मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
तुला बघावें गुंगावें । गु...

कवीची इच्छा - तुला बघावें गुंगावें । गु...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


तुला बघावें गुंगावें । गुंगतची चुंबुनि घ्यावें;
गुंगतची होऊनि जावें । स्वदाधीन जीवेंभावें,
गुं गुं गुं गुं जोंवरती । जडतेची पडते माती,
तरलित हो हृदयज्योती । दिव्य सूर श्रवणीं येती.
मग त्यांचा धरुनी सोल । एकेकच गुंफित बोल -
सौंदर्याचे, स्वप्नाचे । भासाचे, कल्पकतेचे -
अर्धस्फुट नयनांवरचे । निद्रेचे जागेपणिंचे -
मुग्ध मधुर हास्यावरले । विंदुकिरण कलिकेमधले,
हृदयतार हालविणारे । मनस्ताप मालविणारे,
मनोवृत्ति कालविणारे । अंधकार घालविणारे,
दिव्य तरंगीं तरणारे । गोड गोड गुंफित सारे,
प्रतिभेच्या सौधावरुनी । मरुदगणांवरती चढुनी,
अनंतांत गगनीं उडुनी । लीन बनुनि वातावरणीं,
होऊनियां सौंदर्यधनी । गुंजावीं मंजुळ गाणीं,
ब्रम्हांडाची सदाफुली । अक्षयतेमध्यें फुललीं.
फुलें तिचीं बघतां नयनीं । वेड भरुनि अंत:करणीं;
फूलपांखरें परोपरी । निर्वेधपणें फुलांवरी
जशीं स्वयें तरलित होतीं । मंद तरल गंधावरतीं’
तेंवि जगाच्या फुलावरी । गंध दाटले परोपरी,
अनुभवुनी हर्षित व्हावें । सुखदु:खें चुंबित गावें.
सुमकोषीं आपोआप । क्षण घ्यावी साखरझोंप
डोलतची जागें व्हावें । हांसतची गुंगत जावें.
सत्याचीं स्वप्नें व्हावीं । सत्याला स्वप्नें यावी
स्वप्नींही स्वप्नें बघत । स्वप्नांता व्हावा अंत !
मरण्याचें स्वप्नहि गोड । जगण्याचें स्वप्नहि गोड ।
येणेंपरि सर्वहि भास । अमृताचे व्हावे कोष.
काव्यपांखरू हें मेलें । जन म्हणतिल पाहुनि सगळे
नवल परी यावर कांहीं । मृत्यूचें चिन्हाहि नाहीं !
स्वर्गींचीं बहरून फुलें । सूर्यफुलें नक्षत्रफुलें
नंदनवन सुंदर वरतें । तें दिसलें नयनीं यातें;
मदुगीतें गंधर्वांचीं । नृत्यकला अप्सरसांची
देवांचीं ‘राज्यें’ बघुनी । हें भुललें गेलें उडुनी
अक्षय तेथें तरंगतें । तरल मनें डुलतें झुलतें.
काव्यपांखरूं स्वैरपणें । चुंब नगीतें अजुनि म्हणे;
नाहिं खरें जगतीं मरण । काव्यपांखरूं बघा खुणा;
नसत्याची भीती धरुनी । असतें कां द्यावें त्यजुनी ?
कां म्हणुनी वेडें व्हावें ? चुंबितची यासम जावें
भासाचीं सर्वहि सुमनें । चला चला चुंबित वदनें,
होइल मग सर्वचि गोड । मरण गोड जगणें गोड
दु:खाश्रूंतिल ही गोडी । हास्याहुनि नाहीं थोडी.
दोघेही गोडच भास । आवडती चुंबायास.
प्रेमानें भरलें गात्र । सांपडला चुंबनमंत्र !
चुंबितची आम्ही जाऊं । स्वैरपणें जगतीं राहूं.
प्रेतहि माझें पाहून । प्रेमानें गुंगत गान
यापरि जग हृर्षित व्हावें । हें इच्छीं जीवेंभावें !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP