गवताचें गाणें - परस्पराकंठीं हात घालुनिया...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
परस्पराकंठीं हात घालुनियां बसलों गात
ऐको ना ऐको कोणी हीं अमुचीं वेडीं गाणीं
उच्छ्टंखल ओढा चाले, उछ्टंकल मारुत डोले,
उच्छ्टंखल अभ्रें झाली, उच्छ्टंखल अमुची बोली.
अर्थ तयाचा कुणा जरी कळे न, पर्वा काय तरी ?
ज्ञान असो अज्ञानच हें गोड अम्हां अमुचें आहे.
स्वर्गांतुनि आली आई, मंजुरवें आम्हां बाही.
ती वदली ‘लाला लाला’ या या रे नाचायाला.
वारापाऊस ऊन गडे नाचनाचती स्वैर पुढें.
पंख पांचुचे तुम्हीहि ते या उडवित येथें तेथें
या जननीवचनीं धालों. नाचत वर आलों आलों
पवनाच्या आंदोलांत देवदूत होते गात.
आलिंगुनि आम्हांला तें हालविती गदगद हातें.
परस्परां चुंबित जावें, नाचावें, मंजुळ गावें;
झोंक्यावर झोंके घ्यावे, सृष्टीशीं समरस व्हावें.
उंच कडयावरतीं कोणी प्रेमाचीं बसवी ठाणीं.
खोल दरी अंधारांत तेथेंही कोणी झुलत,
एक परी अमुचें गीत, सर्वांचें एक चित्त,
द्वैताला ठावच नाहीं, प्रेम दिसे ज्या त्या ठायीं.
प्रेम बनुन जीवेंभावें प्रेमाला शोधित जावें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP