४२२ .
नाही एक उपासना । कैंची भक्तीची भावना ॥१॥
नाही निश्चय अंतरे । मन फिरे दारोदारी ॥२॥
ज्यास नाही एक देव । सातांपांचा ठायी भाव ॥३॥
दृढ धरी निश्चयेसी । मूर्खपणे एकदेशी ॥४॥
नानाकारे जाले मन । कैंचे निष्ठेचे भजन ॥५॥
रामीरामदास म्हणे । निष्ठेविणे काळसुणे ॥६॥
४२३ .
पाहे दासीचिया सुता । कोण जाणे कोण पिता ॥१॥
एकनिष्ठ नाही भाव । त्यासी कैचा एक देव ॥२॥
नृत्यांगना जाली सती । कोण जाणे किती पती ॥३॥
निष्ठेवीण जैसा पशु । भोग भोगी बहुवसु ॥४॥
होती कुळवंत सुंदरी । भ्रष्ट जाली बहुतां घरी ॥५॥
रामीरामदास म्हणे । जळो बहुचकाचे जिणे ॥६॥
४२४ .
कापूर राहेना रक्षणावांचोनी । जाय तत्क्षणी निघोनियां ॥१॥
निघोनियां जाय पारा एकसरां । तैसे ज्ञान नरापासोनियां ॥२॥
पासुनियां जाय ज्ञान हे तत्काळ । जंव नाही बळ विवेकाचे ॥३॥
विवेकाचे बळ पाहिजे प्रबळ । तरीच निवळ वृत्ति होय ॥४॥
वृत्ति होय स्थिर श्रवणमनने । राघवाचे ध्याने दास म्हणे ॥५॥
४२५ .
ब्रह्मादिक देव ब्रह्मज्ञानाआड । करिती पवाड विघ्नरुपे ॥१॥
यालागी सगुण भावे उपासना । करिजे निर्गुणा पावावया ॥२॥
सगुणाकरितां इंद्राचे आघात । होती वाताहात एकसरां ॥३॥
रामीरामदास विश्वासी सगुण । सगुणी निर्गुण कळो आले ॥४॥
४२६ .
सांठवणेविण धान्य । धान्येविण सांठवण ॥१॥
एकेविण एक काय । कामा नये वांया जाय ॥२॥
ज्ञानेविण उपासना । उपासनेविण ज्ञाना ॥३॥
रामीरामदासी साधन । नसतां कोरडे भजन ॥४॥
४२७ .
सगुणाकरितां निर्गुण पाविजे । भक्तिविण दुजे सार नाही ॥१॥
साराचे हि सार ज्ञानाचा निर्धार । पाविजे साचार भक्तियोगे ॥२॥
वेदशास्त्री अर्थ शोधुनि पाहिला । तिही निर्धारिला भक्तिभाव ॥३॥
रामीरामदासी भक्तीच मानली । मने वस्ती केली रामरुपी ॥४॥
४२८ .
नित्य कैंचे निरुपण । ज्ञान होतसे मलिन ॥१॥
म्हणोनी सगुणी भजावे । ज्ञानगर्वासी त्यजावे ॥२॥
मोडे मनाची कल्पना । कल्पूं जातां त्या निर्गुणा ॥३॥
मीच ब्रह्म हे धारिष्ठ । तेथे संदेह वरिष्ठ ॥४॥
देहबुध्दि हे सुटेना । द्वैतकल्पना तुटेना ॥५॥
रामीरामदास म्हणे । उपासना याकारणे ॥६॥
४२९ .
ज्ञानगर्वे जो मातला । देव अव्हाटी घातला ॥१॥
त्यासि नावडे सगुण । गेले मीपणे निर्गुण ॥२॥
दोहींकडे अंतरला । थोर विवादी दादुला ॥३॥
देव सांडुनियां पुढे । नाना छंद करी वेडे ॥४॥
जेथे तेथे ज्ञान काढी । भांड जाहला पाषांडी ॥५॥
रामीरामदास म्हणे । मूर्ख दोहींकडे उणे ॥६॥
४३० .
ज्ञातेपणे सखी पोसी । तेंव्हा नव्हे एकदेशी ॥१॥
एकनिष्ठ उपासना । नये अभक्ताच्या मना ॥२॥
करितां आपुला संसार । धरी जीवेंसी जोजार ॥३॥
नाना कष्टी जोडी अर्थ । अर्थाकारणे अनर्थ ॥४॥
पोत्यासाठी राती जागे । रागी श्वानापाठी जागे ॥५॥
रामीरामदास म्हणे । ऐसी मूर्खाची लक्षणे ॥६॥