गा, गा, गा विहगा गीतें,
टाक भारुनी जगतातें,
सुंदर वातावरणांत
निर्मुनि देवाचे दूत
जड जगताला,
शून्य नभाला,
ब्रम्हांडाला
जीवित नव अर्पायातें
गा, गा, गा विहगा गीतें १
आकाशामधले बोल,
सृष्टीचे मंजुळ ताल
एकसरें वर्णायाला
गाण्याची गुंफीं माला.
ही सृष्टीचीं
निगूढतेचीं
तत्त्वें साचीं
सांग उकलुनी आम्हांतें
गा, गा, गा विहगा गीतें २
काळाचे भेसुर बोल
गोड करुनि तूं कथिशील.
विश्वाला माधुर्य खरें
तूंच गोजिर्या, देशिल रे !
प्रेमलतेनें
सौंदर्यानें,
सुधारसानें
सृष्टीला न्हाणायातें
गा, गा, गा विहगा गीतें ३
जाइल हें तम वितळोनी
उज्ज्वल तव ऐकुनि गाणीं;
या नश्वर जगतावरतीं
दिव्याची होइल वसती.
तुझ्या गायनीं
धुंद होऊनी
दिव्य भावनीं
गुंगवीत ब्रम्हांडातें
गा, गा, गा विहगा गीतें ४
भविष्य विश्वाचें सारें
तव गानीं भरलें बा रे !
म्हणोनि विहगा, तव बोल
ब्रम्हांडीं दुमदुमतील.
तन्मयतेनें
वेडें गाणें
तुझ्या सुरानें
विश्वाला शिकवायातें
गा, गा, गा बिहगा गीतें ५