विविध विषय - उपदेशपर
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
७२०.
रीसाचियेपरी व्हावे सावचित्त । ध्यानी भगवंत सोडुंनये ॥१॥
सोडूं नये सर्वकाळ निजध्यास । श्रवणअभ्यास असो द्यावा ॥२॥
असो द्यावा सदा सन्निध विवेक । तेणे देव एक चोजवेल ॥३॥
चोजवेल देव श्रवणमनने । कुबुद्धि साधने पालटावी ॥४॥
पालटावी सर्व देहाची अहंता । शोधावी तत्त्वतां देहबुद्धि ॥५॥
देहबुद्धि सर्व ज्ञान शोधूं जातां । निसंगा अनंता भेटी होय ॥६॥
भेटी होय ज्ञाने निर्गुण देवाची । मग नाही चीची संसाराची ॥७॥
संसाराची चीची यातना यमाची । चुकविता तोचि धन्य एक ॥८॥
धन्य एक जनी तोचि तो पाहातां । मुक्ति सायुज्यता जया लाभे ॥९॥
जया लाभे मुक्ति सगुणाची भक्ति । दास म्हणे शक्तिआगळा तो ॥१०॥
७२१.
ज्ञानाचे लक्षण क्रियासंरक्षण । वरी विशेषेण रामनाम ॥१॥
रामनाम वाचे विवेक अंतरी । अनुताप वरी त्यागावया ॥२॥
त्यागावया भेदा बाह्य लोलंगता । पाहिजे तत्त्वतां अनुताप ॥३॥
अनुतापे त्याग बाह्यात्कार जाला । विवेकाने केला अंतरीचा ॥४॥
अंतरीचा त्याग विवेके करावा । बाहेर धरावा अनुताप ॥५॥
तापे भक्ति विवेक वैराग्य । घडे त्याचे भाग्य काय सांगो ॥६॥
काय सांगो भाग्य अचळ चळेना । महिमा कळेना ब्रह्मादिकां ॥७॥
ब्रह्मादिकां लाभ ज्ञानाचा दुर्लभ । तो होय सुलभ साधुसंगे ॥८॥
७२२.
प्रचीतीचा देव सप्रचीत भाव । करावा उपाव सप्रचीत ॥१॥
प्रचीतीचा वैद्य प्रचीतीची मात्रा । प्रचीतीच्या मंत्रा पाठकीजे ॥२॥
प्रचीतीने कोणी एक ते पाहावे । जन ओळखावे प्रचीतीने ॥३॥
प्रचीतीने इष्ट प्रचीतीने मित्र । प्रचीतीने सूत्र कोणी एक ॥४॥
कोणी एक कार्य प्रचीती उपाय । दास म्हणे सोय प्रचीतीची ॥५॥
७२३.
चित्त आहे कैसे मळिण ते कैसे । शुद्ध होते कैसे विचारावे ॥१॥
वैद्य ओळखेना रोगहि कळेना । औषध मिळेना प्रचीतीचे ॥२॥
अनुमाने देव अनुमाने भक्त । अनुमाने मुक्त अनुमानी ॥३॥
अनुमाने केले अनुमाने कल्पिले । निर्फळ जाहले सर्व कांही ॥४॥
सर्व कांही बरे प्रचीत आलियां । दास म्हणे वायां अप्रचीती ॥५॥
७२४.
प्रत्ययाचे ज्ञान तेंचि ते प्रमाण । येर अप्रमाण सर्व कांही ॥१॥
सर्व कांही धर्म आणि कर्माकर्म । चुकलियां वर्म व्यर्थ जाती ॥२॥
व्यर्थ जाती जन्म ज्ञानावांचुनीया । केले कष्ट वाया निरर्थक ॥३॥
निरर्थक जन्म पशूचिये परी । जंव ते अंतरी ज्ञान नव्हे ॥४॥
ज्ञान नव्हे सोपे ते आधी पहावे । शाश्वत शोधावे दास म्हणे ॥५॥
७२५.
प्रचीतीवेगळे मिथ्या सर्व कांही । निर्फळचि पाही अप्रचीती ॥१॥
अप्रचीती जेथे फळ कैचे तेथे । निर्फळचि स्वार्थे कासावीस ॥२॥
प्रचीतीची वारी जया आंगी वसे । संग्रहाचे पिसे लाभेविण ॥३॥
लाभेंविण लाभ मानिला सुलभ । लाभ नाही लोभ प्रगटला ॥४॥
प्रगटला लोभ केले निरर्थक । प्रचीति सार्थक दास म्हणे ॥५॥
७२६.
शाहाणे दिसतां ब्रह्मज्ञानेविण । संसाराचा शीण करुनीयां ॥१॥
करुनि संसार रात्रंदिस धंदा । कैसे हो गोविंदा चुकलेती ॥२॥
चुकलेती वायां तुम्ही कां बद्ध हो । अंतरी संदेहो जन्मवरी ॥३॥
जन्मवरी वोझे वाहिले वाउगे । व्यर्थ कामरंगे रंगोनीयां ॥४॥
रंगोनीयां कामी अंतरावे रामी । दास म्हणे उर्मि कामा नये ॥५॥
७२७.
गगन आडतचि नाही । तैसे निरंजन पाही ॥१॥
चंचळगुण ते सगुण । विकारे आडतो पवन ॥२॥
सारासार निवडत नाही । प्रत्ययाने पाही कांही ॥३॥
७२८.
माजी बांधावा भोपळा । तैसी बांधो नये शिळा ॥१॥
सारासार निवडावे । तैसे जाणोनियां घ्यावे ॥२॥
रत्न खडे येर खडे । सगट देतां प्राणी रडे ॥३॥
एके ठायी सोने लाख । लाख देतां मारी हांक ॥४॥
मनुष्य गोडे गोड घेते । कडू अवघेंचि सांडिते ॥५॥
सदा सज्जनाचा संग । दुर्जनाचा संतत्याग ॥६॥
दास म्हणे भक्ति सार । नको अभक्त गव्हार ॥७॥
७२९.
माजी बांधावा भोपळा । तैसी बांधो नये शिळा ॥१॥
घेऊं येते तेंचि घ्यावे । येर अवघेचि सांडावे ॥२॥
विषयवल्ली अमरवल्ली । अवघी देवेंचि निर्मिली ॥३॥
अवघे सृष्टीचे लगट । करुं नये की सगट ॥४॥
अवघे सगट सारिखेच । वाट मोडली साधनाची ॥५॥
आवघेंचि केले देव । जे मानेल तेंचि घ्यावे ॥६॥
दास म्हणे हरिजन । धन्य जाण ते सज्जन ॥७॥
७३०.
ऐका नवरस सुंदर सरस । जेणे होय रस सर्वकाळ ॥१॥
प्रथम शृंगार दुसरा तो हास्य । तिसरा तो रस करुणेचा ॥२॥
रौद्र तो चतुर्थ वीर तो पांचवा । रस तो सहावा भयानक ॥३॥
मोहो तो सातवा बीभत्स हा आठवा । लज्जा तो नववा रस जाण ॥४॥
रसिक बोलणे रसिकचि गाणे । रसिक वाचणे प्रसंगीत ॥५॥
ज्याचे त्याचे परी आवडीसारखे । बोलतां आरीखे लुब्ध होती ॥६॥
लुब्ध होती तरी मृदचि बोलावे । नेमस्त चालावे नीतिन्याये ॥७॥
नीतिन्याये बहुतेकांसी मानीतो । व्याप करील तो भाग्यवंत ॥८॥
भाग्यवंत नर यत्नासी तत्पर । अखंड विचार चाळणेचा ॥९॥
चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा । अखंड शाहाणा तोचि एक ॥१०॥
प्रवृत्ति निवृत्ति चाळणा पाहिजे । दास म्हणे कीजे विचारणा ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : January 26, 2011
TOP