मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
स्वर्गाच्या तेजोगर्भी । ब...

बाळें तीं खेळत होतीं - स्वर्गाच्या तेजोगर्भी । ब...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


स्वर्गाच्या तेजोगर्भी । बाळें तीं खेळत होतीं,
वत्सलता प्रभुरायाची । जोजवी तयां निज हातीं;
झुलवी त्या पाळणियांत । छायामय मधु रजनी ती.
संध्येची सुंदर तारा
करि त्यावर विंझणवारा,
लडिवाळें परमोदारा -
देवास बहू आवडती । बाळें तीं खेळत होतीं १

बैसून सूर्यकिरणांत । सोन्याच्या कारंज्यांनीं
कधिं जलदजाल कुळवावें । स्वर्गीय सुधेनें त्यांनीं,
कधिं चंद्रकला सजवावी । नवरंगीं हार विणोनी,
शांतीचा करूनी पांवा
अवकाशी सूर भरावा,
नक्षत्रकोक झुलवावा,
सौंदर्यें उधळित होतीं । बालें तीं खेळत होतीं. २

एकदां सडा संध्येचा । शिंपून महोत्सव केला,
बनविलें बीन बाळांनीं । ओढूनि सूर्यकिरणांला;
तें वाद्य वाजवायाला । अनिवार हर्ष ह्र्दयाला.
ते सांध्यगिरी बहुवर्णी,
छायामय त्या निर्झरिणी
गजबजल्या सुरललनांनीं;
परिसाया देवहि येती । बाळें तीं खेळत होतीं. ३

वाद्याचे ते झंकार । एकेक जसे उदयाला,
एकेक सृष्टिचें फूल । लागे मग उमलायाला;
नि:स्तब्ध मूक गगनाला । निमिषांतच मोहर आला.
आनंद गडे ! आनंद,
गाण्याचा एकच छंद,
स्थिर भरला परमानंद,
ये रंगनाथ संगीतीं । बालें तीं खेळत होतीं. ४

परि हाय ! कुठुनि तरि आला । अति तीव्र विषारी वारा,
कंपित हो एकाएकीं । मधु दिव्य देश तो सारा;
बाळांचे गळले हात । बीनाच्या तुटल्या तारा.
ती स्वप्नसृष्टि जळाली,
गाण्याची तार गळाली,
काजळी चढे वरखालीं,
झाली हो माती माती । बाळें तीं खेळत होतीं.  ५

या खोल भूमिगर्तेत । अंधार खळाळत होते,
मोहाचें वीख विखारी । बेभान करी सकलांतें,
वार्‍यावर भेसुर भारी । अंधुकता पसरित ये तें !
वाफारा तो लागोनी
तीं रम्य बालकें तान्हीं
कळवळुनी पंचप्राणीं
कोसळुनी खालीं येतीं । बाळें तीं खेळत होतीं. ६

मग भयद काळडोहांत । भोवंडुनि गरके खाती
फणि डंख विखारी मारी । वर लाट चपेटा दे ती
अंगार ! तडकते लाही - । जंजाळ जिवाचे होती.
तडफडती माशावाणी,
आक्रंदति करुणागानीं,
हा ! हा ! ते हाल बघोनी
पाषाणहि भंगुनि जाती । बाळें तीं खेळत होतीं. ७

कळवळुनि शेवटीं आला । यमधर्म सुमस्नेहाळ,
जर्जरित बाळगालांत । निश्चेष्ट द्दष्टि तेजाळ;
मालवती जीवज्योत । लवली ती किंचित्काळ;
अप्सरसा निर्भरचित्तीं
गंधर्वगायनें गाती,
स्वर्गांत दिवाळी होती,
जाती न परंतू वरतीं । बाळें तीं खेळत होतीं. ८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP