मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
मेधाचें करिं भूर्जपत्र धर...

प्रेमलेख - मेधाचें करिं भूर्जपत्र धर...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


मेधाचें करिं भूर्जपत्र धरूनी अस्ताचलीं प्रत्यहीं
स्वर्गींचे नव लेख कुंकुमरसें ती सांध्यदेवी लिही;
रात्रीं शांत गभीर अंबुनिधिच्या आनील पृष्ठावरी
लज्जालेख लिही विकंपित करें ती तारकासुंदरी;
श्यामा निर्झरिणी पुन:पुनरपी सारीत नीलाचलां
मुग्धालेख सुरम्य सैकतिं लिही मंदोर्मिमालाकुला;
वेलींचें स्वकरें कराग्र धरुनी त्या मंदमंदानिलें
क्रीडालेख वनस्थलींहि लिहिती कांहींतरी आपुले.
हे सारे मधुलेख घेउन जगीं नाचोत वेडे कवी,
गावो गीतशतें तयांस, मजही त्यांची कळे थोरवी.
लज्जमुग्ध परी शिर:कमल तें ठेवून माझ्या उरीं
श्वासांच्या कवनीं लिही प्रियतमा ही प्रेमलेखावली.
सारे ते मग लेख तुच्छ गमती चित्ताचिया लोचनीं,
तीचा अक्षय लेख एकच, उभा मी मग्न पारायणीं !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP