शारदीय सौंदर्यदेवता - प्रभातकालीं काव्यतारका सो...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
प्रभातकालीं काव्यतारका सोज्ज्वल गगनांत
उदयाचलिं परिधान करुनिया पीतांबर येत.
मुगुट कळ्यांचा शिरीं, उषेचें सिंहासन केलें,
हालवीत कचभार सृष्टिचें तत्थापन बोले.
प्रसन्न पवनें जलदजाल तें अपसारुनि नेलें,
तारामंडळ विश्वविभव हें आकाशीं ठेलें.
कणाकणांनीं शुद्धचेतना भरुनी अवकाश
सर्व धुवुनि हा निवळ साजिरा रंग भरे त्यास,
पिललीं शेतें मंद वायुनें आंदोलन घेतीं
सौंदर्याची मूर्त देवता वनमाला होती.
निर्झारिणी या मुक्तमण्यांचें घेउनि भांडार
विमल सैकतामधुन हालतां चमचमती फार.
हा कुरणांचा थाट दाटला वर्णावा कोणीं ?
शारदीया सौंदर्यदेवता अवतरी भुवनीं.
आर्यभूमिच्या दिव्य पुरातन या देवी दोन
शरद्देवता, उषादेवता झाल्या अवतीर्ण,
भूवरचा संसार दाविते सुफलित ही बाला;
तसा स्वर्गसंसार आमुचा दिव्य तिनें केला.
एक गातसे मानवतेचें मधुमंगल गाणें;
देवपणाचे दिव्यमंत्र परि धरिले दुसरीनें.
Last Updated : November 11, 2016
TOP