भिकारी - किनरीवाला दारांत भिकारी आ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
किनरीवाला दारांत भिकारी आला ॥धृ०॥
मंजुळ सुंदर किनरी त्याची,
प्रेमरसाची आनंदाची,
लकेर घेई किति मौजेची
मोहविण्याला १
सुकदु:खाची चाड न याला,
मीतूंपण हा विसरून गेला,
नसे जगाची परवा हयाला
उद्धत झाला ! २
काळ्या काळ्या घन अंधारीं;
किंवा खरतर घोर दुपारीं
काढित बसतो मंद लकेरी
भुलवि जगाला. ३
वनामधें वा जनांत किंवा
गिरिशिखरीं प्रासादीं अथवा,
सुनील गगनीं दिशांमधें वा
बंध् न याला ! ४
समान सर्वां भूतीं पाहे,
प्रेमें बांधी विश्व सर्व हें,
समाधानरत सदैव राहे,
क्लेश न याला ! ५
लतिकांवरतीं फुलें पहातो,
बघतो, ह्सतो, मोहुनि जातो,
गान आपुलें सवेंचि गातो,
गुंगुनि गेला ६
समतेचें या वेड लागलें.
भेदाभेद पळोनी गेले,
म्हणोनि चाळे असले सुचले
हया वेडयाला ! ७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP