मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
केव्हां मारुनि उंच भरारी ...

आनंदी पक्षी - केव्हां मारुनि उंच भरारी ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


केव्हां मारुनि उंच भरारी । नभांत जातो हा दूरवरी,
आनंदाची सृष्टी सारी । आनंदें भरली. १

आनंदाचे फिरती वारे, । आनंदानें चित्त ओसरे,
आनंदें खेळतो कसा रे । आनंदी पक्षी ! २

हिरवें हिरवें रान विलसतें, ।  वृक्षलतांची दाटी जेथें,
प्रीती शांती जिथें खेळते । हा वसतो तेथें, ३

सुंदर पुष्पें जिथें विकसलीं, । सरोवरीं मधु कमलें फुललीं
करीत तेथें सुंदर केली । बागडतो छन्दें, ४

हासवितो लतिकाकुंजांना, । प्रेमें काढी सुंदर ताना,
आनंदाच्या गाउन गाना । आनंदें रमतो. ५

जीवित सारें आनंदाचें । प्रेमरसानें भरलें त्याचें;
म्हणोनिया तो रानीं नाचे । प्रेमाच्या छन्दें ! ६

आम्हांकरितां दुर्धर चिंता, । नाना दु:खें हाल सभोंता,
पुरे ! नको ही नरतनु आताम । दु:खाची राशी ! ७

बा आनंदी पक्ष्या, देई । प्रसाद अपुला मजला कांहीं,
जेणें मन हें गुंगुन जाई । प्रेमाच्या डोहीं. ८

उंच भरार्‍या मारित जाणें । रूप तुझें तें गोजिरवाणें !
गुंगुन जाइल चित्त जयानें  । दे, दे तें गाणें ! ९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP