मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


६८१.
डोळां अज्ञाने झांपडी । भोवे देहबुद्धि घानोडी ॥१॥
ऐसा अज्ञान पशु जाणे । जुंपिला संसाराच्या घाणे ॥२॥
खांदी ओझे विषयांचे । पाठी फटके सुखदुःखाचे ॥३॥
रामीरामदास म्हणे । व्यर्थ गेले त्याचे जिणे ॥४॥

६८२.
नको करुं अभिमान । होणार ते देवाधीन ॥१॥
बहू द्रव्याने भुलले । काळे सर्वहि ग्रासिले ॥२॥
जे जे म्हणती मी शक्त । ते ते जाहले अशक्त ॥३॥
रामदास सांगे वाट । कैचा होईल शेवट ॥४॥

६८३.
होणार ते कांही आतां पालटेना । तरी चिंता मना कां करिसी ॥१॥
नादा बिंदा भेटी जाली जये काळी । तेव्हांचि कपाळी लिहियेले ॥२॥
हानि मृत्यू लाभ होणार जाणार । सर्वहि संसार संचिताचा ॥३॥
लल्लाटी लिहिले होउनियां गेले । संचीत भोगिले पाहिजे ते ॥४॥
त्यागुनीयां देश सेविला विदेश । तरी सावकाश भोगप्राप्ति ॥५॥
सुखचा आनंद दुःखे होय खेद । ऐसे दोन्ही भेद पुरातन ॥६॥
देहाचे निमित्त चुकवितां नये । आतां चिंता काय करुनियां ॥७॥
त्रैलोक्य त्यागावे तरी ते भोगावे । प्राक्तन सांगावे कोणापासी ॥८॥
प्रालब्ध चुकेना ब्रह्मादिकांचेनि । सर्व देव यांनी भोगियेले ॥९॥
भोगियेले देव दानव मानव । किन्नर गंधर्व लोकपाळ ॥१०॥
प्राप्त पालटाया बहु प्रेत्न केले । परी पालटीले नाहीत की ॥११॥
रावण बाहेर आणि कंसासुर । परी ते होणार होत आहे ॥१२॥
पुत्राचेनि सळे झाली नागकुळे । सुटेना कपाळे परीक्षिती ॥१३॥
ऐसे थोर थोर सांगतां अपार । भोगिले साचार होणाराते ॥१४॥
होणार ते आहे देहाचा संबंध । रामदासी बोध देहातीत ॥१५॥

६८४.
जाणावा तो लंड ज्ञानियां तरमुंड । शक्तीविण तोंड वाजवीतो ॥ध्रु०॥
कर्माचिये वेळे भक्त म्हणवावे । ज्ञान मोकलावे भक्तपणे ॥१॥
स्वधर्माचे वेळे ज्ञाने झांकी डोळे । भोजनाचे वेळे सावधान ॥२॥
भक्तीचे समयी अद्वैत गोसावी । पोटस्ते पोसावी कन्यापुत्र ॥३॥
विधीचिये वेळे निस्पृह वैरागी । पुढे द्रव्यालागी हिंडतसे ॥४॥
सर्व ब्रह्मा ऐसा निश्चयो थावरी । मागे निंदा करी सज्जनाची ॥५॥
निरुपणी त्याग जनांसी सांगत । स्वये लोलगंत तंबाखूचा ॥६॥
दास म्हणे मना नको काढूं वर्मे । प्राणी केली कर्मे पावतील ॥७॥

६८५.
शरण जावे रामराया ॥ पुढती न पाविजे हे काया ॥१॥
जीव जीवांचा आहार ॥ विश्व होतसे काहार ॥२॥
एक शोके आक्रंदती ॥ तेणे दुजे सुखी होती ॥३॥
दास म्हणे सर्व दुःख ॥ रामाविण कैसे सुख ॥४॥

६८६.
वासनेची बेडी देहबुद्धि वांकडी । वाजे हुडहुडी ममतेची ॥१॥
वैराग्याचा वन्ही विझोनियां गेला । संचित खायाला पुण्य नाही ॥२॥
भक्ति पांघरुण ते माझे सांडले । मज ओसंडीले संतजनी ॥३॥
नामसंजीवनी मुखी नाही पाणी । निंदेची पोहाणी प्रबळली ॥४॥
रामदास म्हणे ऐसियाचे जिणे । सदा दैन्यवाणे रामेविण ॥५॥

६८७.
सर्व सृष्टीचा चालक । चोजवेना देव एक ॥१॥
तरित्वां साधिले ते काय । कोण पाहिला उपाय ॥२॥
कोण उपजोनि मरतो । न कळे की कोठे जातो ॥३॥
देव कोण भक्त कोण । हा तो अवघाचि अनुमान ॥४॥
रामदास सांगे हित । तुझे तुज न कळे स्वहित ॥५॥

६८८.
सर्व काळ शेंडामूळ । येत जातसे मुंगुळ ॥१॥
तैसा कां करिसी येरझारा । शरण जाई रघुवीरा ॥२॥
हाती धरुनियां सुत । खालवनी येते जाते ॥३॥
दास म्हणे जळावरी । जैसी फिरतसे भोंवरी ॥४॥

६८९.
येतां संसारासी झाल्या दुःखराशी । कोणाला असोसी कासयाची ॥१॥
पात्र कोणी एक भरला वमक । खायाचा विवेक तेथे कैंचा ॥२॥
विषय नासका कळला आसका । सुख नाही सुख नाही एका देवेविण ॥३॥
देवेवीण एका सर्व कांही फोल । वासना गुंतली कोणेठायी ॥४॥
कोणे ठायी आतां असोसी राहिली । वासना गुंतली रामपायी ॥५॥
रामपायी जन्ममृत्यु आढळेना । दास म्हणे मना सावधान ॥६॥

६९०.
सावधानपणे काहीच नुरावे । त्वरे उद्धरावे कोणीएके ॥१॥
कोणी एक इच्छा देवाची मानावी । आपुली नाणावी वासना हे ॥२॥
वासनेसी मनापासूनी कंटाळा । जन्मासी वेगळा सहजचि ॥३॥
सहजचि आतां मन कंटाळले । पोंचट वाटले सर्व कांही ॥४॥
सर्व कांही दिसे मिथ्या वोडंबरी । साचाचिये परी कोण मानी ॥५॥
मानेसेंहि नाही असोसीही नाही । दास कांही नाही राम एक ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP