मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
अनंत तारा नक्षत्रें हीं, ...

अनंत - अनंत तारा नक्षत्रें हीं, ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.



अनंत तारा नक्षत्रें हीं, अनंत या गगनांत
अनंत दीप्ती, अनंत वसुधा हे शशिसूर्य अनंत, १

वरतीं खालीं सर्व सांठलें वातावरण अनंत,
माप कशाचें, कुणा मोजितां, सर्व अनंत अनंत. २

कित्येक मानव झटती, करिती हाडाचेंही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणीं ? ३

म्हणोत कोणी ‘आम्हीं गणिला हा ग्रह, हा हा तारा’,
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा ? ४

विशाल वरतीं गगन नव्हे, हें विश्वाचें कोठार,
उदात्ततेचा सागर हा चिच्छांतीचा विस्तार ५

कुणी मोजिला कुणास त्याची लांबीरुंदी ठावी ?
फार कशाला दिग्वनितांची तरी कुणी सांगावी ? ६

अनंत सारें विश्व, जाहलें अनंतांत या लीन;
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान ? ७

तव वैभव हें, तुझीं धनें हीं, हे अत्युच्च महाल
जाति का गगनास भेदुनी ? अनंत हा होतील ? ८

तुझ्या कीर्तिचें माप गडयां का काळाला मोजील ?
ज्ञान तुझें तूं म्हणशी ‘जाइल’, कोठवरी जाईल ? ९

‘मी’ ‘माझें’ या वृथा जल्पना, तूं कोणाचा कोण ?
कितेक गेले मी मी म्हणतां या चक्रीं चिरडून. १०


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP