१७५
तीर्थां जाती देखोवेखी । तेथें कैंसी होते पाखी ॥१॥
पाप गेलें पुण्य जालें । कैसें प्रत्ययासी आलें ॥२॥
दोषापासूनि सूटला । प्राणी मुक्त कैसा जाला ॥३॥
म्हणती जाऊं वैकुंठासी । कैसें येतें प्रत्ययासी ॥४॥
देवदास म्हणे हित । कैसें जाहालें स्वहित ॥५॥
१७६ वाराणसी क्षेत्र थोर । तेथें लोक जाती फार ॥१॥
परी तेथें अधिक काय । ऐसें विचारोनि पाहे ॥२॥
येथें लोक तेथें लोक । अवघें एकचि उदक ॥३॥
जेथें तेथें देव धोंडा । तो कां आपुले गांवीं सांडा ॥४॥
देवदास म्हणे वेडें । तीर्थां धांवे अवघ्यांपुढें ॥५॥
१७७
मनकर्णिकेमाझारीं । स्नानसंकल्प निवारी ॥१॥
स्नान केलें अंतरंगा । तेणें पावन जाली गंगा ॥२॥
गुरुपायीं शरण प्रेमें । तोचि त्रिवेणीसंगम ॥३॥
रामकृपेचें वाहे जळ । रामदासीं कैंचा मळ ॥४॥
१७८
जेथें शोभे द्वादशकळा । तोचि आत्मा द्वादशटिळा ॥१॥
हेंचि कपाळीं लावणें । रविकुळटिळकपणें ॥२॥
राम -नाम -मुद्रा लावूं । राम अंतरींच ध्याऊं ॥३॥
दास लावी जें कपाळीं । तेंचि ध्यातो चंद्रमौळी ॥४॥
१७९
गेला संदेहाचा मळ । तेणें निःसंग निर्मळ ॥१॥
बाह्य गंगाजळस्नान । चित्तीं शुद्ध ब्रम्हज्ञान ॥२॥
सर्वकाळ कर्मनिष्ठ । सर्व साक्षित्वें वरिष्ठ ॥३॥
रामदासीं स्नानसंध्या । सूतक माता करी चंद्या ॥४॥
१८०
परमेष्ठी परब्रम्ह । तोचि माझा आत्माराम ॥१॥
कैसें केलें संध्यावंदन । सर्वां भूतीं हो नमन ॥२॥
नाहीं आचमनासी ठावो । तेथें नाम चि जाला वावो ॥३॥
जेथें हरपले त्रिकाळ । ऐसी संध्येसि साधली वेळ ॥४॥
कळिकाळा तीन चूळ पाणी । रामदास दे सांडुनी ॥५॥
१८१
पूर्वोच्चरिते ॐ कार । प्रणवबीज श्रीरघुवीर ॥१॥
ब्रम्हयज्ञ कैसा पाहे । अवघें ब्रम्हरुप आहे ॥२॥
देवऋषि पितृगण । तृप्ति श्रीरामस्मरण ॥३॥
सव्य अपसव्य भ्रांति । ब्रम्ह निःसंदेहस्थिति ॥४॥
आब्रम्हस्तंबपर्यंत । राम सबाह्य सदोदित ॥५॥
दासीं ब्रह्मयज्ञ सफळी । संसारासी तिळांजुळी ॥६॥
१८२
अनित्याचा भ्रम गेला । शुद्ध नित्यनेम केला ॥१॥
नित्यानित्य हा विचार । केला स्वधर्मआचार ॥२॥
देहबुद्धि अनर्गळ । बोधें फिटला विटाळ ॥३॥
रामदासीं ज्ञान जालें । आणि स्वधर्मा रक्षिलें ॥४॥
१८३
दाढी डोई भादरिती । केंस मागुते निघती ॥१॥
शुचिष्मंत जाला कैसा । विवेक पाहाना कां ऐसा ॥२॥
देवासाठीं तीर्था जाती । तरि कां मागुते फिरती ॥३॥
देवदास म्हणे भ्रम । ज्ञानेंवीण अवघा श्रम ॥४॥
१८४
अंतरीं गुरुवचन । बाहिर नापिकवपन ॥१॥
अंतर्बाह्य शुद्ध जालों । रामदर्शनें निवालों ॥२॥
मन मुंडिल्यां उन्मन जालें । शिर मुंडिल्यां काय केलें ॥३॥
दासें तीर्थविधि केला । रामीं पिंड समर्पिला ॥४॥
१८५
सर्वकाळ संतृप्तता । तृप्त केली लोलंगता ॥१॥
फळ जालें तर्पणीं । संसारास पडलें पाणी ॥२॥
देवराया तृप्त केलें । मांवें आत्म निवेदिलें ॥३॥
रामदासाचें तर्पण । सर्व केलें रामर्पण ॥४॥
१८६
आत्मारामेंविण रितें । स्थळ नाहीं अनुसरतें ॥१॥
पाहतां मन बुद्धि लोचन । रामेंविण न दिसे आन ॥२॥
सवडी नाहीं तीर्थागमना । रामें रुंधिलें त्रिभुवना ॥३॥
रामदासीं तीर्थभेटी । तीर्थ राम होउनि उठी ॥४॥
१८७
यात्रा सफळ जाली एकीं । वृत्ति पारुषली अनेकीं ॥१॥
देवें दाटलें आकाश । अवघा देव सावकाश ॥२॥
भक्तिभिन्न बैसों कोठें । नवल मांडिलें गोमटें ॥३॥
जावें तरी कोणीकडे । देव जिकडे तिकडे ॥४॥
म्हणे रामीरामदास । रामरुप भक्त भासे ॥५॥
१८८
जाल्या स्वरुपेंशी भेटी । वृत्ति होय उफराटी ॥१॥
तैसें परतलों निजग्रामा । दृष्टीं बसला परमात्मा ॥२॥
भक्तपण बोळवोनि ठेलों । सहजीं सहज स्थिर जालों ॥३॥
दासीं यात्रा झाली सुफळ । तेथून खुंटलें इचें मूळ ॥४॥
१८९
देवें दाटलें आकाश । अवघा देव सावकाश ॥ध्रु०॥
यात्रा सकळ जाली एकी ॥ पुढती पारुषल्या अनेकीं ॥१॥
भक्त भिन्न बैसे कोठें ॥ नवल मानलेंसें मोठें ॥२॥
जावें तरी कोणीकडे ॥ देव दूर निवडे ॥३॥
म्हणे रामीरामदास ॥ रामरुप भक्ता भास ॥४॥