जळ काळें काळें हंसें भयानक दिसे. सहज बघशील,
तर दिसेल तुजला तुझीच दुबळी भूल.
यक्षिणी, देवता कुणी, कपारींतुनी,
घोर घुमतील
हे काय बोलते बोल, भाबडी भूल.
नको म्हणुं कांहीं,
बघ हिरवा मांडव मजवर होइल बाई.
दुरदूर माय चालली, बाळ परतली,
भरे हुरहूर,
तिज उदासवाणें - दिसतें सगळें दूर.
भावांनि घेतलें पुढें, नको रडुं गडे,
घालुं ये चुडे
तुझ्या हातांत;
तुज आवडतो ना ? आज करूं दहिभात.
लोभाचा भरला पूर, विखाई घोर,
भरे महापूर,
लोपली माया,
ते विखार पिवळे लागति त्यास दिसाया,
दारांत बहिण भेटली, भीति वाटली,
चरमकला भारीं,
परि पुन्हा घनाची आली लहर विखारी.
ऐकून माय घाबरे, निघाली त्वरें
आडवी येई.
केल्हाळ लाड्की चिमगी सोनाबाई !
तुज रानांनीं बाहिलें, काल सोनुले,
राजबागांत
जा, भिऊं नको, मी तुला जोडीला जोडितें हात.