३ .

संसारात सुखी कोण हो विचारी । दुःख घरोघरी एक एका ॥१॥

एका घरी नाही संतानाचे मुख । एक ते विन्मुख राजद्वारी ॥२॥

कोणी वृत्तिहीन कोणी वित्तहीन । रोगार्णवी मग्न जाले किती ॥३॥

ऐसेही असोनी साधक निंदिती । जोडणी करिती पापाची ते ॥४॥

यासाठी मना हे मानूं नको खरे । आपुल्या विचारे राहे बापा ॥५॥

रामदास म्हणे सुख रामपायी । तेथे तूं का राही निश्चळता ॥६॥

२२४ .

लोकांत राहोनि कैसे ते नसावे । साधन हे ठावे करितो तुज ॥१॥

बोलणे सवेचि श्रवण करावे । मनांत धरावे मनन ते ॥२॥

ज्ञानपक्षी सर्व लावूनियां घ्यावे । तदर्थ टाकावे जनी तोचि ॥३॥

आपुलिया देशी भिक्षार्थी सहनार्थ । राहोनि अनर्थ चुकवावे ॥४॥

रामदास म्हणे ऐसे तूं म्हणसी । कां न दूरदेशी जावे सांगा ॥५॥

२२५ .

तरि ऐके बाप तीर्थेची जे जोडे । सहज ते घडे ऐसे करी ॥१॥

नानाविधबुध्दिप्रकारीचे जन । तयांलागी खूण सांगूं नये ॥२॥

बाहेरी भजन अंतरी संसार । कुटिळ कठोर वेषधारी ॥३॥

नमस्कार त्यासी मुखे ते बोलावे । त्यासवे न जावे देहे मने ॥४॥

रामदास म्हणे भजन ऐकती । करोनि श्रीपती करी सखा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP