मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पंचीकरण

विविध विषय - पंचीकरण

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


७४१.
कर्ण मनादिक सूक्ष्म पंचक । याचा साक्षी एक तूंचि जाण ॥१॥
जाणे पंचप्राण साक्षी विलक्षण । विषयांचा जाण तूंचि एक ॥२॥
तूंचि एक साक्षी दश इंद्रियांचा । पांचा पंचकांचा लिंगदेह ॥३॥
लिंगदेह दृश्य द्रष्टा तूंचि एक । बोलिला विवेक सूक्ष्माचा ॥४॥
सूक्ष्माचा साक्षी सूक्ष्मावेगळा । दास अवलीळा देहातीत ॥५॥

७४२.
देहद्वयसाक्षी नेणे आपणासी । कारण तयासी बोलिजे ते ॥१॥
देहद्वय जाणे आपणासी नेणे । पुसो जातां म्हणे कळेना की ॥२॥
कळेना की मज माझेंचि स्वरुप । जाला साक्षिरुप सहजचि ॥३॥
सहजचि जाला कारणाचा साक्षी । स्वये नेणण्यासी जाणताहे ॥४॥
जाणताहे स्थूळ सूक्ष्म कारण । साक्षी विलक्षण दास म्हणे ॥५॥

७४३.
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरी । जाणावा चतुरी चौथा देह ॥१॥
चौथे देही सर्वसाक्षिणी अवस्था । ऐसी हे व्यवस्था चौ देहाची ॥२॥
चौ देहांची गांठी शोधितां सुटली । विवेके तुटली देहबुद्धी ॥३॥
देहबुद्धि नाही स्वरुपी पाहतां । चौथा देह आतां कोठे आहे ॥४॥
कोठे आहे अहंब्रह्म ऐसा हेत । देही देहातीत रामदास ॥५॥

७४४.
देहअभिमान त्या नांव अज्ञान । सर्वसाक्षी ज्ञान त्याचे नांव ॥१॥
नाम रुप नाही त्याचे नांव कायी । सर्वसाक्षी पाही विज्ञान ते ॥२॥
विज्ञान उन्मन आत्मनिवेदन । पूर्ण समाधान दास म्हणे ॥३॥

७४५.
नमूं वक्रतुंडा स्वरुपे प्रचंडा । स्थूळ हे ब्रह्मांडा विराटाचे ॥१॥
विराटाचे सत्य पाताळी चरण । तेथे अधिष्ठान त्रिविक्रमा ॥२॥
त्रिविक्रम स्थूळ ते सप्त पाताळ । कट महितळ विराटाचे ॥३॥
विराटाचे रोम गुल्म लता द्रुम । सर्व नद्या नेम नाडी चक्रे ॥४॥
नाडीचक्र नद्या सप्तही सागर । जाणावे उदर विराटाचे ॥५॥
विराटाच्या पोटी क्षुधेचा प्रबळ । तोचि दावानळ सागरींचा ॥६॥

७४६.
पृथ्वीतळी व्याळ व्याळातळी जळ । त्या तळी अनळ सत्य जाण ॥१॥
सत्य जाण तया तळी तो अनिळ । त्या तळी पोकळ व्योम आहे ॥२॥
व्योमतळी अहंकार तो केवळ । तेणे ब्रह्मगोळ धरियेला ॥३॥
धरियेला पुढे महत्तत्त्व असे । सप्तावर्ण ऐसे निरोपिले ॥४॥
दशगुण थोर एकाहुनि एक । हे सप्तकंचुक दास म्हणे ॥५॥

७४७.
विष्णु चंद्र जाण ब्रह्मा नारायण । पार्वतीरमण सदाशिव ॥१॥
दिशा वायु सूर्य ज्ञानेंद्रियान्वये । वरुण निश्चये अरुण तो ॥२॥
तोचि इंद्र वन्हि वामन प्रजापती । पांचवा निऋति गुदस्थानी ॥३॥
स्थाने वायु एक विषयही एक । जाहले कौतुक सूक्ष्माचे ॥४॥
सूक्ष्मी सूक्ष्म एक आत्माराम । रामदासी वर्म सांपडले ॥५॥

७४८.
विष्णु चंद्र ब्रह्मा नारायण रुद्र । आकाशाचे थोर अंश पाहे ॥१॥
ब्रह्मांडी व्यापक लोकार्क वरुण । रुद्र वायु जाण चाळक तो ॥२॥
दिशा वायु रवि वरुणाचा हेत । आश्विन दैवत तेज अंश ॥३॥
वन्हि इंद्र तिजा जाणावा उपेंद्र । ब्रह्मा आपी सार निऋति तो ॥४॥
शब्द स्पर्श रुप रस आणि गंध । तन्मात्रा विशद दास म्हणे ॥५॥

७४९.
निर्गुण स्वरुपी मूळमाया जाली । तिच्या पोटी आली गुणमाया ॥१॥
गुणमायेपोटी जाला सत्वगुण । सत्वी रजोगुण उद्भवला ॥२॥
उद्भवला रजोगुणी तमोगुण । तमोगुणी जाण व्योम जाले ॥३॥
व्योमापोटी वायू वायूपोटी तेज । तेजी ते सहज आप जाले ॥४॥
आपापासूनीयां भूमंडळ होणे । शास्त्रींची वचने दास म्हणे ॥५॥

७५०.
शून्यापासोनीयां जन्म आकाशासी । आकाश वायूसी प्रसवले ॥१॥
प्रसवला वायू तेथे तेज जाले । तेजाचिया आले पोटां आप ॥२॥
आपापासुनीयां सृष्टि हे जन्मली । ऐसी विस्तारली मायादेवी ॥३॥
मायादेवी वळे शून्याकडे पळे । ते काळी खवळे पंचभूत ॥४॥
जे जयासी व्याले ते तेणे भक्षिले । अंती ते उरले शून्य एक ॥५॥
शून्याचे स्वरुप पाहतां कांही नाही । ते शून्य सर्व ही जेथे आटे ॥६॥
आहे हे आटले त्याचे शून्य जाले । शून्यहि राहिले शून्यहि राहिले सस्वरुपी ॥७॥
रुप पाहिल्या काळ वेळ गेली । निजठेवा लाधली प्राणियासी ॥८॥
प्राणियासी लुलु सुटेना लोभाची । तुटेना पायींची इच्छाबेडी ॥९॥
इच्छाबेडी तोडी श्रीरामसमर्थ । पूर्ण मनोरथ रामदासी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP