सुक्रोदय - सौंदर्यॆ शब्दातीत - स्वर्...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
सौंदर्य शब्दातीत - स्वर्भूवर अवतरतात,
तेजाची फुटली पेठ - दिव्यत्वाची लयलूट,
कृष्णपक्षिंची चंद्रकला - त्यावरती तरते विमला.
शांति दाटली निस्तुल ही - मंद कौमुदीसह वाही.
स्वर्गाच्या वरचें तेज - तारांगणिं भरलें आज,
त्यांतच तमही भासतसे - रजनीचे मधुमंत्र जसे;
निश्चिंतपणा अवनीला - निश्चिंतपणा गगनाला,
विश्वामधिं मिश्रित झाला - निस्पंदपणा अवनीला.
तेजतमांचें झुंज परी - अव्यक्त नभीं हास्य करी;
संधिकाल अत्युत्कट तो - क्षितिजावर अस्फुट फुटतो
अत्युत्कट सगळें कांहीं - नित्य नवी शोभा पाही;
सौंदर्ये वेडें झालें - तेजाची वारुणि प्यालें.
दिव्याच्या मागुनि चाले - विश्व, खरें कळुनी आलें;
केंद्र तया सौंदर्याचा - शुक्र नभीं उगवे साचा.
मुकुट कळ्यांचा दिव्य शिरीं - पीतांबर परिधान करी,
तेज विखुरलें चोंहिकडे - पुष्पावर गगनीं उघडें.
मंगल मंगल गीत म्हणे - अस्फुट रजनी मूकपणें
बालसुधाकर बालकरीं - बालशिरीं अभिषेक करी.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP