मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
देऊळींचा देव मेला । विश्व...

संतांचा अनुवाद - देऊळींचा देव मेला । विश्व...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


देऊळींचा देव मेला । विश्वीं विश्वरूप झाला ॥
देव झाला शतखंड । तेणें कोंदलें ब्राम्हांड ॥
क्रियाकर्मीं देव नाहीं । देव कीर्तनीं न राही ॥
देव नाहीं ज्ञानामधीं । ती तों देवाची समाधी ॥
सत्य देव विश्वांतरीं । हिंडतसे दारोदारीं ॥१॥

एक देव कष्ट करी । एक उघडा शरीरीं ॥
एक पोटासाठीं फिरे । एक भुकेलेला मरे ॥
एक देव झाला रोगी । देहदु;खी दु:ख भोगी ॥
एका आपंगीता नाहीं । देव दीनवाणी पाही ॥
ऐसे देव नानापरी । हिंडताति दारोदारीं ॥२॥

देवें तुम्हां दिली आई । तैशी ब्रम्हांडीं रमाई ॥
देवें तुम्हां दिला तात । तैसा माधव जगांत ॥
देव तुम्हां पाठींपोटीं । तैसे देव घटीं घटीं ॥
नका पाहूं त्यांची धूळ । देव माझे अमंगळ ॥
धरा कारुण्य अंतरीं । सत्य देव व्हावा जरी ॥३॥

नको पुण्याईचें ओझें । सर्व म्हणा ‘माझें माझें ॥
नको ठेवूं अहंकार । करा साहय थोडें फार ॥
नका लाजे देऊं थारा । सर्वेश्वर आणा घरा ॥
नको संपत्तीची चाड । नको कीर्तीचेंही वेड ॥
दारीं पडे देवराणा । तया मंदिरांत आणा ॥४॥

माझें ह्रदयमंदिर । माझ्या देवाजीचें घर ॥
माझे तीस कोटी देव । नको अद्वैताचें नांव ॥
जळो माझी दोषद्दष्टी । जीव तुटो तयांसाठीं ॥
हातें घडो त्यांची सेवा । निदिध्यास लागो जीवा ॥
म्हणे रमाईचें बाळ । हेचि आप्त सर्वकाळ ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP