चिव् चिव् चिव् चिव् ग चिमणूताई,
ये ये आपुल्या बागांत बाई;
चिमणी आली, बाळ हासला,
टाळी वाजली नाचूं लागला. १
टाळी वाजली, चिमणी उडाली.
भीऊन झाडांत कुठें दडाली;
बाळ म्हणतो “ये ये ग बाई,”
चिमणूताई आलीच नाहीं. २
एक बार्याची झुळूक आली,
बागेंत फुलें डोलूं लागलीं,
लक्ष गेलें बाळाचें त्यांवर,
तेथें दिसला भुंगा सुंदर. ३
“भुंगोबा, आतां तूं तरि येथें
रहा, चिमणी उडून जाते”
“गुं गुं गुं हो हो” भुंगा बोलला,
बाळाच्या मनीं आनंद झाला. ४
फुलें हुंगलीं, रस चाखला,
भुंगा उडोनि जाऊं लागला;
बाळ मारितो हांका त्याजला,
गेला तो गेला ! नाहींच आला. ५
“गडया पतंगा, तूं तरी येई.
येथें बागेंत खेळत राही.”
पतंग आला, क्षण खेळला,
भुर्कन उडोनी नाहींसा झाला. ६
बाळ लागला रडावयाला,
गेला आईला सांगावयाला;
आई म्हणे, “ये खेळूं आपण”
झोंप लागली बाळाला पण. ७