पांखरा, गाइलें तुला कधींहि न कोणीं,
न च अश्रु गाळिले कुणीं वनीं येवीनी !
नि:श्वास धांवती सौख्यामागें सारे;
दु:खाचा वाली कुणा कुणीहि न बा रे !
मधु सुखद उष्णता मिळतां रविरायाची
हीं पवनांदोलीं कमलें उमलायाचीं.
तेव्हांच कोकिलामैना गातिल गाणीं,
होतील फुलें स्मरविव्हाल त्या गीतांनीं.
त्या मधुर सुखीचें अश्रुजाळ चुंबीत
झुलतील फूलपांखरें निजानंदांत,
रविवदनावरचा रंग जरा परि बदले,
मग गान, सर्व सौंदर्य, सर्व हें थिजलें !
या मत्त कोकिळा गिरिकुहरीं रडतील,
कोंवळ्या कळ्या मोडोनि मान पडतील,
लवदार मनोहर वेलबुटी नवलाची
त्या काळीं कोठें नाहीं प्रगटायाची.
रवि वरतीं वरतीं चढत चढत गगनांत
अंगर भरिल या मंद शीत पवनांत;
निष्प्रेम मनाचें गाणें केविलवाणें
तें तुझें मात्र राहील जसेंच्या तैसें,
ती पूर्वतारका प्रभातरेषेवरतीं
जशि काय उभी सौंदर्यदेवता होती;
पीतांबर कसिले, रानवेत्र धरि हातीं,
शिरिं सुकुट कळ्यांचा, त्रिकोकसुखदा मूर्ति.
हळुवार हिमाचें अवगुंथन हलबोनी
बोलेल सर्व निद्रिस्त विश्व म्हणवोनी
सारून जरा कचभार बालिका पाहे,
एकेक तारका समाधिचें सुख लाहे.
निद्रिस्त भूमिला स्वप्न जणों हें दिसलें,
स्वप्नांत लाड्के, सुंदर डोळे भिजले,
स्मरतांहि जया हो रोमांचाची भरती,
मधु मंद अहा ती घटिका सौख्यद होती.
परि तोहि काळ तव हृदया नच सुखदायीं,
निष्प्रेम मनाला कोठेंहि सुख नाहीं.
चुंबीत गुलाबी गाल मधुर संध्येचा
कर वरती आला सुंदर रविरायाचा,
जग समाधिस्थ जणुं सर्व सर्व हें होतें.
परि शांतिलेशही नव्हता ठाउक तूंतें !
बैसून कुठें तरि कांटेरी झुडुपांत
तव हूं - हूं - हूं - चें होतें गीत वहात !
येईल एक परि धन्य दिवस सौख्याचा
जो करिल तुझ्यासह अंत तुझ्या गीताचा.
फिरवून भरारा गोफण तो झाडील
कांठ्यांवर उपडें भग्न हृदय पाडील !
मग एकच धडकी, एकच अंतिम बोल
बोलून तुझें हें जळतें हृदय निवेल !