भरलें घर ओकें ओकें - भरलें घर ओकें ओकें । मज न...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
भरलें घर ओकें ओकें । मज न कळे दिसतें कैसें ?
मजभंवते जमले सगळे । स्वप्नीं परि बघतों जैसें;
ही दूध पाजिते ताई । परि वाटे घोटुं नयेसें,
स्फुंदूनि माय रडताहे,
समजावित भाऊ आहे,
ती रमा भयाकुल पाहे,
वैकल्य भरी हृदयातें । पाहूंच नये परि गमतें.
संवेदनशक्ती मेली । उघडेहि नयन मिटतात,
बघण्याचेही श्रम गमती । येई न विचार मनांत;
वरचेवर येतां ग्लानी । जणुं जीव बुडे गहनांत.
परिन लगे औषधपाणी,
मजसाठिं, नका रडूं कोणी,
सुख भोगा अपुल्या स्थानीं;
द्या आशीर्वाद मुलांतें । झोपेन सुखें मग एथें.
अस्फुट वच वदुनी ऐसें । झांकुनि घे थिजले डोळे;
देहावर जडता पसरे । परि नुसता हातच हाले;
नयनांवर सांचे पाणी । श्वासाची धमनी चाले;
मायेच्या हलकल्लोळीं
भंवतालीं गर्दी केली;
परि टाकुनि पंजर खालीं
दुखवूनि उडाला जीव । मायेचा हिरवा रावा.
Last Updated : November 11, 2016
TOP